ETV Bharat / state

महाराष्ट्रात गोळीबारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ; का होतायेत गोळीबार? कोण जबाबदार? - Firing Cases In Maharashtra

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 7:15 PM IST

Devendra Fadnavis
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

Firing Cases In Maharashtra : मागील दोन-अडीच वर्षात राज्यातील गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. महिलांवर अत्याचार, दिवसाढवळ्या हल्ला करणं, गोळीबाराच्या घटना आदीचं प्रमाण वाढलंय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार राज्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यात अपयशी ठरलेत का?,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया देताना केशव उपाध्ये

मुंबई Firing Cases In Maharashtra : राज्यात मागील काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत आणि उपनगरात गेल्या 3 महिन्यात 3 मोठ्या गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी ठाकरे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. यानंतर ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला, यात त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न : गोळीबाराच्या घटनेमुळं पक्ष वाढीसाठी आणि अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी मग्न असलेले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार राज्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यात अपयशी ठरलेत का?, सरकार राज्यातील गुन्हेगारी रोखण्यास असफल ठरले आहे का?, सरकारचं गुन्हेगारांवर नियंत्रण नाही का? असे, अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केले जात आहेत.

कोयता गँग दहशत : मागील दोन अडीच वर्षात राज्यात महिलांवर अत्याचार, दिवसाढवळ्या हल्ला करणं, गोळीबाराच्या घटना आदीचं प्रमाण वाढलंय. मागील काही दिवसांत मुंबई पुण्यासह राज्यभरात अनेक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात कोयता गँगनं दहशत माजवली होती. खुलेआम कोयता गॅंगनं हल्ला केला जात होता.

गुन्हेगारीचा ग्राफ वाढलाय? : पुण्यात जानेवारी महिनाच्या सुरुवातीलाच कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर कोथरुड परिसरात गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी मोहोळवर 3 गोळ्या झाडल्या. तर मुंबई आणि उपनगरात मागील 3 महिन्यात 3 वेगळ्या गोळीबाराच्या घटना घडल्यात. आता बॉलिवूडमधील भाईजान अभिनेता सलमान खान यांच्या घरावर गोळीबार झाल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळं राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांचं गुन्हेगारीवर नियंत्रण नसल्याची विरोधकांनी टीका केलीय. परिणामी राज्यातील गुन्हेगारीचा ग्राफ वाढत चालला असल्याचंही विरोधकांनी म्हटलंय.

त्या तत्परतेनं तपास नाही : एकीकडं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे इतरांचे पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. अन्य पक्षातील नेते आपल्या पक्षात घेण्यात मग्न आहेत. परंतु ज्या पद्धतीनं आणि ज्या तत्परतेनं त्यांनी इतरांचे पक्ष फोडून स्वतःचं सरकार स्थापन केलं. त्या तत्परतेनं सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर तपास होत नाही. ज्या जलदगतीनं तपास व्हायला पाहिजे होता. तसं होताना दिसत नसल्याचं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलंय.

गृहमंत्री फडणवीस शांत का? : तसेच सलमान खान हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभिनेता आहे. त्याची ओळख जगभरात आहे. अशा व्यक्तीच्या घरावर जर गोळीबार होत असेल तर, अगदी जलदगतीनं त्याचा तपास होणं अपेक्षित आहे. मात्र, गृहमंत्री फडणवीस म्हणत आहे की, तपास केला जाईल, पोलीस चौकशी करत आहेत, आरोपींना शोधून काढलं जाईल. सध्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात हे सरकार अयशस्वी ठरत आहे, असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलंय.



गृहमंत्री म्हणून उत्तम काम : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नसल्याची टीका विरोधकांनी केलीय. यावर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे आधीच्या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून यशस्वीपणे कारभार सांभाळला होता. आताही या सरकारमध्ये ते गृहमंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत. विरोधक हे बिनबुडाचे आरोप करत आहेत.

कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा : सध्याचं सरकारला सामान्य लोकांच्या सुरक्षेचं काहीही पडलं नाही. एकीकडं गोळीबाराच्या घटना राज्यात घडत असताना राज्याचे गृहमंत्री हे प्रचारात व्यस्त आहेत. फक्त तपास करू, चौकशी करु, आरोपींना पकडू असं उत्तर देऊन हा विषय संपवत आहेत. मात्र, अभिनेता सलमान खानसारख्या मोठ्या व्यक्तीच्या घरावर गोळीबार होतो, ही नक्कीच गंभीर घटना आहे. या सरकारवरनं कायदा आणि सुव्यवस्थाचे तीनतेरा वाजवले आहेत, असा हल्लाबोल शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार विनायक राऊत यांनी राज्य सरकारवर केला.

हेही वाचा -

  1. चंदा दो धंदा लो.. हा खेळ महाराष्ट्रात सुरू; 'श्रीकांत शिंदेंकडून 500 कोटींचा घोटाळा,' संजय राऊतांचा गंभीर आरोप - Sanjay Raut Allegations
  2. कल्याणचा गड जिंकण्यासाठी ठाकरेंची मोर्चेबांधणी, विनोद घोसाळकर यांच्यावर दिली जबाबदारी - Lok Sabha Elections 2024
  3. आदर्श ग्राम योजना कागदावर: मुख्यमंत्री पुत्रानं दत्तक घेतलेल्या गावात समस्यांचा 'डोंगर'; 'ईटीव्ही भारत'चा Exclusive रिपोर्ट - MP Shrikant Shinde
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.