ETV Bharat / sports

पाचव्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचे 'तीनतेरा'; भारतीय संघाचा डावानं विजय, 112 वर्ष जुना विक्रम मोडीत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 9:23 AM IST

Updated : Mar 9, 2024, 2:24 PM IST

IND vs ENG 5th Test Day 3: अश्विनच्या फिरकीत अडकले इंग्रज; लंच ब्रेकपर्यंत अर्धा संघ तंबूत
IND vs ENG 5th Test Day 3: अश्विनच्या फिरकीत अडकले इंग्रज; लंच ब्रेकपर्यंत अर्धा संघ तंबूत

IND vs ENG 5th Test Day 3 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि आजच सामना संपला. भारतीय संघ 477 धावांवर संपुष्टात आला. भारतानं 259 धावांची मजबूत आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. भारतानं ही कसोटी एक डाव 64 धावांनी जिंकलीय.

धर्मशाला IND vs ENG 5th Test Day 3 : धर्मशाळा इथं खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करत भारतीय संघानं ही मालिका 4-1 नं जिंकलीय. भारतीय संघानं सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा मोठा पराभव केलाय. दुसऱ्या डावातही इंग्लिश फलंदाजांनी घोर निराशा केली. केवळ जो रुटने एकाकी झुंज दिली. त्यानं 84 धावा केल्या. तर भारताकडून रविचंद्रन अश्विननं दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहला 2 तर कुलदीप यादवनं 2 बळी घेतले. रवींद्र जडेजाही एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला.

भारतीय संघानं 112 वर्षांनंतर केला ऐतिहासिक विक्रम : कसोटी मालिकेत 0-1 अशा पिछाडीनंतर भारतीय संघानं 7व्यांदा मालिका जिंकलीय. भारतीय संघानं धर्मशाळा येथील हा सामना जिंकताच 112 वर्षांनंतर कसोटी इतिहासात ऐतिहासिक विक्रम केला. हा विक्रम 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावून पुढील 4 सामने जिंकण्याचा आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत केवळ 3 वेळा असं घडलंय. पहिल्यांदा 1897-98 दरम्यान घडलं. तेव्हा ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. यानंतर ऑस्ट्रेलियानंच दुसऱ्यांदा या कामगिरीची पुनरावृत्ती केली. त्यांनी 1901/02 च्या ऍशेस मालिकेत इंग्लंडचा 4-1 नं पराभव केला होता.

भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांच्या 50 पेक्षा जास्त धावा : या कसोटीत भारतीय संघाच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या आहेत. यात कर्णधार रोहित शर्मानं 103 धावांची तर शुभमन गिलनं 110 धावांची खेळी केली. यशस्वी जैस्वालनं 57 धावा, नवोदित देवदत्त पडिक्कलनं 65 आणि सर्फराज खाननं 56 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 15 वर्षांत प्रथमच भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

सर्फराज आणि पडिक्कल यांच्यात 97 धावांची भागीदारी : सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपहारानंतर रोहित 162 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांसह 103 धावा करुन बाद झाला. त्याच्या पुढच्या षटकात शुभमन गिल 150 चेंडूत 110 धावा करुन तंबूत परतला. गिलनं 12 चौकार आणि 5 षटकार मारले. हे दोघंही बाद झाल्यानंतर सरफराज खान आणि आपला पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या देवदत्त पडिक्कल यांनी 97 धावांची भागीदारी केली. सरफराजनं 56 धावांच्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार ठोकला. तर पडिक्कल 103 चेंडूत 65 धावा करुन बाद झाला. त्यानं 10 चौकार आणि एक षटकार मारला. मात्र रविचंद्रन अश्विन आपल्या 100व्या कसोटीत शून्यावर बाद झाला.

हेही वाचा :

  1. IND vs ENG 5th Test 2nd Day : दुसऱ्या दिवसात भारताची 255 धावांची आघाडी, कुलदीप-बुमराह क्रीजवर
  2. धर्मशाळा कसोटीत जैस्वालनं 'यशस्वी' खेळी करत रचला इतिहास; यशस्वी जैस्वाल थेट डॉन ब्रॅडमन सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तीत
Last Updated :Mar 9, 2024, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.