ETV Bharat / state

अभिषेक घोसाळकरांची हत्या पूर्व वैमन्यस्यातून, विरोधकांकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 1:22 PM IST

Devendra Fadnavis Reaction : उबाठा गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा मॉरिस नरोना यानं गोळ्या घालून खून केला. "मॉरिस नरोनानं अभिषेक घोसाळकर यांचा खून पूर्व वैमन्यस्यातून करण्यात आला आहे. मात्र विरोधक त्याला राजकीय रंग देत आहेत," अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis Reaction
संपादित छायाचित्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई Devendra Fadnavis Reaction : दहिसर इथं गुरुवारी सायंकाळी उबाठा गटाचे माजी नगरसेवक, युवा नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवरुन विरोधकांनी गदारोळ केला आहे. याप्रकरणी विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणावर बोलताना, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही हत्या पूर्व वैमन्यस्यातून झाली असल्याचं स्पष्ट केलं. विरोधी पक्ष याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुंबईत आपल्या निवासस्थानी ते बोलत होते.

दोघांमध्ये इतका बेबनाव कशासाठी? : याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काल घडलेली अभिषेक घोसाळकर यांच्या बद्दलची घटना ही अत्यंत दुःखद आहे. ज्या पद्धतीनं एका युवा नेत्याचं अशा पद्धतीनं निधन झालं आहे. हे अत्यंत गंभीर आहे. एकूणच या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग द्यायचा प्रयत्न करत आहेत. ते देखील योग्य नाही. या घटेनमध्ये ज्यांनी गोळ्या घातल्या तो मॉरीस आणि अभिषेक घोसाळकर या दोघांचे एकत्रित पोस्टर्स आपण पाहिले आहेत. हे दोघंही एकत्रित काम करत होते. आता कुठल्या गोष्टीवरुन त्यांच्यात इतका बेबनाव झाला, की मॉरीसनं अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर स्वतःलाही मारून घेतलं. हा महत्त्वाचा संशोधनाचा विषय आहे."

पूर्व वैमन्यस्यातून प्रकरण घडलं : देवेंद्र फडणवीस पुढं म्हणाले की, "या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत. त्या योग्यवेळी आपल्या समोर उघड केल्या जातील. विविध कारणं समोर येत आहेत, ती सर्व एकत्रित करून आपल्या समोर आणली जातील. मला माहीत आहे घटना गंभीर आहे. पण या घटनेचं राजकारण करू नये. या घटनेवरुन राज्यातील कायदा सुव्यवस्था संपलेली आहे, असं समजण्याचं कारण नाही. कारण वैयक्तिक वैमन्यस्यातून घडलेली ही घटना आहे. तथापि बंदुका असतील, लायसेन्स असतील, ते होते की नाही. नव्हते मग बंदूक आली कोठून किंवा अशा प्रकारचे लायसेन्स देताना काय खबरदारी घ्यावी, अशा प्रकारचा विचार राज्य सरकार नक्की करेल."

राजकीय रंग देण्याचा प्रयत्न : विरोधी पक्षानं या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हे पूर्णपणे राजकीय आरोप आहेत. आता तर आमच्या विरोधी पक्षांची अवस्था अशी आहे, की आता एखाद्या गाडीखाली एखादा श्र्वान आला तरी ते, गृहमंत्री यांचा राजीनामा मागतील. एखाद्या गंभीर घटनेसाठी त्यांनी राजीनामा मागितला तर मला काही वाटणार नाही. पण त्यांना सुद्धा माहrत आहे की, वैयक्तिक वैमन्यस्यातून घडलेली ही घटना आहे. परंतु विरोधी पक्ष त्यांचं काम ते करत आहेत," असंही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा :

अभिषेक घोसाळकर खून प्रकरण नेमकं काय ? 'मॉरिस भाई'नं का केला थंड डोक्यानं खून आणि नंतर आत्महत्या...!

अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव निवासस्थानी दाखल; दुपारी होणार अंत्यसंस्कार, उद्धव ठाकरेंसह दिग्गज राहणार उपस्थित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.