ETV Bharat / state

बेळगांव, कारवार, बिदरसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अजूनही अपूर्ण - उपमुख्यमंत्री अजित पवार - Maharashtra Day

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 11:11 AM IST

Updated : May 1, 2024, 12:29 PM IST

DCM Ajit Pawar
बेळगांव, कारवार, बिदरसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अजूनही अपूर्ण - उपमुख्यमंत्री अजित पवार

DCM Ajit Pawar : बेळगांव, कारवार, बिदरसह सीमा भागातील मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात सामील करण्यासह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अजूनही अपूर्ण असल्याची जाणीव सर्वांच्या मनात आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सीमा भागातील मराठी बांधवांच्या लढ्याला प्रत्येक महाराष्ट्रवासीयांनी पाठिंबा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय.

उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे DCM Ajit Pawar : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65 व्या वर्धापन दिन साजरा करत असताना बेळगांव, कारवार, बिदरसह सीमा भागातील मराठी भाषिक गावं महाराष्ट्रात सामील करण्यासह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अजूनही अपूर्ण असल्याची जाणीव सर्वांच्या मनात आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सीमा भागातील मराठी बांधवांच्या लढ्याला प्रत्येक महाराष्ट्रवासीयांचा पाठिंबा आहे. तसंच सीमा भागातील गावं महाराष्ट्रात सामील होईपर्यंत हा पाठिंबा असणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील पोलीस संचलन मैदान इथं ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी झालेल्या भाषणात अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान दिलेल्यांना अभिवादन : यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, "संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी योगदान दिलं त्यांना अभिवादन करतो. ज्या ज्या वेळेस अधिवेशन असतं त्या त्यावेळेस राज्यपालाच्या आभीभाषणात बेळगाव प्रश्न मांडला जातो. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरु आहे. आपल्याला सुप्रीम कोर्टाला जाब विचारण्याचा अधिकार नाही. बेळगाव भागातील मराठी भाषिकांना ज्या ज्या सवलती देता येतील, त्या सरकारकडून दिल्या जात आहेत. सुप्रीम कोर्टात सरकारनं चांगले वकील लावले आहेत."


त्यांनी एक उदाहरण द्यावं : मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी एक उदाहरण द्यावं की कुठं महाराष्ट्रात लुटालूट सुरु आहे. त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी अडीच वर्षे एकत्र सरकार चालवलंय. आमच्यात कुठंही मतभेद नव्हते. आता निवडणुकीच्या काळात फक्त अशा पद्धतीचे आरोप होत आहेत, असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलंय.


त्या वक्तव्याबाबत मी मोदींना विचारेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या सभेत भटकती आत्मा अशी टीका केली होती. त्यांनी कोणाला उद्देशून म्हणाले याबाबत मला माहीत नाही. पुढच्या सभेत मी त्यांना विचारेल की आपण जो भटकती आत्मा म्हटलं आहे ते कोणाला उद्देशून म्हटलं, अशी सावध प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय. नाशिकच्या जागेच्या बाबत आमची चर्चा सुरु असून योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करत आहोत. छगन भुजबळ हे पालकमंत्री होते. ते एक जबाबदार नेते आहेत. कोणालाही भेटले याचा अर्थ वेगळा काढू नये, असं अजित पवारांनी म्हटलंय.

निवडणूक आयोगाला स्वायत्तता : शरद पवार यांनी पाच टप्प्यातील निवडणुकांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत ते म्हणाले, "माझ्या ज्ञानानुसार निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलीय. निवडणूक आयोगानं किती टप्प्यात निवडणुका घ्याव्यात हा त्यांचा अधिकार आहे. यात कोणी लुडबुड करु शकत नाही. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या आहेत आणि देशात 7 टप्प्यात निवडणुका आहेत." तसंच मिहीर कोटेचा यांच्यावर दगडफेक झाली, त्या संदर्भात त्यांच्याशी मी बोलेन. मी सकाळीच बातमी वाचली. नक्की काय झालं याची माहिती घेईल. खुल्या वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजेत. कुठल्याही निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची सर्व राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी, असं यावेळी अजित पवार म्हणाले.

राज्यातील जनता सुज्ञ : संजय राऊत या व्यक्तिबद्दल मला काही बोलायचं नाही. मी त्या व्यक्तीच्या उत्तराला बांधील नाही. तसंच बारामती आणि शिरुरमध्ये मी कुणाला धमकी दिली नाही. आज विरोधकाकडं कुठलाही मुद्दा राहिला नाही. आमच्या बद्दल गैरसमज पसरवला जात आहे. आम्ही त्यांच्याबरोबर असतानाही कधी धमक्या दिल्या नाही. यापुढंही धमक्या दिल्या जाणार नाहीत, असं यावेळी पवार म्हणाले. तसंच नरेंद्र मोदींविरोधात कुठलाही मुद्दा विरोधकांकडं राहिला नाही. मोदींवर भ्रष्टाचाराबद्दल कुठलाही आरोप दहा वर्षात झाला नाही. त्याबद्दल हे कोणी काही बोलत नाही. मोदींमुळं अनेकांना सत्तेपासून बाजूला राहावं लागलंय. महाराष्ट्रातील आणि देशातील जनता सुज्ञ आहे, असं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्र दिन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली, म्हणाले 'महाराष्ट्रानं देशाला दिशा अन् विचार दिला' - Maharashtra Foundation Day
Last Updated :May 1, 2024, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.