ETV Bharat / politics

Sanjay Shirsat : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? संजय शिरसाट यांचा मोठा दावा; म्हणाले, “येत्या दोन दिवसांत…”

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 4:56 PM IST

Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी दिले आहेत. तसंच शिंदे गटाची लोकसभा उमेदवारांची यादी सोमवारपर्यंत जाहीर होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Shivsena Shinde Group MLA Sanjay Shirsat big claims about Maharashtra Politics and Mahavikas Aghadi
शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ

शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीचं बिगूल उद्याच वाजणार असून या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेसनं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. तसंच महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची यादी जाहीर होणंही बाकी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat ) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाले संजय शिरसाट : पुढील दोन दिवसात महायुतीचं जागावाटप निश्चित होईल आणि सोमवारी कोणत्या जागा कोणाला मिळणार हे स्पष्ट होईल, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं. तसंच काही जणांचं तिकीट कापल्यानं नाराजी पसरलीय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय, यावर प्रतिक्रिया देत शिरसाट म्हणाले की, "भाजपानं देखील काही विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून पदाधिकाऱ्यांना ते दिलंय. त्यामुळं ज्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांना पक्षात स्थान नाही असं होत नाही. तर इतरांनाही संधी दिली जाते. हे आपण बघितलं पाहिजे. आमच्या पक्षात देखील काही जणांची नावं चर्चेत आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही लवकरच घोषणा करू. मात्र तो अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. छत्रपती संभाजीनगर मतदार संघ शिवसेनेला हवाय आणि तो मिळेल", असा दावाही त्यांनी यावेळी केला.

पक्षप्रवेशासंदर्भात केला मोठा दावा : पुढं ते म्हणाले की, "शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये काही लोक जात असल्याच्या चर्चा ऐकायला मिळतायत. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. मात्र, मी त्यांना हे सांगू इच्छितो की, पुढील दोन दिवसात आमच्याकडंही काही लोक येणार आहेतत आणि तेव्हा अनेकांना धक्का बसेल. दोन दिवसांत मोठा राजकीय भूकंप अनेकांना पाहायला मिळणार आहे", असा दावा संजय शिरसाट यांनी केला. तसंच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आघाडीच्या बैठकीत बोलविण्यात आलं नाही, म्हणजेच त्यांना वंचितसोबत युती करायची नाही. त्यामुळं या आघाडीत नक्कीच बिघाडी होणार, असंही ते म्हणाले.

आमच्याकडं इच्छुकांची संख्या जास्त : छत्रपती संभाजीनगर मतदार संघात पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे हे इच्छुक उमेदवार आहेत. दुसरीकडं ठाकरे गटातर्फे चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी निश्चित झाली असून ते कामाला देखील लागले आहेत. ते त्या गटातील वरिष्ठ नेते असून माझ्या त्यांना शुभेच्छा. मात्र हा मतदार संघ आम्ही जिंकू, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला. तसंच मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी देखील शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यांच्यासारखे अनेकजण आमच्याकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, हा मतदारसंघ अद्याप कोणाला मिळेल हे निश्चित झालेलं नाही. पण हा मतदार संघ कोणालाही मिळाला तरी आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा -

  1. Lok Sabha Election 2024 : लोकसभेचे वेळापत्रक उद्या जाहीर होणार, निवडणूक आयोग दुपारी घेणार पत्रकार परिषद
  2. Lok Sabha Election 2024 : 'महाविकास आघाडीचा निर्णय झाल्यावर पाहू, आमच्याकडं 48 जागांचा पर्याय' : प्रकाश आंबेडकरांचा सूर बदलला
  3. Lok Sabha Election 2024 : खासदार नवनीत राणांची उमेदवारी अनिश्चित; अमरावतीत वेट अँड वॉच
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.