ETV Bharat / state

"अब की बार भाजपा तडीपार"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, 'या' खासदाराला आडवं करण्याचा इरादा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 8:30 PM IST

Uddhav Thackeray : लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. यासाठी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेनं प्रचारासाठी कंबर कसली आहे. 'अब की बार भाजपा तडीपार' असा नाराच उद्धव ठाकरेंनी दिलाय.

Uddhav Thackeray
उध्दव ठाकरे

उद्धव ठाकरे भाजपाच्या धोरणांवर टीका करताना

नवी मुंबई Uddhav Thackeray : लोकसभा 2024च्या निवडणुकीसाठी लवकरचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांचा गट सज्ज झाला असून मावळ लोकसभा मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू आहे. विशेष म्हणजे, मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ठाकरे गटाची नाराजी स्पष्ट दिसत असून, "गद्दाराला पुन्हा मतदार संघात उभा करू नका", असं आव्हान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथील जाहीर सभेत केलं. "अबकी बार भाजपा तडीपार" हेच धोरण ठेवून निवडणूक लढू. ही लोकसभेची निवडणूक मोदींच्या विरुद्ध नसून हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

'या' पवित्र भूमीत भगवाच फडकणार : रायगड आणि मावळ मतदार संघ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत भगवाच फडकणार, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी पनवेलच्या जाहीर सभेत व्यक्त केला. "या निवडणुकीत जर भाजपाचं सरकार आलं तर देशातील या निवडणुका शेवटच्या ठरणार. "मी पुन्हा येईन, पुन्हा येईन", असा विश्वास असणारे फोडाफोडीचं राजकारण कशाला करत आहेत? भाजपाला शिवसेनेनं संकटात साथ दिली. त्या शिवसेनेलाच भाजपा संपवायला निघाला आहे. शिवसेनेन जर भाजपाला खांदा देऊन महाराष्ट्र फिरवला नसता तर भाजपाला महाराष्ट्रात खांदा द्यायलाही चार लोकं जमली नसती. या अगोदर भाजपा सारखे नतदृष्ट राजकारणी या देशात जन्माला आले असतील, असं मला वाटत नाही," असेही ताशेरे भाजपावर उद्धव ठाकरेंनी ओढले.

'त्या' खासदाराला आडवं करणार : शिंदे गटात पक्षप्रवेश करणारे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावरही उद्धव ठाकरेंनी ताशेरे ओढले. गद्दारी केलेल्या खासदाराला आडवा करणार. ज्या पक्षाचे सरकार आले त्या पक्षात सामील होऊन पक्षप्रवेश करणाऱ्या दुकानदारांचे देखील दुकाने बंद करणार, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.


'अब की बार भाजपा तडीपार' : उद्धव ठाकरे भाजपावर निशाना साधताना म्हणाले की, "आजपर्यंत भाजपासारखा खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आला नव्हता. 2014 पासून काँग्रेसच्या योजनांचं नामांतरण भाजपानं केलं आणि त्याचं श्रेय स्वतः घेतलं. मावळ मधील गद्दार खासदाराला ओळख शिवसेनेनं दिली. नरेंद्र मोदी म्हणतात, काँग्रेसनं देशाला लुटलं; मात्र खातेनिहाय चौकशी केली तर भाजपाच्या खात्यात सर्वांत जास्त पैसे आहेत. मग देशाला कोणी लुटलं?'', असाही सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

भाजपा ही भ्रष्टाचारी वृत्ती : 'पी एम केअर फंड'मध्ये लाखो रुपये जमा आहे. त्याचा मालक कोण? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. ''भाजपाच्या लोकांनी महाराष्ट्राला मदत न करता पीएम केअर फंडाला मदत केली. भाजपानं शिवसेना फोडली. मोदींनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर अजित पवार त्यांचे आमदार घेऊन भाजपाकडे गेले. निर्मला सीतारमण यांनी सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केल्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये गेले. भाजपा पक्ष नसून भ्रष्टाचारी सडकी कुचकी वृत्ती आहे. ही वृत्ती देशातून संपवावी लागणार. त्यामुळे 'अब की बार भाजपा तडीपार' केल्यानंतरच 'अच्छे दिन' येतील. सध्या येणारी लोकसभेची निवडणूक ही मोदींच्या विरुद्ध नसून हुकुमशाही विरुद्ध आहे,'' असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

तरीही बाळासाहेबांची शिवसेना अजिंक्यच राहणार : ''कितीही डुप्लिकेट शिवसेना येऊ द्यात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच महाराष्ट्र तसेच देशात अजिंक्य राहणार. इथल्या खासदारानं बेईमानी केली. त्यामुळे मावळमध्ये संजय वाघोरे यांच्यावर मावळमधली जबाबदारी सोपवून इथली गद्दारी कायमस्वरूपी गाडण्याची मोठी जबाबदारी आहे. ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीला कलंकित करण्याचं काम केलं त्याला इथली जनता माफ करणार नाही. संपूर्ण देशातील तडीपार आणि भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन भाजपा पक्ष उभा राहिला आहे. चोर, दरोडेखोर आणि संपूर्ण देशातील तडीपार, बलात्कारी लोकांचा भाजपा हा पक्ष आहे,'' अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली.

हेही वाचा :

  1. मराठा आंदोलक आक्रमक; संभाजीनगरमध्ये अमित शाह यांच्या सभेचं बॅनर फाडलं; आंदोलकांची घोषणाबाजी
  2. जागा वाटपावरून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर; तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील - शंभूराज देसाई
  3. सासूला सांभाळण्याची सुनेचीच जबाबदारी दरमहा दहा हजार रुपये देखभाल खर्चही द्यावा, उच्च न्यायालयाचा निर्णय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.