ETV Bharat / state

मराठा समाज थेट पंतप्रधान मोदींविरोधात उमेदवार देणार; बैठकीत ठराव मंजूर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 4:34 PM IST

Updated : Mar 10, 2024, 6:20 PM IST

Candidature Against Modi
माऊली पवार

Candidature Against Modi : सोलापूर येथे आज (10 मार्च) झालेल्या मराठा बांधवांच्या बैठकीत मराठा समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरवले आहे. वाराणसी लोकसभा मतदार संघासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर माढा लोकसभा मतदार संघासाठी प्रत्येक गावातून 10 मराठा बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पंतप्रधान मोदींविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत सांगताना माऊली पवार

सोलापूर Candidature Against Modi : सोलापूर शहरात आज (10 मार्च) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे सर्व मराठा बांधवाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून पंधराशे अर्ज दाखल करणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघ हा खुला प्रवर्गातील आहे. त्यामुळे प्रत्येक गावातून कमीतकमी 10 मराठा बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यानं या मतदारसंघातील मराठा बांधव ऑनलाइन द्वारे थेट मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहे, असा महत्त्वपूर्ण ठराव सकल मराठा समाजानं बोलावलेल्या बैठकीत संमत झाला आहे.

सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न : राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होती. सरकारने ती मान्य केली नाही. तसेच सगेसोयऱ्याचा कायदा किंवा जीआर काढला नाही. त्यामुळे मराठा समाज लोकसभा निवडणुकीत अर्ज भरून सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न करणार आहे.

मोदी विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार : सोलापूर लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे मराठा बांधवाना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करता येणार नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मराठा बांधव हे थेट नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून ऑनलाइन पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती बैठकीला आलेल्या मराठा बांधवानी दिली.

बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा आग्रह : ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची मर्यादा आहे. त्यामुळे मराठा बांधव हे ईव्हीएमची मर्यादा ओलांडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी भाग पडणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील मराठा बांधव बैठकीला उपस्थित होते. विविध तालुक्यातून आणि खेड्यापाड्यातून आलेल्या मराठा बांधवानी मनोगत व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्य सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं.

कमीतकमी पंधराशे पोलिंग एजंट बसवू : भारतात होत असलेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रात उमेदवाराचे पोलिंग एजंट बसविले जातात. मराठा समाज हा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत पंधराशे अर्ज भरून पंधराशे पोलिंग एजंट मतदान केंद्रात बसवेल, असा इशारा दिला आहे. मराठा बांधव मतदान केंद्राच्या छोट्याश्या खोलीत पंधराशे पोलिंग एजंट किंवा बूथ एजंट बसण्यासाठी गर्दी करतील. जेणेकरून संबंधित लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया थांबेल. यासाठी मराठा प्रयत्न करणार असल्याची माहिती मराठा बांधवानी बैठकीत बोलताना दिली.

ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं हा उद्देश : बॅलेट मतदान घेणे किंवा भाजपाला निवडणुकीत पाडणे हा मराठा समाजाचा उद्देश नसून मराठा बांधवांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं हे उद्दिष्ट आहे. शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाच्या बैठकीचे नेतृत्व माऊली पवार, पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, रवी मोहिते, श्रीकांत डांगे आदींनी केले. बैठकीत मराठा समाजातील महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता.

हेही वाचा :

  1. Ranji Trophy Final: मुंबईची परिस्थिती गंभीर, पण 'लॉर्ड ठाकुर' खंबीर; आयपीएल स्टाईलनं फलंदाजी
  2. उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवार जाहीर करणं हे युती धर्माचे उल्लंघन नाही का? संजय निरुपम यांची उद्धव ठाकरेंवर टीका
  3. देवेंद्र फडणवीसांच्या टीकेनंतर संजय राऊतांचा पलटवार ; म्हणाले "आम्ही चाकू सुरीवाले, आमची कट्यार . . "
Last Updated :Mar 10, 2024, 6:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.