ETV Bharat / state

अंधश्रद्धेला 'मूठमाती' ! 'या' गावात चक्क स्मशानभूमीत साजरा केला महाशिवरात्रोत्सव, तीन वर्षांपासून सुरु आहे परंपरा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 7:09 AM IST

Mahashivratri 2024 : अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा गावात चक्क स्मशानभूमीत महाशिवरात्रोत्सव साजरा करण्याता आला. इतकंच नव्हे तर स्मशानभूमीतच प्रसाद वितरण करण्यात आलं.

ऐकावं ते नवलच! अमरावतीतील 'या' गावात चक्क स्मशानभूमीत साजरा केला महाशिवरात्रोत्सव, तीन वर्षांपासून सुरु आहे परंपरा
ऐकावं ते नवलच! अमरावतीतील 'या' गावात चक्क स्मशानभूमीत साजरा केला महाशिवरात्रोत्सव, तीन वर्षांपासून सुरु आहे परंपरा

अमरावतीतील 'या' गावात चक्क स्मशानभूमीत साजरा केला महाशिवरात्रोत्सव

अमरावती Mahashivratri 2024 : काही वर्षांपूर्वी गावाबाहेर ओसाड असणाऱ्या स्मशानभूमी परिसरात जायला भीती वाटत असताना, सध्या मात्र याच स्मशानभूमीत ग्रामस्थ महाशिवरात्रोत्सव गत तीन वर्षांपासून साजरा करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात येणाऱ्या कुऱ्हा या गावात अंधश्रद्धेवर मात करुन चक्क स्मशानभूमीत महिला, पुरुष, वृद्धांसह चिमुकले देखील महाशिवरात्रीच्या पर्वावर महादेवाचं दर्शन घेऊन या ठिकाणी प्रसाद देखील ग्रहण करतात.

स्मशानभूमीत महादेवाची भव्य मूर्ती : कुऱ्हा येथील स्मशानभूमीत महादेवाची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आलीय. स्मशानातील या महादेवाच्या दर्शनाकरिता गावातील अनेक जण रोजच स्मशानभूमीत येतात. तीन वर्षांपूर्वी कुऱ्हा वेलफेअर फाउंडेशनच्यावतीनं स्मशानभूमीचा कायापालट करुन स्मशानभूमीत महादेवाची भव्य मूर्ती स्थापन करण्यात आली. तेव्हापासून महाशिवरात्रीच्या पर्वावर स्मशानभूमीतच महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा व्हायला लागला. शुक्रवारी पहाटे चार वाजता महादेवाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला आणि पहाटेपासूनच भाविकांची गर्दी स्मशानभूमीत उसळली. रात्री दहा वाजेपर्यंत महादेवाच्या दर्शनासाठी कुऱ्हावासियांसह लगतच्या गावातील अनेक भाविक देखील मोठ्या श्रद्धेनं आले होते.

स्मशानभूमीतच प्रसादाचं वितरण : महाशिवरात्रीच्या पर्वावर कुऱ्हा येथील स्मशानभूमीत कुऱ्हा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं शुक्रवारी रताळ्याच्या शिर्‍याचा प्रसाद तयार करण्यात आला. या प्रसादाचा भोग महादेवाला चढवण्यात आला. तसंच स्मशानभूमीत मृत व्यक्तींना जाळण्यासाठीच्या ओट्यांवर देखील प्रसाद चढवण्यात आला. महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला हा प्रसाद वितरित करण्यात आला. भाविकांनी स्मशानभूमीतच हा प्रसाद ग्रहण केला. या संपूर्ण उत्सवादरम्यान हा परिसर स्मशानभूमीचा आहे, असं भाविकांना जाणवलंच नाही.

स्मशानभूमीचा असा झाला कायापालट : कुऱ्हा येथील युवकांनी एकत्रित येऊन 2019 मध्ये कुऱ्हा वेलफेअर फाउंडेशनची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात हळूहळू संपूर्ण गाव एकत्रित आलं. लोकवर्गणीतून मोठा निधी उभारण्यात आला. कोरोना काळात लॉकडाऊनमुळं सर्व काम बंद असताना ग्रामस्थांनी नाका तोंडाला मास्क बांधून स्मशानभूमीत श्रमदान केलं. स्मशानभूमीत विविध फळ आणि फुलांच्या झाडांची लागवड करण्यात आलीय. तसंच स्मशानभूमीत महादेवाच्या भव्य मूर्तीची धार्मिक विधींसह प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

स्मशानभूमी झाली पर्यटन स्थळ : तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी या स्मशानभूमीत क्रीडा साहित्य उपलब्ध करुन दिलं. गावातील लहान मुलं सकाळी आणि सायंकाळी या स्मशानभूमीत खेळायला यायला लागले. गावातील विद्यार्थी अभ्यास करायला स्मशानभूमीतील शांत वातावरणात यायला लागलेत. हळूहळू स्मशानभूमी समोरुन जाणारे अनेक जण स्मशानभूमीत फेरफटका मारायला आणि आराम करायला देखील यायला लागलेत. स्मशानभूमीत येऊन अनेक जण डबापार्टी देखील करायला लागलेत. आज या स्मशानभूमीला एखाद्या पर्यटन स्थळासारखं स्वरुप आलंय. कोजागिरी पौर्णिमेला कुऱ्हा येथील ग्रामस्थ रात्री दूध घोटून ते पिण्याचा आनंद देखील स्मशानभूमीत घेतात. ग्रामस्थांच्या सभा बैठका देखील या स्मशानभूमीतच होतात.

अंधश्रद्धा निर्मूलनावर भर : स्मशानभूमीत कोणी जाऊ नये, लहान मुलं आणि महिलांनी स्मशानभूमीपासून दूर राहावं, स्मशानभूमीत काही खाऊ पिऊ नये, रात्रीच्या वेळी तर कोणीच स्मशानभूमीच्या परिसरात फिरकू नये, असं म्हटलं जायचं. असं असताना आता मात्र कुऱ्हा येथील स्मशानभूमीत कोणाला कधीही जाता येतं. स्मशानभूमी हे भीतीचं ठिकाण नव्हे हे गावातील प्रत्येकाला कळलं आहे. "अंधश्रद्धा निर्मूलनावर भर देण्याचा आमचा प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी झाला," असल्याचं कुऱ्हा वेल्फेअर असोसिएशनचे सहसचिव बाळासाहेब इंगळे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. शुक्रवारी महाशिवरात्रोत्सवानिमित्त स्मशानभूमीत जणू यात्रेचं स्वरुप आल्याचं वातावरण या ठिकाणी असल्याचं देखील बाळासाहेब इंगळे म्हणाले.

हेही वाचा :

  1. महाशिवरात्री निमित्तानं भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
  2. दक्षिण कोकणातील 'काशी' कुणकेश्वर यात्रेला सुरुवात; किरण सामंत यांना प्रथम निमंत्रण पूजेचा मान दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.