ETV Bharat / state

६२ वर्षीय वृद्धाला लुटणाऱ्या आरोपीला बेड्या, पाच गुन्ह्यांची झाली उकल - Mumbai Crime News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 6:44 PM IST

Mumbai Crime News : शहरात दागिने हिसकावण्याचे प्रकार घडत आहेत. पायी जात असलेल्या ६२ वर्षीय महिलेला दोन अनोळखी व्यक्तीनी अडवून लुटल्याची घटना शहरातील साने गुरुजी मार्गावर घडलीय. याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी (Taddev Police) आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime News
आरोपीला बेड्या (ETV Bharat)

मुंबई Mumbai Crime News: वृद्धांना बोलण्यात गुंतवत लुटणाऱ्या ३८ वर्षीय ठगाला गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने हिंगोलीतून बेड्या ठोकल्या आहेत. सुनिल सरदारसिंग शिंदे उर्फ सुनिल विठ्ठल मावरे उर्फ देवीदास रामदास मावरे उर्फ राहुल नारायण खिल्लारे असं आरोपीचं नाव आहे. गुन्हे शाखेनं पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने ताडदेव पोलिसांच्या (Taddev Police) ताब्यात आरोपीला दिले असल्याची माहिती, कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी दिलीय.

दागिने काढण्यास पाडले भाग : साने गुरुजी मार्गावरुन २२ एप्रिलच्या दुपारी साडेबाराच्या सुमारास पायी जात असलेल्या ६२ वर्षीय महिलेला दोन अनोळखी व्यक्तीनी अडवलं होतं. बने कंपाऊंडमध्ये गरीब गरजू व्यक्तींना कपडे आणि पैशांचे वाटप सुरु असल्याची बतावणी करत या दोघांनी कपडे आणि पैसे मिळण्यासाठी गरीब दिसणं आवश्यक असल्याचं सांगितलं. दोघांनी तक्रारदार यांना गळ्यातील सोनसाखळी, बोटातील अंगठी, कानातील साखळी असे एकूण २३ ग्रॅम वजनाचे दागिने काढण्यास भाग पाडले.

दागिने केले लंपास : दागिने पिशवीमध्ये ठेवत असल्याचं भासवून त्यांनी हातचलाखीनं ते लंपास करून पळ काढला. दोघेही निघून गेल्यानंतर तक्रारदार यांनी पिशवीतील त्यांचे दागिने बघितले असता ते दिसून आले नाहीत. त्या दोघांनी आपली फसवणूक केल्याची खात्री पटल्यानं तक्रारदार यांनी ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या कक्ष तीनचे प्रभारी पोलिस निरक्षक दिपक सुर्वे यांच्या नेतृत्वातील पथकानं गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.

आरोपीला केली अटक : गुन्ह्यातील आरोपी सुनिल सरदारसिंग शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अशाच प्रकारच्या फसवणुकीचे १० गुन्हे नोंद असल्याची माहिती कक्ष तीनला मिळाली. आरोपी शिंदे हा अकोला, हिंगोली, परभणी अशा ठिकाणी वास्तव्याची ठिकाणे बदलत होता. तो हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने चोंडी रेल्वे स्थानकात सापळा रचून शिंदे याला ताब्यात घेत अटक केली. आरोपी शिंदे याने २०२४ मध्ये ताडदेव, शाहूनगर, वडाळा आणि वाकोला पोलीस ठाण्यातील एकूण पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्या आणखी कसून चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. बलात्कार करुन 1984 मध्ये दाऊद झाला होता फरार; तब्बल 40 वर्षानंतर ठोकल्या बेड्या - Rape Accused Arrested
  2. अत्याचाराच्या घटनेनं नागपूर हादरलं : सामोसे कारागीराचा दोन चिमुकल्यांवर तर बालकाचा चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार - Minor Girls Raped In Nagpur
  3. आयपीएल सामन्यावर सट्टा; छत्तीसगडमधील तीन सट्टेबाज गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त - Betting on IPL Match
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.