ETV Bharat / politics

उष्णता आणि राजकीय उदासीनतेमुळं महाराष्ट्रात मतांचा टक्का घसरला; अजून काय आहेत कारणं? - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 7:16 PM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात (Lok Sabha Election Second Phase) महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी पुन्हा एकदा घसरल्याचं दिसून आलं. मात्र, देशाच्या अन्य राज्यांमध्ये मतांची टक्केवारी वाढत असताना महाराष्ट्रात घसरलेला टक्का चिंताजनक आहे. याला महाराष्ट्रातील उष्णता आणि राजकीय उदासीनता कारणीभूत आहे. त्यामुळं राजकीय नेत्यांनी विश्वास निर्माण करायला हवा, अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहेत.

Lok Sabha Election 2024
लोकसभा निवडणूक

प्रतिक्रिया देताना किरण पावसकर आणि प्रकाश आंबेडकर

मुंबई Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Second Phase) दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात आठ मतदारसंघांचा समावेश होता. या आठ मतदारसंघांमध्ये झालेलं मतदान हे 59.63 टक्के इतकं आहे. अन्य राज्यांमध्ये झालेलं मतदान हे 65 ते 77 टक्के आहे. असं असताना राज्यातील मतदानाची कमी झालेली टक्केवारी ही निश्चितच चिंताजनक आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात मतांचा टक्का सातत्यानं घसरतो आहे. त्यामुळं ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. मतांची टक्केवारी वाढली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आश्वासक चेहरा नाही : "महाराष्ट्रामध्ये नेहमीच निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात लढल्या जातात. मात्र, अलीकडं ज्यांच्या नावानं मतदान करावं, अशी फारशी महत्त्वाची नेतेमंडळी राजकारणात दिसत नाहीत. केवळ नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आणि नेते म्हणून आश्वासक चेहरा आहे. मात्र, त्या पलीकडं फारसं काही दिसत नसल्यानं मतदार हा मतदानाकडं पाठ फिरवताना दिसतोय. त्यातच मतदानाचा दुसरा टप्पा हा विदर्भात होता. यावेळी उष्णतेचं प्रमाण अधिक होतं. त्यामुळं उष्णतेचाही मोठा परिणाम या मतदानावर झाल्यानं टक्केवारी घसरली आहे. मात्र, असं असलं तरी मतदारांनी लोकशाहीमधला निवडणूक हा महत्त्वाचा भाग आहे. यासाठी घराबाहेर पडून मतदान केलं पाहिजे," असं आवाहन शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केलंय. तसंच वरील मतही त्यांनीच मांडलंय.

सत्ताधारी पक्षाबद्दलची नाराजी उघड : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष ॲड. धनंजय शिंदे म्हणाले की, "राज्यातील मतांची टक्केवारी यावेळेस पाच ते सहा टक्के घटली. २०१९ मध्ये ६३ टक्क्यांच्या आसपास मतदान झालं होतं, ते आता 59 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे हे अपयश आहे. सत्ताधारी पक्ष जनतेला पटलेला नाही. राज्यामध्ये महायुतीमध्ये सामील झालेल्या घटक पक्षांबद्दल आणि त्यांच्या नेत्यांबद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीचा फटका मतदानामध्ये बसला आहे. त्याशिवाय विदर्भात असलेल्या उष्ण वातावरणामुळंही मतदार घराबाहेर पडले नाहीत. मतदार घराबाहेर पडावेत यासाठी राजकीय पक्षांकडून फारसा प्रयत्न होताना दिसला नाही. मोदी पूर्णपणे नापास झालेले आहेत. त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा नसल्यानं मतदार आता मतदान केंद्राकडं पाठ फिरवू लागले आहेत. मात्र, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हायला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात असलेली ही मतांची टक्केवारी निश्चितच विचार करायला लावणारी आहे."

नवीन मतदार भाजपाच्या धोरणाबाबत साशंक : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "केंद्र सरकारच्या धोरणांचा फटका सर्व स्तरात बसतो आहे. ईडीच्या नोटीसा आणि अन्य यंत्रणांच्या नोटीसा अनेकांना बजावल्या जात आहेत. यामुळं पन्नास कोटीपेक्षा अधिक संपत्ती ज्यांच्याकडं, असे लोक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत. सुमारे 17 लाख कुटुंबांनी भारताचं नागरिकत्व सोडल्याची धक्कादायक माहिती आपल्याकडं आहे. वास्तविक केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांचा फटका देशाला बसतो आहे. तरुणांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्यामुळंच तरुणांनी या चुकीच्या धोरणाकडं पाहून मतदानाकडं पाठ फिरवल्याचं दिसतंय. त्यामुळं यावेळेस सुमारे दहा ते बारा टक्क्यांनी मतदान घसरलं आहे. या घसरलेल्या मतदानाचा फटका निश्चितच भाजपा आणि एनडीएला बसेल," असा दावाही, आंबेडकर यांनी केलाय.

टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न : "मतांची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नव मतदारांमध्ये जागृती करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी निबंध स्पर्धाही आयोजित केली होती. तसेच महाविद्यालय आणि अन्य संस्थांमध्ये मतदानबाबतीत जागृती करण्यात आली. रेडिओ आणि दूरदर्शनच्या माध्यमातून तसेच जाहिरातींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे आणि राष्ट्रीय कर्तव्य बजवावे यासाठी प्रयत्न केले. मात्र, विदर्भातील उष्णतेच्या वाढलेल्या प्रमाणामुळं आम्हाला काही प्रमाणात मतदानात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळं टक्केवारी घसरली आहे. वास्तविक, यावेळी 70 ते 75 टक्के मतदान व्हावे यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत. उरलेल्या टप्प्यांमध्ये तशा पद्धतीनं मतदान होईल यासाठी आमचा प्रयत्न असेल," असं सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी सांगितलं.

आरक्षणाचा फटका? : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला होता. त्यानंतर धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचाही मुद्दा चर्चेत आला होता. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी नेत्यांना थेट आव्हान दिलं होतं. तसंच लोकसभेसाठी उमेदवारही उभे करण्याची तयारी सुरू केली होती. निवडणुकीसाठी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आव्हानही केलं होतं. त्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्यामुळं मतदान टक्केवारी कमी झाली, अशी चर्चा आहे.


हेही वाचा -

  1. कोल्हापूरच्या गादीपुढे नरेंद्र मोदी कोणी नाहीत; संजय राऊतांचं पंतप्रधानांवर टीकास्त्र - Sanjay Raut
  2. अहमदनगरात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे लढतीत आणखी एका 'निलेश लंके'ची उडी; रोहित पवारांचा विखेंवर हल्लाबोल - Lok Sabha election
  3. पंकजा मुंडेंनी मारली पलटी! म्हणाल्या, "प्रीतम मुंडेंविषयीचं वक्तव्य..." - Pankaja Munde
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.