ETV Bharat / state

महाराष्ट्र सरकारची AI ला साथ; महाराष्ट्र शासनाचा गुगलसोबत सामंजस्य करार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 10:19 PM IST

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

AI चा (Artificial Intelligence) सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं देखील AI बाबत (कृत्रिम बुद्धिमत्ता) मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार तसंच गुगल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस' तंत्रज्ञान कृषी उद्योगापासून आरोग्य क्षेत्रात वापरलं जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुणे : आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत राज्य सरकार तसंच गुगल यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण, शाश्वत विकास, स्टार्टअप क्षेत्रातील महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात स्वाक्षरी करण्यात आली. गुगलच्या मदतीनं, राज्य सरकार या क्षेत्रांमध्ये जिओडेटा मॅनेजमेंट, डायग्नोस्टिक्स, शहरी पर्यावरण, विकास, कौशल्य प्रशिक्षण यांसारख्या क्षेत्रात गुगलची मदत घेणार आहे. या सामंजस्य करारावर राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर तसंच गुगलचे भारतातील प्रमुख संजय गुप्ता यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

विविध क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर : AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं कृषी, आरोग्य क्षेत्रात शाश्वत बदलांसह सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गुगल इंडियाच्या मुंढवा येथील कार्यालयात महाराष्ट्रातील कृषी, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील विकासासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) चा वापर करण्यात येणार आहे.

AI तंत्रज्ञानामुळं झपाट्यानं बदल : आज संपूर्ण जग तंत्रज्ञानावर चालत असून तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रशासन चालवणं 'हा' अत्यंत सकारात्मक बदल आहे. गेल्या 6 महिन्यांत AI तंत्रज्ञानामुळं झपाट्यानं बदल झाले आहेत. त्यामुळं 'या' तंत्रज्ञानातही तेवढ्याच वेगानं बदल होणे अपेक्षित आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी वेगानं पावलं उचलणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं हा करार अल्पावधीत सकारात्मक दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. नवीन तंत्रज्ञानामध्ये लोकांचं जीवनमान बदलण्याची क्षमता असून अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.



कृषी क्षेत्रात शाश्वत बदल : Google जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे. Google नं तयार केलेले विविध ऍप्लिकेशन लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत करत आहेत. Google सह नागपुरात AI सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करणे, तसंच विविध 7 क्षेत्रांमध्ये शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक गुगलसोबत करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं AI च्या बाबतीत पुणे जगाच्या नकाशावर येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. आज आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शाश्वतता हवी आहे. मुख्यतः आपलं सर्व जीवन शेतीच्या शाश्वततेशी निगडीत आहे. राज्यात हवामान बदल, ओला-कोरडा दुष्काळ, असे विविध प्रश्न शेतीवर परिणाम करत आहेत. मात्र, तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण कृषी क्षेत्रात शाश्वत विकासातून बदल घडवू शकतो असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय.

Google द्वारे कौशल्य प्रशिक्षण : गुगल राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टमसह AI तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योजकता विकासासाठी काम करणार आहे. तसंच, या कराराद्वारे, Google कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण, नगर नियोजन, वाहतूक नियोजन या क्षेत्रात सहकार्य करेल. सरकारी सेवांमध्ये नावीन्य आणून सर्वसामान्यांपर्यंत सरकारी योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानही उपलब्ध होणार आहे, असं फडणवीसांनी सांगितलंय.

हे वाचलंत का :

  1. काँग्रेसचा 'हात' सोडण्यामागचं बाबा सिद्दीकींनी सांगितलं कारण; 'या' पक्षात करणार प्रवेश
  2. 'ट्रॅव्हल ट्रेड शो' प्रदर्शनात रामोजी फिल्म सिटीच्या स्टॉलला पर्यटक नागरिकांची प्रचंड पसंती
  3. मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांसह माजी आमदाराच्या घरावर आयकर विभागाचा छापा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.