यवतमाळ Three Youth Swept In River : महाशिवरात्रीनिमित्त सुटी असल्यानं पाटाळ्याच्या नदीवर पोहण्यासाठी गेलेले तीन मित्र पाण्याचा अंदाज न आल्यानं वर्धा नदीच्या पात्रात वाहून गेले. शुक्रवारी सायंकाळीच्या सुमारास ही घटना घडलीय. संकेत पुंडलिक नगराळे, अनिरुद्ध चापले, हर्ष चापले अशी वाहून गेलेल्या तिघांची नावं आहेत. यापैकी एक जण 10 व्या वर्गात शिकत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अनिरुद्ध आणि हर्ष हे दोघं चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आलीय.
पाण्याचा अंदाज न आल्यानं गेले वाहून : शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्तानं हे तरुण चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी इथं फिरायला गेले होते. फिरल्यानंतर ते वर्धा नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यानं एक मित्र बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी इतर मित्र मदत करायला गेले. यात तिघंही वाहून गेले. या घटनेची माहिती वणी आणि माजरी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी पथकासह घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीनं काही काळ या तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र "अंधार झाल्यानं शोध कार्य थांबवण्यात आलं. आज एनडीआरएफच्या पथकाद्वारे शोधमोहीम राबवून या मुलांचा शोध घेण्यात येणार आहे," अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांनी दिली.
(ही बातमी अपडेट हेत आहे.)