ETV Bharat / politics

महायुतीतील जागावाटप 'या' तारखेला जाहीर होणार; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 7:08 PM IST

Mahayuti Seat Allocation : पुढील आठवड्यात अठराव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होणं अपेक्षित असून राज्यात अद्याप जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये. मात्र, असं असतानाच आता महायुतीतील जागावाटप 11 मार्चला जाहीर होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Shinde group spokesperson Sanjay Shirsat has claimed that the seat allocation of Mahayuti will be announced on March 11
महायुतीतील जागावाटप 11 मार्चला जाहीर होणार

महायुतीतील जागावाटप 11 मार्चला जाहीर होणार असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Mahayuti Seat Allocation : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही. तसंच राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळं यावरुन वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, असं असतानाच आता महायुतीचे जागावाटप सोमवारी (11 मार्च) जाहीर होईल, अशी माहिती शिंदे गट शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे. तसंच दिल्लीत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी आणि भाजपा यांची चर्चा झाली आहे. त्यात समाधानकारक तोडगा निघाला असून पुढील दोन दिवसात त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल असंही शिरसाट यांनी सांगितलं.

जागा टिकवण्यासाठी वक्तव्य : युतीमध्ये एकमेकांबाबत केलेली वक्तव्य पाहता, आक्रमकता दिसून येत आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, "निवडणुकीच्या काळात जागावाटप करण्यासाठी गणित मांडली जातात. प्रत्येकाला आपली जागा जाऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतात. अशावेळी एकमेकांच्या विरोधात थोडीफार वक्तव्य केली जातात. मात्र, मोदीजींना पंतप्रधान करायचं हे एकच आपलं ध्येय आहे", असं ते म्हणाले. तर 'श्रेय कोणी घेऊ नये' यावर केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना ते म्हणाले की, "श्रेय घेण्याबाबत कोणीही चर्चा करू नये. कोणा एकामुळं आतापर्यंत निवडणूक जिंकली नाही, हे महाराष्ट्र पाहत आहे. परिवार म्हणून समोर गेलं तर परिणाम चांगलेच होतात", असा अप्रत्यक्ष टोला संजय शिरसाठ यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

निवडणुकीत कोण कुठेही पळत : अभिनेता नाना पाटेकर शिरूर मतदार संघात निवडणूक लढणार अशी माहिती समोर येत आहे. यावर बोलताना संजय शिरसाठ यांनी, अनेकजण पळताना दिसतील. विचारात नसलेले अनेक चेहरे आता दिसणार आहेत, अशी टीका केली. पुढं ते म्हणाले की, "भास्कर जाधव यांना काहीतरी सांगायचंय असं कळलं. मुळात ते शिवसेनेचे आहेत, त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले आणि आता पुन्हा एकदा इकडे आले. त्यांना जर त्यांचा अनुभव सांगायचा असेल तर त्यात गैर नाही. ते ज्यांच्या सोबत गेलेत तिथं त्यांचं वजन किती राहिलं, ते त्यांनी आता बघायला हरकत नाही. त्यांची बेचैनी दिसून येत आहे. ते जर पुन्हा आले तर आम्ही त्यांना घेऊ का नाही? हे आता सांगण्यात येणार नाही. मात्र, एकेकाळी त्यांनी बाळासाहेबांवर पण टीका केली होती."

सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या गळाभेटवरही दिली प्रतिक्रिया : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची काल (8 मार्च) गळाभेट झाली. यावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले की, "त्यांच्यात चांगले संबंध असून नाती जपणं ही वेगळी बाब आहे. मला पण कोणी इतर पक्षाचा नेता भेटला तर मी देखील त्यांना मिठी मारू शकतो."

आघाडी होणार नाही : "महायुतीतील जागावाटप लवकरच जाहीर होणार आहे. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये समाधानकारक चर्चा झाली. मात्र त्यावर वेगळ्या पद्धतीनं तर्क-वितर्क मांडले जात आहेत. असं असलं तरी महाविकास आघाडी होईल की नाही? हे सांगता येणार नाही. कारण प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचं कधी जमलंच नाही. त्यामुळं आंबेडकर त्यांच्यासोबत जातील असं वाटत नाही, एक पक्ष आधीच बाहेर पडलाय. त्याच्यामुळं यांच्यात काहीही होऊ शकत नाही", असंही शिरसाठ यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. भाजपाची राज्यात 35 जागांवर लढण्याची तयारी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला 'इतक्या' जागा?
  2. पुणे लोकसभेसाठी भाजपाकडून इच्छुकांची गर्दी; माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले...
  3. हे सरकार शब्द देणार अन् शब्द पाळणारं आहे, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.