ETV Bharat / state

मराठा आरक्षणासाठी सरकारचा नवा अध्यादेश; मनोज जरांगेंशी करणार चर्चा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2024, 10:48 PM IST

Updated : Jan 26, 2024, 11:00 PM IST

Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारनं नवीन अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश घेऊन शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा बैठक झालीय.

Maratha Reservation
Maratha Reservation

मुंबई Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं असून, मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाचा नवा अध्यादेश सरकारनं काढला आहे.

नवीन अध्यादेश निघाला : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार शासनाकडून नवीन अध्यादेश काढण्याबाबतची बैठक शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. नवा अध्यादेश जरांगे पाटील यांना लवकरच कळवला जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.

जरांगे पाटील यांची भेट घेणार : सरकारी शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री उशिरा जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. ही बैठक काही तास चालणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण जरांगे पाटील मराठा आरक्षणाशी संबंधित अध्यादेशावर अभ्यासक, कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज नवी मुंबईत दाखल झाला आहे. आज वाशीत सरकारी अधिकारी आणि मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या. यात सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी त्यांनी केली होती. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत यासंदर्भात नवा अध्यादेश काढण्यात आला आहे.

जरांगे पाटील यांची भूमिका : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव भांगे उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे जरांगे पाटील यांनी शनिवारी दुपारपर्यंतची वेळ सरकारला दिली आहे. त्यापूर्वी योग्य तो जीआर काढला नाही, तर आझाद मैदानाकडे मोर्चा नेऊन पुन्हा उपोषण सुरू केलं जाईल, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

हे वाचलंत का :

  1. आजची रात्र इथंच, उद्या आझाद मैदानावर जाणार; मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा
  2. मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी 'असं' सुरू आहे सर्वेक्षण; 'ईटीव्ही भारत'चा ग्राऊंड रिपोर्ट
  3. आझाद मैदानातून माघार घेण्यास मराठा आंदोलकांचा नकार
Last Updated : Jan 26, 2024, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.