ETV Bharat / state

चिमुरड्याचं अपहरण, खंडणी अन् निर्घृण हत्या; मोबाईल लोकेशनमुळं आरोपी सापडले, दोन भावांना अटक - Boy Killed For Ransom

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 9:49 PM IST

Updated : Mar 25, 2024, 10:35 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Minor Kidnapped And Killed : एका बारा वर्षाच्या मुलाचं शेजारी राहणाऱ्यांनी अपहरण करून त्याच्या वडिलांकडं २३ लाख रुपये खंडणीसाठी कॉल केला. त्यानंतर त्या चिमुरड्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

माहिती देताना पोलीस अधिकारी

ठाणे Minor Kidnapped And Killed : खंडणीसाठी चिमुरड्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर-कर्जत मार्गावर असलेल्या गोरेगावात घडली. याप्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे भयानक कृत्य करणाऱ्या दोन भावांसह त्यांच्या कुटूंबातील पाच जणांना तीन तासातच गजाआड करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आलंय. सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफूआन मौलवी अशी अटक केलेल्या दोन भावांची नावं आहेत.

चिमुरड्याचं केलं अपहरण : मृत मुलगा हा कुटुंबासह अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर-कर्जत मार्गावर असलेल्या गोरेगावात राहत होता. तर त्याच्या शेजारीच आरोपी सलमान व सफूआन कुटूंबासह राहत आहेत. सलमान हा बदलापूरमधील गॅरेजवर तर दुसरा आरोपी हा वाईंडिंगचं काम करतो. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या घराचं नव्यानं उभारणीचं काम सुरू आहे. घर बांधण्यासाठी पैशाची गरज होती. त्याकरीता मृताच्या शेजारी राहणारा आरोपी सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफूआन मौलवी या दोघांनी २४ मार्च रोजी एक प्लॅन केला होता. त्याचदिवशी मृत मुलगा हा सायंकाळी बाहेर गेला होता, त्यावेळी रात्री ९ च्या सुमारास मुलगा बेपत्ता झाल्याचं समोर आलं. त्यामुळं त्याचे नातेवाईक व गावातील तरुण त्याचा शोध घेत होते. त्याचवेळी मुलाच्या वडिलांना मोबाईलवर कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं की, "तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत पाहिजे असल्यास त्या बदल्यास २३ लाख रुपये द्या." त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीचा फोन बंद झाला.

चिमुरड्याची केली हत्या : मुलाच्या वडिलांनी लगेच या प्रकरणाची माहिती कुळगाव पोलिसांना दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून ग्रामीण गुन्हे शाखा आणि स्थानिक ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला. एकीकडं पोलीस मुलाला शोधत होते. तर दुसरीकडं ग्रामस्थांकडूनही शोध घेतला जात होता. त्याचवेळी अपहरणकर्त्यानं मोबाईलमध्ये दुसरं सीम कार्ड टाकून फोन करण्याचा प्रयत्न करताच आरोपीचं मोबाईल लोकेशन पोलिसांना कळून आलं. पोलीस थेट त्याच गावातील फोन करणाऱ्या आरोपी सलमान मौलवी याच्या घरात दाखल झाले. त्यानंतर बेपत्ता असलेल्या मुलाची शोधाशोध सुरु केली. त्याच सुमारास आरोपीच्या घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यातील गोणीत मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह जे जे रुग्णालयात रवाना केला होता.

मुलाची खंडणीसाठी अपहरण करुन नंतर त्याची हत्या करण्यात आलीय. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलीय. कमी वेळामध्ये पोलिसांनी आरोपींना अटक केलीय. गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहेत - डी. एस. स्वामी - पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण

आरोपींना अटक : या प्रकरणात कुळगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी सलमान, सफूयान यांना अटक केलीय. तर त्यांच्या कुटुंबातील इतर पाच जणांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणात मुख्य आरोपीच्या कुटूंबाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे एसपी डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. तसंच इतरही अंगानं पोलीस तपास करत असल्याची माहिती त्यांनी दिलीय. या घटनेनंतर गावात तणावाचं वातारण असल्यानं तिथं ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर आरोपींच्या गावात राहणाऱ्या इतरही नातेवाईकांना सुरक्षा देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

हेही वाचा -

  1. नाशिकमध्ये धुलिवंदानाच्या सणाला गालबोट; आईसमोर रेकॉर्डवरील गुन्हेगाराची धारदार शस्त्राने हत्या... - Nashik Muder News
  2. राजस्थानात रक्तरंजित 'होळी'; पोलिसात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या पाच जणांची डंपरनं चिरडून हत्या - Murder In Jhalawar
  3. अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी मेहुण्याला फाशीची शिक्षा - Minor Sister in Law Murdered
Last Updated :Mar 25, 2024, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.