ETV Bharat / state

Modi Language : छत्रपती शिवरायांमुळे प्रचारात आली मोडी लिपी; जिल्हा परिषद शाळेतील दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिकून रचला इतिहास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 2:39 PM IST

Modi Language : छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोडी लिपी (Ancient Modi Script) प्रचारात आणली. मात्र त्यानंतर ऐतिहासिक मोडी लिपी लोप पावण्याच्या मार्गावर होती. आता मात्र सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या विजयनगर इथल्या जिल्हा परिषदेच्या दुसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोडी लिपी शिकली आहे.

Student Learn Modi Language
मोडी लिपी शिकताना विद्यार्थी

मुंबई Modi Language : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्रव्यवहारामुळे सोळाव्या शतकापासून मोडी लिपी राज्यात प्रचलित आहे. आजही पुराभिलेखागारात जाऊन इतिहासाचा अभ्यास करायचा, तर मोडी लिपीशिवाय पर्याय नाही. मात्र आता मोडी लिपीचे (Ancient Modi Script) जाणकार कमी झाले असून मोडी लिपी लोप पावते की काय अशी स्थिती होती. मात्र आता जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी ही कमी भरुन काढत आहेत. ही लिपी 12 व्या शतकापासून महाराष्ट्राच्या भूमीत दक्षिण भरतात सातत्यानं वापरली जात होती. आता सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील विजयनगर प्राथमिक शाळेतील दुसरीतील आणि चौथीतील विद्यार्थ्यांनी मोडी लिपी शिकली आहे, त्याबाबतचा हा खास लेख.

मोडी लिपी आम्हाला बिलकूल माहीत नव्हती. आमच्या बालाजी जाधव सरांनी आम्हाला मोडी लिपी शिकवली. आता मी मोडी लिपी वाचतो, लिहितो. मला त्याचा अर्थ कळतो त्यामुळे भविष्यात खूप फायदा होईल. - स्मित जाधव, विद्यार्थी

दुसरीतील विद्यार्थ्यांनी मोडी शिकून रचला इतिहास : भाषा म्हणजे जी तोंडानं बोलली जाते आणि लिपी म्हणजे जी हातानं किंवा आता संगणकावर लिहिली जाते. देवनागरी लिपी आणि मोडी लिपी यामध्ये सारखेपणा आहे. फक्त मोडीमध्ये शब्द मोडून लिहितात. मोडी लिपीला बाराव्या शतकापासूनचा मोठा इतिहास आहे. याच दुर्लक्षित राहिलेल्या मोडी लिपीला पुनः पुढील पिढी समोर आणण्याचं काम जिल्हा परिषदेच्या विजयनगरचे प्राथमिक शिक्षक बालाजी जाधव यांनी केलं आहे. इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी ही मोडी लिपी शिकून एक नवा इतिहासच रचला आहे.

कशी शिकवली मोडी लिपी : शिक्षक बालाजी जाधव यांनी स्वतः आधी अनेक दिवस मेहनत घेऊन मोडी लिपीतले अक्षर, शब्द आणि वाक्य शिकून घेतले. मग मुलांना शिकवायला सुरुवात केली. आधी अक्षरं मग त्यांना काना लिहिणं, मग त्याच्यावर मात्रा देणं आणि मग वेलांटी, उकार अशा रितीनं त्यांनी मुलांना शिकवायला सुरुवात केली. आधी स्मार्ट बोर्डवर छोटासा व्हिडिओ दाखवायचा आणि मग फलकावर ते स्वतः विद्यार्थ्यांना लिहून दाखवायचे, अशा रितीनं विद्यार्थी मोडी लिपी शिकू लागले. आता तर मोडीचं भाषांतर मराठीत करू लागले. केवळ याचवर्षी दोन महिन्याच्या काळात विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन ही मोडी लिपी शिकलेली आहे.

आजोबाला येईना मोडी, नातू सांगतो समजावून : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी मोडी लिपी शिकले आहेत. याविषयी पालक मुरलीधर कुलिंग म्हणतात "जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मुलांना मोडी भाषेची गोडी लावली. आपल्या प्राचीन भाषेविषयी मुलांना गोडी निर्माण झाली ते चांगलं लिहू लागले. आम्हाला आनंद वाटतोय. मुलं खेळताना घरात आली तरी, मोडीमध्ये लिहितात, बोलतात वाचतात. त्यामुळे आम्हाला हे विशेष वाटतंय. आमचं सत्तर वय झालं तरी मोडी येईना. नातू मात्र मोडी वाचून समजावून सांगतोय!"

आपली मोडी लिपी आता होणार ऑनलाईन : जिल्हा परिषदेचे शिक्षक बालाजी जाधव म्हणाले ,"या शाळेतील 2 री ते 4 थीच्या मुलांनी मोडी लिपी समजून घेण्याचा प्रयत्न केला. इतर लिपी जशी शिकतात, तशीच मोडी लिपी त्यांनी शिकली. आता मोडी लिपी त्यांना बऱ्यापैकी अवगत झालेली आहे. प्रथम स्मार्ट बोर्डवर मुलांना मोडी लिपी बाबतचे व्हिडिओ दाखवले. त्यानंतर वर्गातील फलकावर त्या रितीनं लिहिणं, गिरवणं, वाचन करणं असे प्रात्यक्षिक मुलांसमोर केले गेले. त्यानंतर विद्यार्थी काना, मात्रा, वेलांटी लिहू लागले. पूर्ण शब्द लिहू लागले. नंतर वाक्य लिहू लागले आणि मराठीचा अनुवाद मोडीमध्ये मोडीचा अनुवाद मराठीमध्ये करू लागले. जर देशातील कोणत्याही विद्यार्थ्यांना मोडी शिकायचे असेल, तर ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा आता मोडी शिकवता येऊ शकेल. जगामध्ये देखील कोणाला तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही भाषा आता शिकता येऊ शकेल."

हेही वाचा :

  1. कराडमधील एसबीएस कॉलेजमध्ये तलाठी, वकील, शिक्षक गिरवताहेत मोडी भाषेचे धडे, पाहा व्हिडिओ
  2. ईटीव्ही भारत विशेष: मोडीची गोडी वाढली; तरुणांचा मोडी शिकण्याकडे कल
  3. मोडी भाषेत सलग पाचव्या वर्षी दिवाळी अंक; पुण्यातील अभ्यासकाचा स्तुत्य उपक्रम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.