ETV Bharat / state

आत्मदहनासाठी महिला उतरल्या कोळसा खाणीत; कर्नाटकच्या कंपनीविरोधात गावकरी एकवटले

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 7:42 AM IST

Women Protest In Chandrapur
आंदोलक महिला उतरल्या कोळसा खाणीत

Women Protest In Chandrapur : बरांज इथल्या कोळसा उत्पादनाच्या कामाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. मागील 58 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र त्यावर तोडगा न निघाल्यानं महिलांनी कोळसा खाणीत आत्मदहन करण्याचा इशारा दिला. अखेर 14 तासानंतर या महिलांची मसजूत घालण्यात प्रशासनाला यश आलं.

चंद्रपूर Women Protest In Chandrapur : कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ( KPCL ) या कोळसा कंपनीविरोधात मागील 58 दिवसांपासून गावकरी आंदोलन करत आहेत. मात्र प्रशासनानं दखल न घेतल्यानं आंदोलक महिलांनी शुक्रवारी कोळसा खाणीत दोनशे फुट खाली उतरून आंदोलन सुरू केलं. बरांज गावातील खाणीत सकाळी सुरू केलेलं हे आंदोलन सायंकाळपर्यंत सुरूच होतं. अखेर प्रशासनाकडून 14 तासांच्या तडजोडीनंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं आहे. मात्र कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशनच्या विरोधात गावकरी एकवटल्याचं पाहायला मिळालं आहे.

कर्नाटक कोळसा कंपनीकडून कोळसा उत्पादनाचं काम : कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) या कोळसा कंपनीनं बरांज या गावात कोळसा उत्पादनाचं काम सुरू केलं आहे. मात्र याला संपूर्ण गावातून विरोध होत आहे. भद्रावती तालुक्यातील बरांज मोकसा या गावचं पुनवर्सन करण्यात आलं नाही. त्यासह कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या कोळसा उत्पादक कंपनीनं प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता कोळसा उत्पादन सुरू केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गेल्या 58 दिवसांपासून येथील महिलांनी उपोषण पुकारलं आहे. मात्र प्रशासनानं याची दखल घेतली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी निष्फळ : बरांज गावातील नागरिकांनी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या कोळसा उत्पादक कंपनीविरोधात आंदोलन केल्यानं या परिसरात तणाव आहे. त्यामुळे या आंदोलनाची दखल घेत यापूर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आंदोलकर्त्या महिला आणि कंपनीच्या अधिकांऱ्याशी चर्चा केली. मात्र यात कुठलाही ठोस तोडगा निघाला नाही. प्रशासन आणि कंपनीकडून लिखित आश्वासन दिलं नाही, म्हणून हे आंदोलन कायम ठेवण्यात आलं.

आत्मदहनासाठी महिला उतरल्या खाणीत : शुक्रवारी सकाळी अखेर आंदोलन करणाऱ्या महिलांनी टोकाचं पाऊल उचललं. आक्रमक झालेल्या या महिला 200 फूट खोल कोळसा खाणीत आत्मदहनासाठी उतरल्या. पहाटे 4 पासून या महिला कोळसा खाणीत 200 फूट आत उतरल्या होत्या. माधुरी वाडी, माधुरी निकाडे, पंचशील कांबळे, पल्लवी कोरडे, माया सरस्वती मेश्राम, अनिता बेंदूर, माया कोई, मंजू कुरसंगे, रंजना शेळके या महिला एका खड्यात तर दुसऱ्या खड्ड्यामध्ये रंजना रणदिवे, ज्योती पाटील, मनीषा उसके, मीनाक्षी विखे, पौर्णिमा पेठकर, चंदा कुटसंगे, अस्मिता कातकर, पल्लवी द्याकर, आशा पुणेकर, अशा पुनवटकर या आंदोलक महिला उतरल्या. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हे आंदोलन मागं घेण्याची विनंती केली, मात्र महिला जुमानल्या नाहीत. सायंकाळपर्यंत ही चर्चा सुरू होती. अखेर भद्रावतीचे पोलीस निरीक्षक यांनी कारवाईचं ठोस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं.

हेही वाचा :

  1. बरांज कोळसा खाणीबाबत माजी खासदार अहीर करणार पायी मार्च
  2. वणीतील लालपुलिया परिसरातील कोलडेपोवर छापा; ३ ट्रक जप्त
  3. Movement Of Tiger : उमरेड कोळसा खदान भागात रात्री वाघाचा मुक्त संचार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.