ETV Bharat / sports

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'हा' स्टार फलंदाज स्वस्थ होऊन टीममध्ये परतला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 8:50 AM IST

Mayank Agarwal Health : विमानातून प्रवास करताना आजारी पडलेला सलामीवीर मयंक अग्रवाल आता पूर्णपणे बरा झाला आहे. तो शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तामिळनाडूविरुद्धच्या रणजी सामन्यात पुन्हा एकदा कर्नाटकची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज आहे.

Mayank Agarwal
Mayank Agarwal

बंगळुरू Mayank Agarwal Health : कर्नाटकचा कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर मयंक अग्रवाल याला विमानात अचानक तब्बेत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तो पूर्णपणे बरा झाला असून तो शुक्रवारपासून चेन्नई इथं तामिळनाडू विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात कर्नाटकचं नेतृत्व करेल.

विमानात बसताच त्रास सुरू झाला : 30 जानेवारीला त्रिपुराविरुद्धच्या सामन्यानंतर सूरतला जात असताना मयंक अग्रवालच्या तोंडात आणि घशात जळजळ सुरू झाली होती. त्यानंतर या 32 वर्षीय फलंदाजाला आगरतळातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विमानात बसताच कुठलंतरी पेय पील्यानंतर त्याला हा त्रास सुरू झाला होता. या प्रकरणी त्यानं एफआयआरही दाखल केला होता.

निकिन जोसनं नेतृत्व केलं : प्रकृती अस्वास्थ्यामुळे मयंक रेल्वेविरुद्ध कर्नाटकच्या शेवटच्या रणजी सामन्यात खेळू शकला नाही. आता वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा संघात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अग्रवालच्या अनुपस्थितीत, निकिन जोसनं रेल्वेविरुद्ध कर्नाटकचं नेतृत्व केलं. अनुभवी मनीष पांडेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर कर्नाटकनं एक विकेटने विजय नोंदवला.

मयंकचं उत्तम प्रदर्शन : सध्या 'क' गटात तामिळनाडू 21 गुणांसह अव्वल स्थानी आहे. कर्नाटकचेही तितकेच गुण आहेत. मात्र चांगल्या नेट रनरेटमुळे तामिळनाडू पुढे आहे. अग्रवालच्या पुनरागमनामुळे कर्नाटक मजबूत होईल. त्यानं आतापर्यंत चार सामन्यांत 44 च्या सरासरीनं दोन शतकं आणि एका अर्धशतकासह 310 धावा केल्या आहेत. या सामन्यात फॉर्मात असलेला फलंदाज देवदत्त पडिक्कलही निवडीसाठी उपलब्ध असेल. या डावखुऱ्या फलंदाजानं तीन सामन्यांत 92.25 ची सरासरी आणि दोन शतकांसह 369 धावा केल्या आहेत. तो भारत 'अ' संघाचा भाग असल्यामुळे शेवटचा सामना खेळू शकला नाही.

कर्नाटकचा संघ : मयंक अग्रवाल (कर्णधार), निकिन जोस, देवदत्त पडिक्कल, समर्थ आर, मनीष पांडे, शरथ श्रीनिवास, अनिश केव्ही, विशाक विजयकुमार, वासुकी कौशिक, शशिकुमार के, सुजय सातेरी, विद्वथ कवेरप्पा, व्यंकटेश किशन, एम. बेदारे, रोहित कुमार एसी आणि हार्दिक राज.

प्रशिक्षक : पीव्ही शशिकांत

हे वाचलंत का :

  1. विमानात चढताच प्रकृती बिघडली, टीम इंडियाचा स्टार खेळाडू रुग्णालयात दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.