ETV Bharat / state

'एक खडा तिकडे गेला तरी शिवसेनेची ताकद कमी होत नाही', रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 10:53 PM IST

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे विश्वासू आमदार रवींद्र वायकर आज (10 मार्च) शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसला आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, "शिवसेनेची ताकद त्यांना कळलेली नाही. इकडचा एक खडा तिकडे गेला तरी शिवसेनेची ताकद कमी होत नाही." ज्यांना सर्व काही दिलं त्यांनी माझ्यासोबत गद्दारी केली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज (10 मार्च) गोरेगाव मतदारसंघातील आढावा घेतला. यावेळी त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र डागले. अनेक वर्ष शिवसेनेत राहून अनेकांना शिवसेना कळली नाही. शिवसेनेची ताकद कळली नाही. इकडचा एक खडा तिकडे गेला तरी शिवसेनेची ताकद कमी होत नाहीय, असं उद्धव ठाकरेंनी रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावर टीका केली आहे.


ज्यांना काही दिलं नाहीत तेच सोबत : पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी ज्यांना सर्व काही दिलं त्यांनी माझ्यासोबत गद्दारी केली आणि ज्यांना काही दिलं नाही ते माझ्यासोबत आहेत. शिवसेनेनं अनेक संकट पाहिली आहेत. संकटांना तोंड दिलं आहे. शिवसेनेतून इकडचे तिकडे जात आहेत. आणखी एक खडा आज इकडून तिकडे गेला तरी शिवसेनेची ताकद कमी होत नाही."


भाजपाचा ओरिजनल पक्ष वेगळा: ''भाजपाचा मूळ पक्ष हा आता नाही आहे. ओरिजनल भाजपाचा पक्ष वेगळा आहे. आता फक्त अन्य पक्षातील नेत्यांना भाजपामध्ये घेतले जात आहे. 'जय श्रीराम' ऐवजी 'जय आयाराम' अशी घोषणा आता भाजपानी दिली पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली. बीजेपीमध्ये कोणी नेता उरलेला नाही. विचार उरलेला नाही. आणीबाणीनंतर हा पक्ष जन्माला आला. त्याआधी जनसंघ होता. आता भाजपाला वरपासून खालपर्यंत नेत्यांची आयात करावी लागत आहे. भाजपा आता आयारामांची मंदिर बांधत आहेत. भाजपा नव्हे तर आता भाXXX जनता पार्टी आहे'', अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे.


आमचं हिंदुत्व ज्वलंत : आमचं हिंदुत्व हे वेगळं आहे, ज्वलंत आहे, जिवंत आहे. मुंबईत कोणताही अतिरेकी हल्ला होवो, पूर येवो किंवा रक्तदानाची गरज असो. पहिल्यांदा धावतो तो शिवसैनिक. आज आपल्यासोबत मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात येत आहे. मी त्यांना विचारले, अरे बाबा तुम्ही भगव्या झेंड्याच्या खाली येताय. तर ते म्हणाले, हो आम्हाला माहीत आहे. पण तुमचं हिंदुत्व आणि भगवा हा भाजपापेक्षा वेगळा आहे. म्हणून आम्ही तुमच्याकडे येत आहोत, असं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वावरून भाजपाला टोला लागावला.


हृदयात राम आणि हाताला काम : पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणे हे आमचे हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व म्हणजे चूल पेटवणार आहे. आणि भाXXX पक्षाचे हिंदुत्व हे घर पेटवणारं आहे, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली.


लढाई देशभक्त आणि द्वेषभक्त : ''काहीजण आज पण तिकडे जातात जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला साडेतीनशे वर्ष झाली. पण अजूनही खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांची नावं समोर आले की, त्यांना आपण गद्दारच असं म्हणतो. गद्दारीचा डाग त्यांच्यावरून पुसला जाणार नाही. त्यामुळे आता ज्यांनी गद्दारी केली आहे, त्यांचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी किती जन्म घ्यावी लागतील, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली. मग प्रत्येकानं ठरवायचं की, मी खंडोजी खोपडे यांचा वारसदार आहे की बाजीप्रभू देशपांडे यांचा वारसदार आहे. मी गोरेगाव येथून लोकसभेसाठी अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि मला विश्वास आहे तुम्ही त्यांना विजयी कराल. पण फक्त मला विजय नको आहे तर विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केले पाहिजे, असा मला विजय हवा आहे. आता ही लढाई देशभक्त आणि द्वेषभक्त अशी झाली आहे. हुकूमशाह विरोधी लढाई आहे आणि ही लढाई निष्ठावंत म्हणून तुम्हाला जिंकायची आहे'', असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं.

हेही वाचा :

  1. क्रिकेटर युसूफ पठाणची राजकारणात एन्ट्री; पश्चिम बंगालमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात
  2. रखरखत्या उन्हात 'रोमँटिक गारवा' हवाय? महाराष्ट्रातील 'या' थंड हवेच्या ठिकाणांना नक्की भेट द्या
  3. अखेर रवींद्र वायकरांचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.