ETV Bharat / state

टीकेचा वार, शरद पवार! कायम पवारच का होतात विरोधकांचे टार्गेट? वाचा खास रिपोर्ट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 6:58 PM IST

BJP leaders criticizes Sharad Pawar : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतीही आघाडी असो शरद पवार यांच्याशिवाय ती पूर्ण होत नाही. म्हणूनच शरद पवार यांच्यावरच टीकेची झोड उठवली तर आघाडीच्या अन्य घटक पक्षांवर त्याचा आपोआप परिणाम होतो, हे ध्यानात घेऊनच त्यांना लक्ष्य केलं जात आहे अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबई : BJP leaders criticizes Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. प्रश्न काहीही असला तरी लक्ष्य शरद पवारांनाच केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर थेट टीका न करता राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे नेतृत्व अजित पवार पक्षात मोठं बंड करून महायुतीत गेले. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जाहीर टीका केली. त्या पाठोपाठ आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवार यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

काय आहेत पवार यांच्यावर टीका करण्याची कारणं : शरद पवार हे राज्याच्या राजकारणात नेहमी महत्त्वाच्या भूमिकेत राहिले आहेत. गेली 40 वर्ष शरद पवार यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. देशाच्या आणि राज्याच्या विकासात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे. सध्या महाराष्ट्रात शरद पवार हे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. महाविकास आघाडी आणि देशात झालेल्या इंडिया आघाडीतील ते महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्यावर जर टीका केली तर निश्चितच महाविकास आघाडी अथवा इंडिया आघाडीचे खच्चीकरण होईल, हा यामागचा मुख्य हेतू असल्याचं राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड सांगतात.

प्रत्यक्षात जे बोलतात त्यापेक्षा वेगळी कृती : शरद पवार यांचं राजकारण हे नेहमी तिरक्या चालीचं राहिलं आहे. ते प्रत्यक्षात जे बोलतात त्यापेक्षा ते वेगळी कृती करत असतात आणि त्याचा थेट परिणाम साधला जातो. त्यामुळे शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर महाराष्ट्रात त्या व्यक्तीला वलय प्राप्त झालं आहे अशी अनेक उदाहरणं आहेत. सर्वात आधी गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्या विरोधात टीका करत महाराष्ट्रात आक्रमक भूमिका घेतली आणि त्यानंतर राज्यात युती सत्तेवर आली होती. महादेव जानकर यांनी शरद पवार यांच्या विरोधात उघडपणे टीका आणि आघाडी उघडल्यानंतर त्यांना युतीने सामावून घेत मंत्री केलं. तर, शरद पवार यांच्यावर उठसूट टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनाही भाजपाने आमदारकी बहाल केली. यातच शरद पवार यांच्यावरील टीका किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट होतं असं गायकवाड यांचं म्हणणं आहे.

शरद पवार यांच्याबद्दल असूया : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचिव दत्ताजीराव देसाई म्हणाले की, शरद पवार यांचं कार्य हे देशाला आणि राज्याला माहीत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे शरद पवार यांना गुरू मानतात तसा जाहीर उल्लेख करतात आणि दुसरीकडे त्यांच्यावर टीका करतात. त्यामुळे त्यांच्या पक्षातील बावनकुळे यांच्यासारख्या व्यक्ती ही त्यांची पात्रता नसताना शरद पवार यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत दाखवतात. वास्तविक फळाने भरलेल्या झाडाला दगड मारले तरच आपल्या पदरात काही फळं पडतील या आशेने हे लोक शरद पवार यांच्यावर टीका करीत असतात. त्याशिवाय आपल्याला कोणीही मोठं म्हणणार नाही ही धास्ती त्यांना आहे. म्हणून पवार यांच्यावर टीका होत राहते. परंतु या टीकेचा त्यांच्या राजकारणावर कधीच परिणाम झाला नाही आणि होणार नाही, असा दावा दत्ताजी देसाई यांनी केला आहे. सुनील शेळके सारख्या व्यक्तीला पवार यांनी दम देण्याचा प्रश्नच येत नाही. कारण, धमकी देण्याचं राजकारण पवारांनी कधीच केलं नाही असंही देसाई म्हणाले आहेत.

पवारांचाही केव्हातरी जातो तोल : शरद पवार हे अत्यंत संयमी असं नेतृत्व मानलं जातं. मात्र, शरद पवार यांचाही कधी कधी बोलताना तोल गेल्याचं पाहायला मिळालं आहे. जेव्हा परिस्थिती अत्यंत विपरीत होते. आपल्या हाताबाहेर जाणार आहे, असं शरद पवार यांच्या लक्षात येतं तेव्हाच त्यांचा तोल गेलाय हे यापूर्वीच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे. पद्मसिंह पाटील जेव्हा भारतीय जनता पक्षात गेले तेव्हा शरद पवार यांना माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि त्यांनी पद्मसिंह पाटलांच्या विरोधात जाहीर वक्तव्य केलं. आताही बारामती मतदारसंघाचा भाग असलेल्या आमदार सुनील शेळके हे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलतानाही पवार यांनी लक्षात ठेवा मी शरद पवार आहे, अशा शब्दात त्यांना इशारा दिला आहे.

हेही वाचा :

1 शिरूर लोकसभा मतदार संघाचा तिढा कायम! उमेदवार कोण असणार; नेता की अभिनेता?

2 माजू पाहणाऱ्या हुकूमशहाचे मर्दन करून भारतमातेचं रक्षण करा - उद्धव ठाकरे

3 सुधा मूर्ती यांना राज्यसभेचे खासदार म्हणून नामांकन, पंतप्रधान मोदी यांनी केलं अभिनंदन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.