ETV Bharat / state

भाजपावर मित्रपक्ष संपवण्याचा आरोप, लोकसभा निवडणुकीत बसणार महायुतीला फटका? - Lok Sabha Elections 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 7:30 PM IST

BJP killing allies : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा मित्रपक्षांना संपवत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते सुरेश नवले यांनी केला. त्यामुळं महायुतीत नाराजी असल्याचं आता उघड होत आहे.

BJP killing allies
BJP killing allies

अतुल शहा यांची प्रतिक्रिया

मुंबई BJP killing allies : राज्यातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली आहे. मात्र महायुती तसंच महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद सुरू आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी तसंच महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. महायुतीतील मित्रपक्षांत भाजपाबद्दल नाराजी पाहायला मिळत मिळत आहे. त्यामुळं भाजपा मित्रपक्षांना संपवत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून भाजपाकडून मित्रपक्षांना संपविण्याचं काम केलं जातंय का, यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत.

भाजपा मित्रपक्षांना संपवतोय : शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेश नवले यांनी मंगळवारी भाजपावर थेट निशाणा साधला. भाजपाला जे लोक नको आहेत, त्यांना बदलण्याचा आग्रह त्यांच्याकडून केला जात आहे. याकरता वारंवार सर्व्हेचं कारण दिलं जात आहे. सर्व्हेतचा रिपोर्ट विरोधात आला असून उमेदवार बदलण्याची भाजपाची रणनीती चुकीची आहे. भाजपाकडून मित्रपक्षांना संपविण्याचं काम केलं जातंय. सर्व्हेच्या नावाखाली शिंदेंना फसवलं जात असून आम्ही झुकणार नाही, असा इशारा सुरेश नवले यांनी भाजपाला दिला आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या चर्चा महायुतीसाठी घातक असल्याचंही ते म्हणाले.

भाजपाकडून गळचेपी : महायुतीतील जागा वाटपाचा वाद आता उघडपणे समोर येतं आहे. हे पहिल्यांदा घडतं नाही. युतीचं सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यावेळी देखील भाजपाकडून गळचेपी होत असल्यामुळं विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडं राजीनामा दिला होता. त्यावेळी अनेक शिवसेना मंत्री राजीनामा देण्याची भाषा करत होते. आता देखील शिवसेना पक्षात दोन गट पडल्यानंतर शिंदे शिवसेना भाजपासोबत सत्तेत आहे. आता देखील जागा वाटपात भाजपाचा वरचष्मा दिसत आहे. भाजपा मित्र पक्ष संपवण्याचं काम करत असल्याचं नवले यांचं म्हणणं आहे. त्यामुळं त्यांच्या बोलण्यात तथ्य असल्याचं राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळं महायुतीत सगळंच काही अलबेल नसल्याचं चित्र सध्या दिसतंय. त्यामुळंच लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता असून विरोधकांना फायदा होऊ शकतो, असा अंदाज आनंद गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असा अनुभव नाही : शिवसेना, भारतीय जनता पार्टी तसंच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची राज्यात महायुती आहे. भाजपा प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं काम करत असल्याचा आरोप होतोय. मात्र आता महायुतीतील शिवसेना नेते सुरेश नवले यांनीच भाजपावर गंभीर आरोप केलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीय. महायुती म्हणून आम्ही तीनही पक्ष चांगले काम करत आहे. आम्हाला भाजपा, शिवसेनेकडून चांगलं सहकार्य मिळत आहे. महायुती म्हणून आम्ही लोकसभा निवडणुकीला सामोरं जात आहोत. भाजपाकडून आम्हला अशा प्रकारचा कोणताही अनुभव आला नाही. वैयक्तिक कोणाला वेगळा अनुभव आला, असेल तर आपले विचार मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असा अनुभव आला नसल्याचं सुरज चव्हाण यांनी स्पस्ट केलं आहे.

सर्वांना सोबत घेणारा पक्ष : शिवसेनेचे नेते सुरेश नवले यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना भाजपा प्रवक्ता अतुल शाह म्हणाले की, सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन जाणारा एकमेव पक्ष म्हणजे भाजपा आहे. भाजपा अशाप्रकारे मित्र पक्षातील कोणालाही बाजूला काढत नाही. आरोप करणं सोपं असून भाजपा सर्वांना सोबत घेऊन पुढं जात असल्याचा विश्वास अतुल शाह यांनी व्यक्त केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होत असताना महायुतीतील भाजपा, शिवसेनेत जागा वाटपावरून धुसफूस समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळं याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का :

  1. 'आप'ला मोठा दिलासा! दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर - Granted Bail to AAP MP Sanjay Singh
  2. महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, उदय सामंत घेणार गडकरी, फडणवीसांची भेट - Lok Sabha elections
  3. नाराजी वाढत असताना एकनाथ शिंदेंचाही पत्ता कट झालेला दिसेल-संजय राऊत यांचा दावा - Sanjay Raut News
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.