ETV Bharat / state

पुनर्विकसित धारावीतील व्यावसायिकांना मिळणार जीएसटी परतावा, व्यवसायाच्या विस्तारासाठी होणार मदत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 8:16 PM IST

GST Returns To Dharavi Businessmen: राज्य सरकारच्या धारावी पुनर्वसन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील स्थानिक व्यावसायिकांना मदत करण्यासाठी राज्य वस्तू आणि सेवा कराचा परतावा दिला जाईल, अशी माहिती धारावी पुनर्वसन विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडचे ( DRPPL) मुख्य अधिकारी एस. व्ही. श्रीनिवासन यांनी दिली आहे.

Businessmen in redeveloped Dharavi
धारावी वस्ती

मुंबई GST Returns To Dharavi Businessmen : धारावी पुनर्वसन प्रकल्पानंतर येथे असलेल्या अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी चालना मिळावी म्हणून आता धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुनर्विकासामुळे धारावीतील व्यावसायिकांच्या स्वरूपात काहीसा बदल होणार आहे. म्हणूनच या प्रकल्पासाठी मदत करणाऱ्या व्यावसायिकांना राज्य सरकारनं राज्य वस्तू आणि सेवा करात परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे धारावीतील सध्या असलेल्या नवीन व्यवसायांना अधिक सक्षम करता येणार आहे. तसेच त्यांच्या फायद्यात वाढ होऊन व्यवसाय अधिक स्पर्धात्मक होईल. त्यामुळे त्यांना अनेक पटींनी संधी मिळतील, असा विश्वास 'डीआरपीपीएल'ने व्यक्त केला आहे.


केव्हा होणार कर सवलत लागू? धारावीच्या पुनर्विकासानंतर जेव्हा नव्यानं इमारती बांधल्या जाणार आहेत. त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. तेव्हा या कर सवलती लागू होणार आहेत. ''प्रकल्पाच्या निविदा, शर्तीनुसार रहिवासी प्रमाणपत्र जारी केल्याच्या दिनांकापासून औद्योगिक आणि व्यावसायिक घटक असलेल्या राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून धारावी पुनर्विकास प्राधिकरणाद्वारे राज्य वस्तू आणि सेवा कराची पाच वर्षांसाठी परतफेड केली जाणार आहे,'' असंही श्रीनिवासन यांनी सांगितलं. तसेच धारावीतील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक घटक हे परताव्यासाठी दावा करतील. तेव्हा त्यांना पुरावा म्हणून राज्य वस्तू आणि सेवा कर भरल्याचा तपशील द्यावा लागणार आहे.

'या' व्यावसायिकांनाही होणार मदत: धारावीमध्ये चामड्याच्या वस्तू तसेच कपड्यांच्या वस्तूचे उत्पादन करणारे छोटे औद्योगिक आणि व्यावसायिक गाळे मोठ्या प्रमाणात आहेत. जगभरात विकल्या जाणाऱ्या अनेक मोठ्या ब्रँडच्या वस्तू याच ठिकाणी तयार केल्या जातात. त्याची उलाढाल लाखो डॉलर इतकी आहे. या व्यावसायिकांना त्यांच्या भविष्यातील विस्तारासाठी मदत होणार आहे.

दर्जेदार जीवनशैलीसाठी प्रयत्न: ''धारावी येथील झोपडपट्टीवासियांचा अधिक चांगल्या जागेत पुनर्विकास करणे एवढाच उद्देश नाही. येथील रहिवाशांसाठी दर्जेदार जीवनशैली देणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड हा राज्य सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून तयार झालेला एक विशेष प्रकल्प आहे. माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याच्या विकासासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहेत. यामध्ये जागेची पुनर्बांधणी आणि एकत्रित जगण्याचा आनंद महत्त्वाचा असणार आहे. या प्रकल्पात वाहतूक सुविधा, पाणी, इंटरनेट आणि वीज या अत्याधुनिक अत्यावश्यक बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे,'' असेही 'डीआरपीपीएल'च्या वतीनं सांगण्यात आलं.

हेही वाचा:

  1. सचिन तेंडुलकरने जगभरातील पर्यटकांना जम्मू आणि काश्मीरचा अनुभव घेण्यासाठी दिलं निमंत्रण
  2. मुंबईकरांना पुरेसे पाणी नाही, श्वेतपत्रिका काढा- आशिष शेलार यांची मागणी
  3. प्रयागराजमधील प्रसिद्ध शाळेत विद्यार्थ्यांना दाखला देण्यासाठी महिला शिक्षिका बनली बनावट IAS, पोलिसांना फोन करून दाखवला धाक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.