ETV Bharat / politics

मडकं फोडतात विरोधक, मात्र फायदा होतो शरद पवारांनाच! विरोधकांनी मडकं फोडून जनतेत निर्माण केलाय असंतोष - Lok sabha election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 7:23 PM IST

Updated : May 6, 2024, 9:05 PM IST

Lok Sabha election 2024 : महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामुळं राज्य ढवळून निघालं आहे. या प्रचारात आरोप-प्रत्यारोप आणि वेगवेगळ्या स्तरावर प्रचार होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संदर्भात वेगळ्या पद्धतीनं प्रचार सुरू असला, तरी त्याचा आपसूक फायदा पवारांनाच होतो, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

Sharad Pawar
शरद पवार (Maharashtra Desk)

दत्ताजीराव देसाई आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव (reporter)

मुंबई Lok Sabha election 2024 : राजकारणामध्ये कोणत्या पक्षाला किंवा नेत्याला कोणत्या गोष्टीचा कधी फायदा होईल आणि त्यामुळं त्या पक्षाचा विजय सोपा होईल हे सांगता येत नाही. राजकारणात निवडणूक आणि खेळात अनिश्चितता असते असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणं निवडणुकांमध्येही अनेकदा त्याचा प्रत्यय येत असतो. एखाद्या उमेदवाराचे पारडे आधी जड वाटत असताना, त्याच्या विरोधातील उमेदवाराला एखाद्या वाक्यानं अथवा घटनेनं अचानक सहानुभूती मिळते आणि अंतिम क्षणी त्याचं पारडे जड होऊन जातं. राजकारणात या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. राज्यातले बडे नेते असलेले शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबतीत या गोष्टीचा प्रत्यय येताना दिसतोय.

पावसातल्या भाषणाचा परिणाम : 2019 च्या निवडणुकांमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील हे उमेदवार दिले होते. या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले निवडून येतील असं वातावरण असताना, शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यावेळी अचानक पाऊस सुरू झाला आणि भर पावसात भिजत शरद पवारांनी सभा सुरूच ठेवली. 80 वर्षाच्या एका नेत्याने पावसात भिजत आपल्या उमेदवारासाठी सभा घेतली, याचा मतदारांमध्ये मोठा प्रभाव पडला. त्यामुळं श्रीनिवास पाटील हे त्या मतदारसंघात विजयी झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळं यावेळची निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणार आहे.

मडकं फोडणं आणि शरद पवारांचं आजारपण : बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान एका अतिउत्साही कार्यकर्त्यानं प्रचार सभेत मडकं फोडलं. वास्तविक एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अग्नी देण्यापूर्वी मडकं फोडलं जातं. त्यामुळं या कार्यकर्त्यांनी केलेला आतताईपणा हा एखाद्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहणारा आहे, असा संदेश सर्वदूर पसरला. त्यामुळं जनमानसात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. तर त्याचवेळी योगायोगाने शरद पवार हे आजारी पडले आहेत. शरद पवार यांना एक असाध्य आजार गेल्या अनेक वर्षांपासून आहे, हे महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहीत आहे, असं असताना शरद पवारांचं हे आजारपण आणि त्यांच्या संदर्भात केली गेलेली वक्तव्यं यामुळं पुन्हा एकदा शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट निर्माण होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या कृत्यामुळं किंवा एखाद्या व्यक्तीच्या आजारपणामुळं निर्माण होणारी सहानुभूतीची लाट ही त्यांच्या पक्षाला किंवा एखाद्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळं पुन्हा एकदा शरद पवारांच्या आजारपणामुळं त्यांच्या पक्षाला फायदा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटालाच फायदा : महाराष्ट्रामध्ये शरद पवार आजारी असताना अजित पवार गटाकडून त्यांचे मडकं फोडलं जात आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा पद्धतीनं जर कोणी वागत असेल तर महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. शरद पवार यांच्या संदर्भात महाराष्ट्रात अनेक वर्ष सहानुभूती आहे. शरद पवार यांनी गेल्या 45 वर्षात राज्यातील विविध भागांमध्ये केलेल्या कामाप्रती लोकांमध्ये आदर आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सचिव दत्ताजीराव देसाई यांनी व्यक्त केलीय. शरद पवारांच्या संदर्भात असं कोणी वागलं तर त्याचा उलट शरद पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच होणार आहे. गेल्या निवडणुकीत शरद पवारांनी पावसात भाषण केलं त्यामुळं त्याचा चांगला परिणाम मतांमध्ये पाहायला मिळाला होता. आता योगायोगाने शरद पवार आजारी असताना विरोधकांनी मडकं फोडून जनतेत अजून असंतोष निर्माण केलाय. याचा फायदा हा आम्हाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच होईल, यात कुठलंही दुमत नाही, असा दावाही देसाई यांनी केलाय.

सहानुभूतीला नव्हे विकासाला मत : या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव म्हणाले की, अशा पद्धतीनं जर कोणी वर्तणूक केली असेल तर ती अयोग्य आहे. आम्ही केवळ शरद पवारांनाच नव्हे तर देशातील सर्व लोकांच्या आरोग्याची चांगली कामना करत असतो. प्रचार सभेत जर कोणी मडकं फोडलं असेल तर ते कृत्य अयोग्य आहे. ते कृत्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यानं नक्कीच केलं नसेल. ज्यानं हे केलं असेल त्याची आम्ही तीव्र शब्दात निंदा करतो. मात्र, यामुळं जर सहानुभूतीची लाट निर्माण होते, असं कोणाला वाटत असेल तर तसं होणार नाही. निवडणुका या सहानुभूतीवरती नव्हे तर विकासावर लढवल्या जातात. त्यामुळं राज्यातील जनता अशा सहानुभूतीला बळी न पडता निश्चितच विकासाला मत देईल. त्यामुळं बारामतीमध्येसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निश्चितच चांगली मतं मिळतील आणि ते विजयी होतील असा दावा, श्रीवास्तव यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. माणूस जातीनं नाही, तर गुणानं मोठा असतो; जातीचं राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितीन गडकरींनी फटकारलं - Lok Sabha Election 2024
  2. मला इंग्रजी बोलता येत नाही, रवींद्र धंगेकर यांच्या साधेपणाला शशी थरूर यांची साद..म्हणाले - Shashi Tharoor Election Campaign
  3. आजपासून प्रियंका गांधी घेणार अमेठी, रायबरेलीची सूत्रं हाती; दोन वॉररूममधून सुरू केलं काम - Lok Sabha Election 2024
Last Updated : May 6, 2024, 9:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.