ETV Bharat / state

शिंदे अन् अजित पवार गटाच्या बारा वाजण्याची कार्यकर्त्यांना भीती; एक आकडी जागा मिळण्याची शक्यता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 5:19 PM IST

BJP seat sharing Shinde Sena NCP : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीमधील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यावर आली आहे. मात्र, भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला मिळून केवळ 12 जागा देण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे या दोन्ही गटाचे मिळून बारा वाजण्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबई BJP seat sharing Shinde Sena NCP : महायुतीच्या जागा वाटपासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बैठका होत आहेत. राज्यात झालेल्या बैठकांनंतर काल शुक्रवार (दि. 8 मार्च) रोजी रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेदरम्यान महायुतीकडून घटक पक्षांना नवा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहे भाजपाचा प्रस्ताव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांची राज्यातील सद्यस्थितीत असलेली ताकद, लोकांमध्ये असलेले मत आणि उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता या विषयांवर सांगोपांग चर्चा झाल्याची माहिती पक्षातील नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ पाच जागा देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी नऊ जागांची मागणी केली होती. तर शिवसेना शिंदे गटाने आपल्याकडे असलेल्या विद्यमान खासदारांच्या जागांसह अन्य चार जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती. मात्र, त्यांनाही केवळ सात जागा देण्याचा प्रस्ताव भाजपातर्फे देण्यात आला आहे. दोन्ही पक्षांना मिळून भाजपाकडून केवळ 12 जागा दिल्या जाणार आहेत अशी माहिती पक्षातील एका नेत्याने दिली आहे.

काय आहेत कारणे : या चर्चेदरम्यान भारतीय जनता पार्टीकडून या दोन्ही मित्र पक्षांना केलेल्या सर्वेक्षणाचं कारण देण्यात आलं. भारतीय जनता पार्टीने केलेल्या सर्वेक्षणानंतर राज्यातील परिस्थिती पाहिली असता शिंदे गट आणि अजित पवार गट यांना यापेक्षा जास्त जागा दिल्यास अडचण निर्माण होऊ शकते. भारतीय जनता पार्टीला काहीही करून 45 जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे जर या जागा निवडून आणायच्या असतील, तर भारतीय जनता पार्टीनेच अधिक जागा लढवणं गरजेचं असल्याचं या पक्षांना सांगण्यात आलं आहे.

जागा अदला बदलीची शक्यता : जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी मित्र पक्षांच्या काही जागा बदलण्याची अथवा उमेदवार बदलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज्यातील काही जागांवर उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे, यामध्ये रत्नागिरी, रायगड, संभाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. एकूणच भारतीय जनता पार्टीने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला बारापेक्षा अधिक जागा द्यायला प्रथम दर्शनी असमर्थता दर्शवल्याने आता या दोन मित्र पक्षांचे बारा वाजल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

हेही वाचा :

1 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांची 'दिल्ली वारी' ; अमित शाहांसोबत रात्री पार पडली बैठक

2 "गल्लीतील नेत्यानं...", नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या ऑफरवर फडणवीसांचं उत्तर

3 "आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा भास्कर जाधव बॅग भरुन तयार होते, पण..."; आमदार योगेश कदमांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.