ETV Bharat / state

दक्षिण मुंबईत महायुतीला पराभवाची भीती... कोणती आहेत कारणे? - South Mumbai lok Sabha constituency

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 11:58 AM IST

South Mumbai Constituency
लोकसभा मतदारसंघ

South Mumbai Constituency : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीला पराभवाची भीती असल्यामुळे येथे मनसेला जागा देण्याच्या तयारीत महायुती असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवरून महायुतीला पराभवाची भीती वाटतेय का? असा प्रश्न निर्माण होतोय.

मुंबई South Mumbai Constituency : लोकसभा निवडणूक तारखांचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी महाराष्ट्रातील जागावाटपांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागावाटपाचे दोन्ही आघाड्यांमध्ये भिजत घोंगडे पडले आहे. राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी झाली तर त्यांना कोणत्या जागा मिळणार? यावर चर्चा सुरू आहे.

पराभवाची बिल्कुल भीती नाही - सावंत : मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भौगोलिकरित्या खूप मोठा आहे. अगदी कुलाब्यापासून ते दादरपर्यंत या मतदारसंघाचा विस्तार आहे. या मतदारसंघात मराठी भाषिक नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. मागील दोन लोकसभा मतदारसंघात येथे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत हे विजयी झालेत. तसेच इथे मराठीबहुल मतदारांनी नेहमीच ठाकरेंच्या पारड्यात मतं टाकली आहेत. याचा सारासार विचार केल्यास आणि इतिहास पाहिल्यास महायुतीतील तिन्ही पक्षांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात पराभवाची भीती वाटत असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. त्यामुळे मनसेला महायुतीत घेतलं जात आहे. शेवटी ठाकरे आडनावावरून लोकांचे मत परिवर्तन होईल. येथील मराठी समाज आम्हाला मते देतील, असा महायुतीच्या नेत्यांना विश्वास वाटतो. या कारणामुळं महायुती इथे मनसेचा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. परंतु बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाच येथील मराठी माणसांची नेहमी साथ लाभली आहे. येणाऱ्या निवडणुकीतदेखील ते आम्हालाच मतं देतील. त्यामुळे येथे महायुतीतील कुठलाही उमेदवार असला तरी आम्हाला शंभर टक्के विजयाची खात्री आहे, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार सावंत यांनी व्यक्त केला.

घाबरण्याचा प्रश्न नाही - शिंदे गट : दक्षिण मुंबई मतदारसंघ जरी मोठा असला तरी या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला लोकं निवडून देतील, असं (शिवसेना) शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटले," देशपातळीवर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकासकामं होत आहेत. ही विकासकामं जनता पाहतेय. त्यामुळे दक्षिण मुंबईत ठाकरे गटातून कोणीही उमेदवार असला तरी आम्हाला घाबरण्याचं मुळीच कारण नाही. येथे महायुतीचाच उमेदवार विजयी होईल," असंही वाघमारे यांनी म्हटलंय. "राज ठाकरे महायुतीत येण्यामुळे महायुतीची आणखीन ताकद वाढली आहे. मात्र, पराभवाच्या भीतीने आम्ही मनसेला उमेदवारी देतोय," असं म्हणणं चुकीचं असल्याचं (शिवसेना) शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी म्हटलं आहे.

मतांचे वर्गीकरण होईल : "मनसे जरी महायुतीत सहभागी झाली तरी दक्षिण मुंबईसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या मतदारसंघात मनसेला उमेदवारी मिळेल, असं मला अजिबात वाटत नाही. मनसेच्या मतांची संख्या आणि मनसेचं महत्त्व फार काही मोठं नाही. एकीकडे अजित पवार गट आणि (शिवसेना) शिंदे गट यांना अधिक जागा देण्यासाठी भाजपा तयार नाही. तसेच या दोघांनाही भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढा, असं भाजपा म्हणत आहे. तीच भाजपा मनसेला दक्षिण मुंबईत उमेदवारी देतील," असं वाटत नसल्याचं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे. "राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याचं कारण म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांमुळे होणारे डॅमेज कंट्रोल करायचे. जी मराठी मतं उद्धव ठाकरेंना मिळणार आहेत, ती मतं महायुतीकडे वळवण्याचं काम राज ठाकरे करतील. परिणामी मनसेमुळे मराठी मतांचे वर्गीकरण होईल," असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. राऊत यांच्या विधानाची तक्रार निवडणूक आयोगात करणार; आशिष शेलार यांची प्रतिक्रिया - Ashish Shelar on Sanjay Raut
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.