ETV Bharat / state

नाद खुळा; 'या' जिल्ह्यातील मराठा बांधव लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दाखल करणार उमेदवारी अर्ज

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 10:23 AM IST

Maratha Reservation Protest : लोकसभा निवडणूक 2024 प्रत्येक गावातून दोन ते तीन आणि नगरपालिका वॉर्डातून एक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय कराडमध्ये गुरुवारी झालेल्या मराठा बांधवांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लोकसभेच्या सर्वपक्षीय उमेदवारांपुढं मोठा पेच निर्माण होणार आहे.

Maratha Reservation Protest
संपादित छायाचित्र

सातारा Maratha Reservation Protest : मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलक राज्यभर एकवटले आहेत. मनोज जरांगे आणि राज्य सरकार यांच्यातील वादामुळं मोठं राजकारण रंगलं आहे. त्यातच आता सातारा जिल्ह्यातून मोठी बातमी पुढं येत आहे. कराडमध्ये गुरुवारी झालेल्या मराठा बांधवांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणूक 2024 साठी कराड तालुक्यातील प्रत्येक गावातून दोन ते तीन आणि नगरपालिका हद्दीतील प्रत्येक वॉर्डातून एक उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहे. या निर्णयामुळे लोकसभेच्या उमेदवारांपुढं मोठा पेच निर्माण होणार आहे. दरम्यान, या निर्णयानुसार अर्ज दाखल झाल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची वेळ येणार आहे.

Maratha Reservation Protest
मराठा आंदोलक बैठक

मराठा बांधवांची आक्रमक भूमिका : "दहा टक्के आरक्षण मी स्वीकारलं नाही. त्यामुळं माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणला जातोय. अधिवेशनात एसआयटी चौकशी स्थापन करण्यात आली. मात्र, चौकशी पूर्ण होण्याआधीच मला अटक करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मला कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतात," असा दावा करत मनोज जरांगे यांनी अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं अंगुली निर्देश केला आहे. त्यामुळं मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

एसआयटी चौकशीमुळे सरकार विरोधात रोष : मनोज जरांगे-पाटील यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी सरकारनं अधिवेशनात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली. यामुळं राज्यभरातील मराठा बांधवांमध्ये सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळंच तातडीनं बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन-तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय मराठा बांधवांनी घेतला आहे.

दोन दिवसात जिल्हास्तरावर बैठक : याच अनुषंगानं सकल मराठा समाज दोन दिवसात जिल्हास्तरावर बैठक घेणार आहे. लोकसभा निवडणुकीत घ्यावयाच्या भुमिकेबद्दल मराठा बांधव त्या बैठकीत चर्चा करणार आहेत. कराड तालुक्यातील मराठा बांधवांनी घेतलेल्या निर्णयामुळे साताऱ्यातील इच्छुक उमेदवारांपुढे मोठा पेच निर्माण होणार आहे.

हेही वाचा :

  1. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणं... - एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
  2. मराठा आरक्षण आंदोलन : देवेंद्र फडणवीस यांना राज्य बेचिराख करायचं होतं, मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.