ETV Bharat / politics

विजय शिवतारेंना पक्षाकडून थेट अल्टीमेटम; युतीधर्म न पाळल्यास कारवाईचा बडगा? नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? - Shambhuraj Desai On Vijay Shivtare

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 8:07 PM IST

Shambhuraj Desai News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर महायुती सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना पाडण्याचा निश्चय विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळं महायुतीतील द्वंद उफाळून येत आहे. यावरच आता राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे.

Shambhuraj Desai On Vijay Shivtare Says They should not take any stand against Mahayuti Partnership
विजय शिवतारे आणि शंभूराज देसाई

मुंबई Shambhuraj Desai News : पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार असून संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शिवसेनेचे नेते (शिंदे गट) विजय शिवतारे (Vijay Shivtare) उभे राहिले आहेत. तसंच शिवतारे सातत्यानं अजित पवारांवर टीका करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं महायुतीतील नेत्यांमधील आपसातील वाद आता चव्हाट्यावर आलाय. यावरच आता शिंदे गटाचे नेते तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच युतीधर्म न पाळल्यास विजय शिवतारेंविषयी वेगळा विचार केला जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? : यासंदर्भात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना शंभूराज देसाई म्हणाले की,"विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी मंत्री राहिले आहेत. ते सतत सांगत असतात की मी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करतो, तर त्यांनी पक्षाचा आदेशाचंही पालन केलं पाहिजे. युतीधर्म पाळला पाहिजे. मी काल त्यांना भेटून त्यांची समजूत काढली, पण त्यांनी थोडा वेळ मागितला. मात्र, आपल्याकडं खूप कमी वेळ आहे. त्यामुळं युती धर्माच्या विरोधात तुम्ही कोणतीही भूमिका घेऊ नका, असं मी त्यांना सांगितलं. ज्या ठिकाणी युतीचा कुठलाही उमेदवार असेल त्याच्यासाठी आपल्याला प्रचार करावा लागेल, आणि त्यांना निवडून आणावं लागेल ही आमची भूमिका आहे. पण जर विजय शिवतारे यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली, तर पक्ष त्यांच्या बाबतीत वेगळा विचार करेल."

जागावाटपावरही दिली प्रतिक्रिया : लोकसभा निवडणूक जागा वाटपावरून महायुतीची गुरुवारी (21 मार्च) रात्री बैठक पार पाडली. मात्र, बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. तर या बैठकी संदर्भात विचारण्यात आलं असताना देसाई म्हणाले की, "कालची बैठक झाली, त्याबाबत आम्हाला काही माहिती नाही. आम्ही माध्यमातूनच बातम्या वाचल्या. अजून अर्ज दाखल करण्यासाठी पाच दिवसांचा अवधी आहे, आणि पाच दिवसांमध्ये खूप काही निर्णय घेतले जाऊ शकतात. विलंब होतोय हे निश्चित आहे, पण चांगली चर्चा करून योग्य उमेदवार दिला आणि तो निवडून आला तर पुढं कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळं आता चर्चा होत आहे. चर्चेतून सकारात्मक निर्णय होईल आणि लवकरच महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल."

मागच्या जागावर आम्ही ठाम : महायुतीत मनसेचा सहभाग पक्का मानला जात आहे, आणि असं झालं तर दक्षिण मुंबईची जागा ही बाळा नांदगावकर यांना देण्याचा विचार सध्या सुरू आहे का? असं विचारलं असता, "अजून जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, परंतु 2019 लोकसभा निवडणुकीत ज्या आम्ही जागा लढवल्या होत्या त्या जागावर आम्ही ठाम आहोत. आणि जेवढे आमचे आता खासदार आहेत तेवढ्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे", असं देसाई म्हणाले.

आधी तुमची अवस्था बघा : शिंदे गटातील नेते हे शिवसैनिक नसून नमो सैनिक झालेले आहेत, अशी टीका उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली होती. या प्रत्युत्तर देत देसाई म्हणाले की, "तुम्हाला इंडिया आघाडीच्या वेळी फक्त साडेचार मिनिटं बोलायला दिलं, ते अगोदर बघा. ज्यावेळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते, त्यावेळी देशभरातील नेते मातोश्रीवर भेटायला येत. पण आता तुमचं इंडिया आघाडीमध्ये काही महत्त्व राहिलेलं नाही. फक्त साडेचार मिनिटे तुम्हाला बोलायला दिलं यावरूनच तुमचं महत्त्व कळतं, आणि राहिला प्रश्न म्हणजे कोण नमो सैनिक आहेत किंवा शिवसैनिक आहेत, हे येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता दाखवून देईल", असा टोलाही यावेळी शंभूराजे देसाईंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

कारवाई चुकीची नाही : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, "त्यांच्यावर झालेली कारवाई कायद्याच्या कचाट्यातच आहे. कारण त्यांचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण हे मागील वर्षभरापासून सुरू होतं. कोर्टाने अनेक समन्स त्यांना पाठवले होते. चौकशा सुरू होत्या. यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक करण्यात आला, हा विरोधकांचा आरोप अत्यंत चुकीचा आहे."

हेही वाचा -

  1. "शिवसेना नाही तर भाजपानं उमेदवारी द्यावी", निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम - Vijay Shivtare News
  2. Lok Sabha Elections : अजित पवारांनी केलं दोन पिढ्यांचं नुकसान; 'मी बारामतीतूनच लढणार', शिवतारेंच्या भूमिकेमुळं महायुतीत संघर्ष
  3. Vijay Shivtare vs Ajit Pawar: 'लक्षात घ्या, दादाच ठरवतात पुरंदरचा विजय'; पुण्यात शिवतारेंच्या विरोधात बॅनरबाजी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.