ETV Bharat / state

काँग्रेसनं स्वतः अंतरंग तपासावं, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीवरुन शिवसेनेची टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 11:39 AM IST

Lok Sabha Election 2024 :
Lok Sabha Election 2024 :

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक उमेदवारांच्या पहिल्या यादीवरुन शिवसेनेने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसनं स्वतः अंतरंग तपासावं नंतर महायुतीवर टीका करावी, असं शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी म्हटलं आहे.

संजीव भोर पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाप्रमाणेच काँग्रेसच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही नेत्याचा समावेश नाहीय. त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान न देता आल्यामुळं भाजपा-काँग्रेसच्या यादीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.




काँग्रेसनं स्वतःचं अंतरंग तपासावं : काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवारला स्थान दिलं नसल्यामुळं काँग्रेसनं स्वतः अंतरंग तपासावं, अशी टीका शिवसेना प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी केली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्राच्या उमेदवाराला का स्थान दिलं नाही? यावर उद्धव ठाकरे बोलतील का? अशा सवालांच्या फैरी त्यांनी उद्धव ठाकरेंवर झाडल्या आहेत. भाजपाकडून 195 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आकांडतांडव करत मोदींवर निशाणा साधला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा सोडून महाविकास आघाडीत प्रवेश करावा, असं आमंत्रण ठाकरे यांनी दिलं होतं. काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता असल्यामुळं नाराजी चव्हाट्यावर येऊ शकते, म्हणूनच काँग्रेसने महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव घोषित केलं नसल्याचा दावा संजीव भोर पाटील यांनी केला आहे.



महायुतीकडं उमेदवार नाही : महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचं नाव लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेलं नाही. त्यामुळं योग्य वेळ आल्यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावं जाहीर केली जातील. जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. शिवसेना, राष्ट्रवादीमुळं महायुतीत मोठ्या संख्येनं उमेदवार मिळण्याची शाश्वती नसल्यानं दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन भाजपाच्या वरिष्ठांसमोर नतमस्तक झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली आहे.



काँग्रेसचा सावध पवित्रा : देशातील राजकारण पाहता आत्तापर्यंत विरोधकांनी लोकसभा निवडणूक उमेदवारांची यादी जाहीर केल्याचं दिसून येत आहे. विरोधकांनी उमेदवादी जाहीर केल्यानंतर सत्ताधारी पक्ष उमेदवारी जाहीर करतात. मात्र यावेळी काँग्रेसनं सावध पवित्रा घेतला आहे. भाजपाच्या रणनीतीवर लक्ष ठेवून लोकसभा उमेदवारांची यादी काँग्रेसनं जाहीर केलीय. राज्यातील महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील 'वंचित' हा महत्त्वाचा घटक असल्यानं महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यासाठी काँग्रेस संथ गतीनं पावलं उचलत आहे. पुढील यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश होईल, असा अंदाज राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.



काँग्रेसची 39 नावाची पहिली यादी जाहीर : काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची 39 नावांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश यादीत नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपानं आघाडी घेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता काँग्रेसनं देखील पहिली यादी जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रातील उमेदवारांचा नावांचा समावेश होण्यासाठी सत्ताधारी विरोधी पक्षांना किमान दुसऱ्या यादीची वाट पहावी लागणार, हे निश्चित.

हे वाचलंत का :

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांची 'दिल्ली वारी' ; अमित शाहांसोबत रात्री पार पडली बैठक
  2. 'त्या' FIR मध्ये रोहित पवारांचं नाव नाही, एजन्सीची भीती दाखवली जात आहे; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल
  3. "गल्लीतील नेत्यानं...", नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवर फडणवीसांचं उत्तर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.