ETV Bharat / politics

"...तर मोदींना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही", शरद पवारांचा हल्लाबोल - Sharad Pawar News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 9:17 PM IST

Sharad Pawar says if Narendra Modi is not serious with unemployment in india he has no right to sit in power
नरेंद्र मोदी आणि शरद पवार

Sharad Pawar Criticized Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (20 एप्रिल) पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Sharad Pawar Criticized Narendra Modi : महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. शहरातील गारखेडा परिसरात उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार शहरात दाखल आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं, आजच्या परिस्थितीत संविधान आणि देश वाचवायचा असेल तर विचार करून मतदान करायला हवं असं त्यांनी सांगितलं. तर हा गड शिवसेनेचा म्हणजे ठाकरे गटाचा आहे आणि तो तसाच राहील, असा विश्वास यावेळी चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले शरद पवार? : यावेळी बोलत असताना शरद पवार म्हणाले की, "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चांगलं काम केलं. मात्र त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं. असं अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कैदेत टाकण्यात आलं. या देशाला हुकूमशाहीच्या वाटेवर नेण्यात येत आहे. मात्र, या सर्वाचं त्यांना उत्तर द्यावं लागेल. देशासमोर अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्याची ताकद कोणाकडं आहे, हे लक्षात घेऊन मतदारांनी निर्णय घ्यावा. देशाचे राजकारण योग्य दिशेनं न्यायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन आघाडीला साथ द्यावी." तसंच आम्ही सर्व एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जात आहोत, असंही ते म्हणाले.

मोदींचं भाषण निराशाजनक : पुढं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत शरद पवार म्हणाले की, "मोदींचं भाषण ऐकलं, ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळं त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन लक्षात ठेऊन बोलायला हवं. प्रधानमंत्री म्हणून काय करणार हे त्यांनी सांगायला हवं. मात्र, तसं होताना दिसत नाही. पंडित नेहरू यांनी स्वतःचा विचार न करता हा देश संसदीय लोकशाहीप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न केला. देशासाठी योगदान दिलं. यावरुनच आजच्या पंतप्रधानांची मानसिकता लक्षात येते. पन्नास दिवसांत महागाई कमी करतो असं ते म्हणतात. मात्र, तसं झालं का? त्यांनी केवळ सर्वसामान्यांना संकटात टाकण्याचं काम केलंय. एका संस्थेच्या अहवालानुसार बेरोजगारीत वाढ झालीय. जर देशाचे पंतप्रधानच या तरुणांच्या भवितव्याचा विचार करत नसतील तर त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. शेतीची अवस्था बघा, फळबागांना पाणी नाही, शेतमालाला भाव नाही. मी कृषिमंत्री होतो तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत जाहीर केली. शेतकरी अडचणीत असताना त्यांची सरकारनं मदत करायला हवी. मात्र, असं न करता सत्तेचा गैरवापर केला जातोय", अशी टीका शरद पवार यांनी केली.


हेही वाचा -

  1. त्यांना आताच आमदारकीची स्वप्ने, अजित पवार यांचा युगेंद्र पवारांवर हल्ला - Ajit Pawar In Baramati
  2. "पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या सहमतीनं...", अजित पवार गटाचा मोठा खुलासा - NCP Press Conference
  3. 'आमच्या आयुष्यातील दहा वर्षे का वाया घालवली', फडणवीसांना उत्तमराव जाणकर यांचा खडा सवाल, शरद पवारांना पाठिंबा जाहीर - Uttamrao Jankar support NCP
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.