ETV Bharat / state

सरपंच ते आमदार : अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडेंचा असा आहे राजकीय प्रवास - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 9:19 AM IST

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीनं अमरावती लोकसभा निवडणूक 2024 साठी बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. बळवंत वानखेडे यांनी लिपिक पदावर सेवा बजावली असून स्वेच्छा निवृत्ती घेऊन ते राजकारणात आले आहेत. त्यानंतर त्यांनी सरपंच पदापासून आपल्या राजकारणाला सुरुवात केली.

Lok Sabha Election 2024
बळवंत वानखेडे

अमरावती Lok Sabha Election 2024: अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीनं आपला उमेदवार घोषित केला आहे. उमेदवार म्हणून काँग्रेस नेते बळवंत वानखडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा गुरुवारी रात्री करण्यात आली. राजकारणात सरपंच ते आमदार असा 19 वर्षांचा बळवंत वानखडे यांचा प्रवास अतिशय रंजक आहे.

कनिष्ठ महाविद्यालयात होते लिपिक : दोन जुलै 1969 चा जन्म असणारे बळवंत वानखडे हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात येणाऱ्या लेहगाव येथील मूळ रहिवासी आहेत. कला शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यावर त्यांनी दर्यापूर तालुक्यातील फिलोरी येथील डी. झेड. वाकपांजर वोकेशनल महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावली. स्वेच्छा निवृत्ती घेतल्यावर 2005 मध्ये त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे उमेदवार म्हणून लेहगाव ग्रामपंचायतची निवडणूक लढवली. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाल्यावर त्यांनी गावाचं सरपंच पद देखील भूषवले. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून ते तीन वेळा निवडून आलेत. 2012 ते 2017 दरम्यान खल्लार, गायवाडी सर्कलमधून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. 2017 ते 2019 दरम्यान त्यांनी जिल्हा परिषदेत सभापती म्हणून देखील जबाबदारी पार पाडली.

विधानसभा निवडणुकीत आधी पराभव नंतर विजय : बळवंत वानखडे यांनी 2014 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई गटाशी बंड करून अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या दर्यापूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बळवंत वानखडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेचे अभिजीत अडसूळ यांना टक्कर देत त्यांचा पराभव केला.

लोकसभा निवडणुकीसाठी दोन वर्षांपासून चर्चेत : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजपानं शिवसेनेच्या शिंदे गटासोबत महायुतीचं सरकार स्थापन केलं. त्यानंतर अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. या राजकीय उलथा- पालथीमुळे अमरावती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बळवंत वानखडे यांचं नाव समोर आलं. काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखडे यांनाच अमरावतीत उमेदवारी मिळावी, यासाठी मोठे प्रयत्न केलेत. बळवंत वानखडे यांचा सर्व समाजामध्ये बऱ्यापैकी संपर्क आहे. भाजपाकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नाही. दुसरीकडं काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या उमेदवारीचं महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; शाहू महाराज, रवींद्र धंगेकर, प्रणिती शिंदे रिंगणात - Congress Candidate List
  2. Lok Sabha Elections 2024: कोणता झेंडा घेवू हाती? राज ठाकरे-अमित शाह भेटीनंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसैनिक संभ्रमात
  3. राऊत यांच्या विधानाची तक्रार निवडणूक आयोगात करणार; आशिष शेलार यांची प्रतिक्रिया - Ashish Shelar on Sanjay Raut
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.