ETV Bharat / state

दादरचा कबुतरखाना ताडपत्रीने टाकला झाकून; मंत्री लोढा यांची महापालिका आयुक्तांकडे हस्तक्षेपाची मागणी

मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी कबुतरखाना ताडपत्रीने झाकून टाकला आणि लोकांना कबुतरांना खाऊ घालू नये, असा इशारा देणारा फलक लावल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी हे पत्र लिहिले आहे.

Dadar pigeon house covered with tarpaulin
दादरचा कबुतरखाना ताडपत्रीने टाकला झाकून (Source- ETV Bharat)
author img

By PTI

Published : August 4, 2025 at 10:40 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी रविवारी दादरमधील कबुतरखाना या वारसा लाभलेल्या वास्तूला ताडपत्रीने झाकून टाकले आणि कबुतरांना खायला घालणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याने त्या ठिकाणी सार्वजनिक प्रवेश प्रतिबंधित केला. मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतर महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्तांकडे हस्तक्षेपाची मागणी केलीय.

एक सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन : मुंबई उपनगरीय जिल्हा प्रभारी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात संत आणि प्राणीप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन आणि न्यायालयाच्या निर्देशांचा आदर करून यावर एक सौहार्दपूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केलंय. मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी कबुतरखाना ताडपत्रीने झाकून टाकला आणि लोकांना कबुतरांना खाऊ घालू नये, असा इशारा देणारा फलक लावल्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी हे पत्र लिहिले आहे.

लोकांच्या आरोग्यालाही धोका : काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाऊ घालणे हे सार्वजनिकरीत्या त्रासदायक कृत्य आहे आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो, असे म्हटले होते. न्यायालयाने मुंबई महापालिकेला अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला महानगरातील जुने वारसा असलेले कबुतरखाने (कबुतरांना खायला घालण्याची ठिकाणे) पाडण्यास मनाई केली होती आणि या ठिकाणी पक्ष्यांना खायला घालण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते.

कबुतरांना खायला देण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करा : मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या पत्रात दावा केला होता की, खायला दाणे नसल्यामुळे रस्त्यावर कबुतर मृतावस्थेत आढळत आहेत, ज्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होतो. मंगल प्रभात लोढा यांनी पत्रात म्हटले आहे की, "मुंबई महापालिकेनं कबुतरांना खायला देण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासह व्यापक कल्पना स्वीकारल्या पाहिजेत. बीकेसी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनीमध्ये मोकळ्या जागा आहेत, जिथे पर्यायी जागा निर्माण करता येईल. म्हणून आयुक्तांनी याचा विचार करावा आणि उपाय सुचवावा, असा सल्लाही मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिला आहे.