ETV Bharat / state

पुतण्यानं केलं काकाला चितपट; राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून अजित पवारांच्या बंडखोरीपर्यंत राष्ट्रवादीचा 'असा' राहिला प्रवास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 10:49 PM IST

Updated : Feb 7, 2024, 8:09 PM IST

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना एकेकाळी बंडखोरीनं झाली होती. त्याचाच आता प्रत्यय आला आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकत काकांना चितपट केल्याचं दिसून येत आहे.

Ajit Pawar Is Real NCP
Ajit Pawar Is Real NCP

मुंबई Maharashtra Politics : ​10 जून 1999 रोजी शरद पवार, पीए संगमासह तारिक अन्वर यांनी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. स्थापनेच्या एका वर्षानंतर म्हणजे 2000 मध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता.

शरद पवारांना मोठा धक्का : मात्र, आज निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयामुळं शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. आजपासून खरी राष्ट्रवादी अजित पवारांचींच असल्याचं म्हटलं जाणार आहे. निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घोषित केलं आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या सुनावणीनंतर आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटवला आहे. 24 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षात बरेच बदल झाले आहेत. शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी हा आता त्यांचा पक्ष राहिलेला नाही. जाणून घेऊया राष्ट्रवादीची स्थापना कशी झाली? त्याची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे? आता काय झाले?

शरद पवारांनी का केली बंडखोरी? : सोनिया गांधींची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडीची चर्चा हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचं कारण ठरलं होतं. शरद पवार, पीए संगमा तसंच तारिक अन्वर यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. खरं तर सोनिया गांधींनी राजकारणात प्रवेश झाल्यानंतर काँग्रेस पक्षानं त्यांना अध्यक्ष बनवण्याची तयारी सुरू केली होती, तेव्हाच शरद पवारांसह काही नेत्यांचा सोनिया गांधींचा नावाला विरोध होता.

अशी झाली राष्ट्रवादीची स्थापना : यानंतर काँग्रेसनं पवार, पीए संगमा तसंच तारिक अन्वर यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर, पीए संगमा, तारिक अन्वर यांना पक्षाचं सरचिटणीस बनवण्यात आलं होतं.

पहिल्याच निवडणुकीत मोठं यश : राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात पहिल्याच निवडणुकीत सर्वात मोठं यश मिळालं होतं. ऑक्टोबर 1999 मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता. राष्ट्रवादी पक्षानं 223 पैकी 58 जागा जिंकल्या होता. शरद पवारांनी काँग्रेसविरोधात बंड करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर 2004 मध्ये, शरद पवार यूपीएमध्ये सामील झाले होते. त्यामुळं शरद पवार 2004 ते 2014 पर्यंत यूपीए सरकारमध्ये मंत्री होते.

असा आहे राष्ट्रवादीचा राजकीय प्रवास : 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं महाराष्ट्रात 124 जागा लढवल्या होत्या. त्यातील 71 जागा त्यांना विजय मिळवता आला होता. मात्र, 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला 62 जागा निवडून आणता आल्या. 2007 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं तीन जागा जिंकल्या होत्या. मात्र, पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. राष्ट्रीयस्तरावर, पक्षानं 1999 मध्ये लोकसभेच्या आठ जागा जिंकल्या होत्या. तसंच 2004 तसंच 2009 च्या निवडणुकीत प्रत्येकी नऊ जागावर त्यांना विजय मिळवता आला होता. 2009 मध्ये, राष्ट्रवादी पक्षानं महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात 46 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 45 जागांवर त्यांचा पराभव झाला होता.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढला : निवडणूक आयोगानं एप्रिल 2023 मध्ये तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाची कामगिरी चांगली नसल्यानं त्यांचा दर्जा काढण्यात आला आहे.

अनेक वेळा राष्ट्रवादीत बंडखोरी : राष्ट्रीय पातळीवरही राष्ट्रवादीला वेळोवेळी बंडखोरीला सामोरं जावं लागलं आहे. केरळमधील एका गटानं 2002 मध्ये पक्षापासून फारकत घेतली होती, तर दुसरा गट 2004 मध्ये छत्तीसगडमध्ये वेगळा झाला होता. त्यांना सर्वात मोठा धक्का संस्थापक पीए संगमा यांनी दिला होता. त्यांनी 2004 मध्ये मेघालय युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 2012 मध्ये पीए संगमा यांनी राष्ट्रवादीला कायमचं रामराम केलं होतं. शरद पवारांनी यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळं संगमा यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला होता. त्यानंतर 2013 च्या सुरुवातीला संगमा यांनी नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना केली होती.

राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच : महाराष्ट्राच्या राजकारणात जुलै 2023 मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंडखोरी करत, भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीत पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीवर ताबा मिळविण्यासाठी काका-पुतणे आमने-सामने आले होते. अजित पवार गटानं निवडणूक आयोगाकडं धाव घेत राष्ट्रवादीवर दावा ठोकला होता. त्याचवेळी शरद पवारांनीही निवडणूक आयोगात आपलं म्हणणं मांडलं होतं. निवडणूक आयोगानं कागदपत्रं तपासून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा निर्णय दिलाय. त्यामुळं आता राष्ट्रवादीचं नाव तसंच निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्याकडंच राहणार आहे.

हे वाचलंत का :

  1. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष गमावला, सुप्रिया सुळेंनी 'ही' दिली पहिली प्रतिक्रिया
  2. राष्ट्रवादी अजित पवारांचीच! निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय आहेत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया?
  3. ईडीच्या नावाखाली वसुली करणारी महायुतीतील ती व्यक्ती कोण?- अतुल लोंढे
Last Updated :Feb 7, 2024, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.