ETV Bharat / politics

'शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यानं साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...'; फडणवीसांचा पवारांना खोचक टोला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 8:02 PM IST

'शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यानं साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...'; फडणवीसांचा पवारांना खोचक टोला
'शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यानं साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर...'; फडणवीसांचा पवारांना खोचक टोला

Devendra Fadnvis on Sharad Pawar : शरद पवारांनी आमदार सुनील शेळके यांना सज्जड दम दिला होता. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगलीय. देवेंद्र फडणवीसांनी यावरुन शरद पवारांवर खोचक टीका केलीय. तसंच त्यांनी जागावाटपावरुनही खडेबोल सुनावले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई Devendra Fadnvis on Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या जागा वाटपात तिढा निर्माण झालेला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार गटाला अप्रत्यक्षपणे खडेबोल सुनावले आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार गटाकडून लोकसभेच्या जास्त जागांची मागणी होत असताना, मागायला कोणी कितीही जागा मागू शकतो, परंतु निर्णय हा वास्तविकतेवर होईल, असं ते म्हणाले. ते आज मुंबईत बोलत होते. तसंच यावेळी त्यांनी शरद पवार यांनाही खोचक टोला लगावलाय.

धमकी दिल्यानं शरद पवारांचा स्तर खाली येईल : अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सज्जड दम दिल्याचं समोर आलंय. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "खरं म्हणजे पवार साहेब फार मोठे नेते आहेत. आज इतकी वर्षे ते राजकारणात आहेत. राजकारणात जवळपास 55 वर्ष त्यांची पूर्ण झाली आहेत. इतक्या मोठ्या नेत्यानं एका साध्या आमदाराला अशा प्रकारे धमकी दिली असेल तर ते योग्य नाही. मी त्यांना सल्ला देण्याइतका मोठा नाही. परंतु, त्यांनी याचा पुनर्विचार करावा. शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि अशा पद्धतीनं जर ते आमदारांना धमक्या देऊ लागले, तर मला असं वाटतं की त्यांचा स्तर खाली येईल. मी काही त्यांचं बोलणं ऐकलेलं नाही. तुम्ही म्हणता त्यावर मी प्रतिक्रिया देत आहे. परंतु मला हे योग्य वाटत नाही."


आम्ही 115 होतो तरीसुद्धा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं : शिवसेना शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी महायुतीच्या जागा वाटपावरुन भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपानं केसानं गळा कापू नये असं ते म्हणाले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी खूप वर्षापासून रामदास भाईंना ओळखतो. अशा पद्धतीची स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे. तसंच टोकाचं बोलण्याची सुद्धा त्यांची सवय आहे. कधीकधी ते रागानं सुद्धा बोलतात. भाजपानं शिवसेनेचा सन्मानच केलाय. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आम्ही 115 आहोत, तरीसुद्धा आमच्यासोबत आलेल्या एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केलं. कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली, याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही शिंदेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. मुख्यमंत्री म्हणून आमचा संपूर्ण पाठिंबा शिंदेंना आहे. आमच्या सोबतची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल व आमचे इतर मित्र पक्ष असतील यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत. परंतु ठीक आहे, अनेक वेळा अनेक लोक आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा त्यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडतात. परंतु आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी व समजूतदार लोकांनी त्या गंभीरपणे घेऊ नये."

वास्तविकतेप्रमाणे जागा ठरवू : महायुतीच्या जागा वाटपावरून मीडियामध्ये अनेक आकडे रंगवले जात आहेत. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, "मी मीडियातील बंधूंना इतकं सांगेन की आमचं जागावाटप थोडफार आमच्यावर सोडा. थोडीफार संधी आम्हाला सुद्धा द्या. जागा सुद्धा तेच घोषित करत आहेत. उमेदवार सुद्धा तेच ठरवत आहेत. काम आम्हाला सुद्धा करु द्या. जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा सर्वात अगोदर आम्ही मिडीयाला सांगू, की काम पूर्ण झालं. कोणाला किती जागा दिल्या, कुठल्या जागेवरुन कोण उमेदवार उभे आहेत. तसंच आमच्यात जागा वाटपाबाबत कुठलेही गंभीर मतभेद नाहीत. दोन-तीन जागांवर थोड्या फार प्रमाणात चर्चा सुरु आहेत. परंतु तो सुद्धा इतका गंभीर विषय नाही. तो आम्ही सोडवून घेऊ. तसंच सर्व राजकीय पक्ष आहेत. त्यांना आपल्या जागा मागण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे ते जागा मागत आहेत. परंतु जी वास्तविकता असेल त्याप्रमाणे आम्ही ठरवू. कारण, कोणी काहीही मागायला हरकत नाही, परंतु निर्णय हा वास्तविकतेवर होईल."

हेही वाचा :

  1. "शरद पवार म्हणतात मला"; दमदाटी करणाऱ्या आमदाराला भरला सज्जड दम
  2. भाजपाची राज्यात 35 जागांवर लढण्याची तयारी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला 'इतक्या' जागा?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.