ETV Bharat / state

भररस्त्यात चाकूनं हल्ला, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील घटनेनं ठाण्यात खळबळ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 12:19 PM IST

Thane Crime News
Thane Crime News

Thane Crime News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाजवळ एका 15 वर्षीय तरुणावर चाकूनं हल्ला करण्यात आलाय. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे.

ठाणे Thane Crime News : मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसतोय. 2 फेब्रुवारीला उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. धक्कादायक म्हणजे, पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही घटना घडली होती.

15 वर्षीय तरुणावर चाकूनं हल्ला : यानंतर आता ठाणे जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. 6 फेब्रुवारीला रात्री मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानापासून अवघ्या काही अंतरावर एका 15 वर्षीय तरुणावर चाकूनं हल्ला करण्यात आला. किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. वागळे इस्टेट पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

भर रस्त्यावर घडली घटना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थान असलेल्या लुईसवाडी परिसरात दोन मित्रांच्या भांडणातून हा जीवघेणा चाकू हल्ला झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या युवकावर सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भर रस्त्यावर घडलेल्या या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण आहे. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.

अमली पदार्थांची उघडपणे विक्री : या परिसरात उघडपणे होत असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीला विरोध करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी स्थानिक नागरिकांनी बंड पुकारलं होतं. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही हे प्रकार घडत असल्यानं नागरिक रस्त्यावर उतरले होते. नागरिकांनी यावर कठोर पोलीस कारवाईची मागणी केली होती.

हे वाचलंत का :

  1. उल्हासनगरमध्ये भाजपा आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; प्रकृती चिंताजनक, आमदार अटकेत
  2. नाष्टा केला नसल्यानं मुलानं केली आईची हत्या, बंगळुरुतील धक्कादायक घटना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.