ETV Bharat / politics

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतरत्नचे वाटप, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 5:44 PM IST

Uddhav Thackeray On Modi Government : मुंबईत सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या स्थानिय लोकाधिकार समिती अधिवेशनात बोलत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राज्यातील गोळीबार प्रकरणावरून तसंच भारतरत्न पुरस्कार वाटपावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई Uddhav Thackeray On Modi Government : शिवसेना प्रणीत स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी (11 फेब्रुवारी) मुंबईतील प्रभादेवी येथे महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं होते. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकार, भाजपा आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले उध्दव ठाकरे : यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेनेच्या (ठाकरे गट) इतिहासात मागील 56-57 वर्षात शिवसेनेनं अनेक वादळं अंगावर घेतली आहेत. परंतु शिवसेनेची मूळं एवढी जमिनीत खोल रुतली आहेत की, ती सहसा बाहेर काढता येणार नाहीत. ती मुळं जर तुम्ही उपटायला गेला तर, तुम्ही स्वतः मोडून पडाल. पण शिवसेनेची मूळं उपटणार नाहीत. त्यामुळं त्या भानगडीत पडू नका", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली. भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे. आमचं हिंदुत्व हे चूल पेटवणार आहे. हाताला काम...आणि तोंडात राम...असं आमचं हिंदुत्व आहे, अशी बोचरी टीकाही ठाकरेंनी भाजपावर केली.


भारतरत्न पुरस्कारावरुन केली टीका : पुढं ते म्हणाले की, "सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. भारतरत्न पुरस्कार कोणाला द्यायचा? कधी द्यायचा? किती द्यायचा? याबद्दल आतापर्यंत एक सूत्र होतं. परंतु 'आले देवाच्या मना...तसे आले मोदींच्या मना…' लोकं हयात असताना पंतप्रधान मोदी आणि भाजपानं त्यांना पराकोटीचा विरोध केला. आता त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातोय. कर्पुरी ठाकूर यांनी बिहारमध्ये पहिल्यांदा 26 टक्के आरक्षण लागू केलं होतं. तेव्हा मंडल आयोग नव्हतं. मात्र, त्या आरक्षणाला त्यावेळी जनसंघानं विरोध केला होता. ठीक आहे उशिरा का होईना, त्या लोकांचं मोठेपण तुमच्या लक्षात येतंय", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


बिहारमध्ये मतांसाठी पुरस्कार दिला : "भारतरत्न पुरस्कारांना माझा विरोध नाही आहे. पण कधी, कुठल्या वेळेला दिला हे महत्त्वाचं आहे. आता बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न केंद्र सरकारने दिला आहे. परंतु बिहारमधील मतांवर डोळा ठेवून पुरस्कार जाहीर केल्याची टीका माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकार आणि मोदींवर केली. स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांसाठी मोठं काम केलं. स्वामीनाथन यांनी देशात मोठी हरितक्रांती आणली. आपले युतीचे सरकार होतं, त्यावेळी त्यांना राष्ट्रपती करा ही आमची मागणी होती. तसंच आणखी निवडणुकीच्या तोंडावर अजून कुठल्या राज्यात भारतरत्न पुरस्कार जाहीर करतील, हे काय सांगता येत नाही, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.



भाजपाकडे प्रचंड पैसा, भाडोत्री माणसं : सध्या सरकारकडून ओरबडण्याचे काम सुरू आहे. भाजपाकडे प्रचंड पैसा आहे. हा पैसा निवडणूक आणि प्रचारात वापरतात. भाजपाकडे करोड रुपये आणि भाडोत्री माणसं खूप आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली. आजच मी बातमी वाचली 2023-24 या वर्षात निवडणुकीवर 1300 कोटी रुपये भाजपाने खर्च केले आहेत. त्यांच्याकडे पैसा अमाप आहे. भाडोत्री माणसं कामाला लावून ते इतरांना फोन करत आहेत. मतं देणार का? असं फोनवर विचारतात. एक वेळ मी कुटुंबासह आत्महत्या करेन, पण भाजपा आणि मोदींना मतदान करणार नाही, अशी शेतकऱ्यांची आणि लोकांची संतप्त भावना आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


महाराष्ट्राकडून सर्वाधिक कर : "दक्षिणेतील राज्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं. जे आम्ही पैसे देतो त्यातून आम्हाला काय मिळणार? हा त्यांचा सवाल आहे. आता महाराष्ट्राचा विचार करायचा तर महाराष्ट्र राज्य हे देशाला सार्वधिक महसूल आणि कर देणारं राज्य आहे. केंद्र सरकारला एक रुपया दिल्यानंतर केंद्र सरकार महाराष्ट्राला काय देते? हे कुणाला माहित आहे का? जेव्हा महाराष्ट्र केंद्राला एक रुपये देतो, त्या बदल्यात केंद्र सरकार महाराष्ट्राला फक्त सात पैसे देतो. मग बाकीचे पैसे जातात कुठे? कोणासाठी वापरले जातात?", असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


महाराष्ट्रामुळं तुमचं सरकार : महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात केंद्राकडे कर जातो. पण त्या कराच्या परताव्यात महाराष्ट्राला काय मिळते? हाच खरा प्रश्न आहे. आज मुंबईची आणि महाराष्ट्राची लूट केंद्राकडून होत आहे. कर घेतला जात आहे. पण त्या कराच्या बदलात महाराष्ट्राच्या हाती किंवा वाट्याला काही येत नाही. हा महाराष्ट्रावर मोठा अन्याय आहे, अशी उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केली. अनेक योजना तुम्ही राबवता पण महाराष्ट्राला काय देता? आम्ही जेव्हा एक रुपये देतो त्यातील पन्नास टक्के हा वाटा महाराष्ट्राला आता मिळालाच पाहिजे. ही आमची आग्रही मागणी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


आता किती कार्यालय मुंबईत उरलेत? : "आपण मुंबईत स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अनेक मोर्चे आणि आंदोलन काढली. आस्थापनेत आणि कंपनीत नोकरी मिळावी यासाठी आपण आंदोलन केली. परंतु आता मुंबईत किती कार्यालय, ऑफिस आहेत? हे सांगा मग त्यानंतर आपण मोर्चे काढू, असं ठाकरे म्हणाले. मुंबईतील सगळी कार्यालयं, ऑफिस बाहेर हलवली जात आहेत. भाड्याने दिली जात आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार नाही."


सतत नेहरुंवर टीका : पुढं ते म्हणाले की, "सतत मोदी म्हणतात नेहरूंनी काय केले? नेहरूंनी काय केले? पण नेहरू जाऊन आता साठ वर्षे झाली आहेत. नेहरुंपेक्षा अधिक सत्ता तुम्ही उपभोगला आहात. पण तुम्ही या सत्तेच्या काळात काय केलं ते आम्हाला सांगा? तुम्ही मागील दहा वर्षात काय केलं ते सांगा. नोटबंदी केल्यानं जनसामान्यांना फटका बसला", अशी टीका उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.

हेही वाचा -

  1. "राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का?", उद्धव ठाकरे आक्रमक; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
  2. उद्धव ठाकरेंनी घेतलं अभिषेक घोसाळकर यांचं शेवटचं दर्शन, दुपारी अंत्यसंस्कार
  3. भाजपाची हुकूमशाही आता उलथून लावायची, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.