ETV Bharat / politics

Raj Thackeray Met Amit Shah : राज ठाकरे एनडीएमध्ये सहभागी होणार? अमित शाह यांच्याबरोबर अर्धा तास झाली बैठक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 11:46 AM IST

Updated : Mar 19, 2024, 3:26 PM IST

Raj Thackeray meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला सामावून घेण्याची भाजपाची तयारी झाली असून त्या अनुषंगानं आज (19 मार्च) दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र, अर्धा तास झालेल्या बैठकीतील चर्चा अजूनही गुलदस्त्यात आहे.

Raj Thackeray News
राज ठाकरे आणि अमित शाह बैठक

मुंबई Raj Thackeray meets Amit Shah : 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघ्या महिनाभराचा अवधी उरलेला असताना राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बघायला मिळतंय. महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसे चा समावेश करण्यासाठी संघाकडून हिरवा कंदील भेटल्यानंतर आता भाजपा सक्रिय झाला आहे. याच अनुषंगानं काल रात्री दिल्लीत दाखल झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (19 मार्च) दुपारी केंद्रीय गृहमंत्री तसंच भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली. या भेटीदरम्यान भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. विशेष म्हणजे काल दिल्लीत दाखल झालेले भाजपाचे जेष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या भेटीसाठी उपस्थित नव्हते. तर ते आज सकाळीच मुंबईत दाखल झाले. यावरून देवेंद्र फडवणीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अनुपस्थित झालेल्या या बैठकीत राज ठाकरे यांना काय आश्वासन देण्यात आलं हे पाहणं फार महत्त्वाचं आहे.

मनसेला सोबत घ्या, संघाचा हिरवा कंदील : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे असल्याचा दावा भाजपा वारंवार करत असल्यानं त्याला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानं याचा फायदा राज ठाकरे यांच्या मनसेला होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे सोबतीला आले तर त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये मनसेला महायुतीत घेण्याची इच्छा एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केली आहे.

उमेदवार मनसेचा चिन्ह कमळ : मनसेनं राज्यामध्ये लोकसभेच्या दोन जागांची मागणी केल्याची माहिती आहे. नाशिक आणि दक्षिण मुंबई या दोन जागा मनसेला हव्या आहेत. परंतु मनसेच्या उमेदवाराने भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अट भाजपाकडून मांडण्यात आली आहे. ती कदापी राज ठाकरे यांना मान्य नाही. अशा परिस्थितीत तोडगा म्हणून निदान दक्षिण मुंबईच्या जागेवर मनसेच्या उमेदवारानं भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि नाशिक मध्ये त्यांनी मनसेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी यावरही चर्चा सुरू आहे. दक्षिण मुंबईत सध्या उबाठा गटाचे शिवसेनेचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. या जागेवर एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. परंतु या जागेवरून भाजपाचे विद्यमान आमदार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. पण संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला तर येथून मनसेचे बाळा नांदगावकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी महायुतीकडून करण्यात येत आहे.

तसंच एकनाथ शिंदे गटानं मुंबईतील मुंबई दक्षिण आणि मुंबई उत्तर पश्चिम या दोन जागा भाजपासाठी सोडल्या असून त्या बदल्यात त्यांनी ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेची मागणी केली आहे. म्हणून ही जागा भाजपाची असल्यानं मनसे उमेदवारानं येथून भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी भाजपाची इच्छा आहे. परंतु यासाठी राज ठाकरे यांची भूमिका अद्याप समोर आली नाही. आजच्या बैठकीत याविषयीच चर्चा झाल्याची शक्यता आहे.

"राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजपाच्या नेतृत्वात देशभरात कार्यरत आहे. त्यामध्ये राज ठाकरे येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्याचा फायदा आगामी राजकारणात नक्की होईल. राज्यात लोकसभेत महायुतीच्या 45 जागा आम्ही नक्की निवडून आणू. त्यात मनसे सामील झाली तर आम्ही सर्व जागा जिंकू"- अतुल भातखळकर, आमदार, भाजपा

स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न : मनसे एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले, "राज ठाकरे हे दिल्लीला जाणं आश्चर्यकारक वाटत नाही. त्यांची गेल्या बऱ्याच दिवसांपासून भाजपाशी जवळीक वाढली आहे. त्यामुळं दिल्लीला जाऊन राज ठाकरे हे पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी भाजपाशी जवळीक साधून कदाचित स्वत:लाही वाचवलं असेल. कारण, यापूर्वीही त्यांची तपाससंस्थाकडून चौकशी झाली आहे. काही एजन्सी त्यांच्याकडं चौकशी करत असल्यानं कदाचित ते प्रश्न पुन्हा उफाळून आले असतील. मुंबईसह राज्यात मनसेचा प्रभाव ओसरलेला आहे. त्यामुळे जे काही शिल्लक आहे, ते वाचविण्याचा प्रयत्न आहे. स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न आहे."

"राज ठाकरे जे काही ठरवतील, ते पक्षाच्या आणि राज्याच्या हितासाठी असेल."- संदीप देशपांडे, प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

राजकीय परिणाम होणार नाही : हिंदुत्वाबाबत महायुती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात मतैक्य असल्याचं वक्तव्य नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मनसेकडं केवळ एक आमदार आहे. त्यांचा काही भागापुरताच प्रभाव आहे. जर मनसे एनडीए-महायुतीत येणार असेल तर त्यांचं स्वागत आहे. तर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत म्हणाले की, "मनसेचा एनडीएमध्ये सहभागी झाल्यानं राज्यात कोणताही राजकीय परिणाम होणार नाही."

हेही वाचा-

  1. BJP MNS Alliance : राज ठाकरे-अमित ठाकरे दिल्ली दरबारी; भाजपा-मनसेमध्ये बंद दाराआड घडतंय बरंच काही, दक्षिण मुंबईसाठी आग्रही?
  2. Vasant More Resigns मनसे नेते वसंत मोरे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र, राजीनाम्याचं हे' सांगितलं कारण?
  3. Amit Thackeray News : निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे कुटुंबातील दुसरे सदस्य उतरणार? अमित ठाकरे यांच्या नावाची 'या' मतदारसंघाकरिता चर्चा
Last Updated : Mar 19, 2024, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.