ETV Bharat / politics

अभिजीत अडसूळ निवडणुकीच्या रिंगणात; "नवनीत राणांचा गेम करणार" - Amravati Lok Sabha Constituency

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 7:40 PM IST

Updated : Mar 28, 2024, 10:16 PM IST

Amravati Lok Sabha Constituency : भाजपानं नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा वादंग उठलंय. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी उघडपण नाराजी व्यक्त केली. तर त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी तर थेट लोकसभेत जाण्याचा निर्धारच 'ईटीव्ही भारत'बरोबर बोलताना व्यक्त केलाय. तसंच अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.

Etv Bharat
Etv Bharat

अभिजीत अडसूळ यांची पत्रकार परिषद

अमरावती Amravati Lok Sabha Constituency : सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आाघाडी यांनी अजूनही काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. काही जागांवरील वाद अद्याप कायम असून, तो मिटवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षनेतृत्वाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अमरावती मतदारसंघातून महायुतीकडून नवनीत राणा (Navneet Rana) यांना तिकीट मिळाल्यामुळं शिवसेना नेते आनंदराव अडसूळ नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडं अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी तर थेट लोकसभेतच जाणार असल्याचा निर्धार केलाय. त्यामुळं नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढलीय.

नवनीत राणांचा गेम करणार : अभिजीत अडसूळ यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असे जाहीर केलंय राणा यांना भाजपा, शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच प्रहारचे बच्चू कडू यांचा तीव्र विरोध आहे. हे सर्वच पक्ष माझ्या पाठीशी राहणार असून, सर्व मिळून नवनीत राणा यांचा गेम करणार - अभिजीत अडसूळ

तीन अर्ज घेतले : मागील वर्षभरापासून अमरावती लोकसभा मतदारसंघात आनंदराव अडसूळ किंवा मी उमेदवार राहील असे अभिजीत अडसूळ सातत्यानं सांगत आले आहेत. उमेदवारी अर्ज उचलण्याच्या पहिल्याच दिवशी अभिजीत अडसूळ यांनी स्वतःच्या नावानं एकूण तीन अर्ज घेतले आहेत. मी स्वतः निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे जाहीर करीत कोणाच्याही दबावाला बळी न पडता माझी उमेदवारी अमरावती लोकसभा मतदारसंघात कायम राहणार, असं देखील अभिजीत अडसूळ यांनी म्हटलंय.

राणांवर केली टीका : "राज्याचा मंत्री होणं ही सोपी गोष्ट नाही. असं असताना अमरावती जिल्ह्याचे प्रवीण पोटे हे पालकमंत्री असताना त्यांचा सातत्यानं 'बालकमंत्री' म्हणून राणा दाम्पत्यानं अपमान केला. पालकमंत्र्यांना 'बालकमंत्री' म्हणणाऱ्या राणांना भाजपाचे स्थानिक नेते कधीही विसरणार नाहीत. भाजपाचेच तुषार भारतीय तसेच त्यांचे आमदार असणारे भाऊ श्रीकांत भारतीय यांच्या घरावर राणाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या दगडफेकीत भारतीय यांचे वृद्ध आई-वडील देखील जखमी झाले होते. राणांकडून मिळालेल्या जखमा भाजपाचे नेते, पदाधिकारी कधीही विसरणार नाहीत," असे अभिजीत अडसूळ म्हणाले.

शिवसेनेचे दोन्ही गट माझ्यासोबत : शिवसेना शिंदे गट असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट असो, अमरावती जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिक हे माझ्यासोबत असल्याचे अभिजीत अडसूळ यांनी सांगितलं. "आम्ही सर्व मिळून नवनीत राणा यांचा पराभव करू," असा विश्वास देखील अभिजीत अडसूळ यांनी व्यक्त केला.

उमेदवार देण्यात काँग्रेसनं केली घाई : अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित करण्यात काँग्रेसनं घाई केली असल्याचं अभिजीत अडसूळ म्हणाले. आता निवडणूक रणधुमाळीमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटासोबतच काँग्रेस देखील माझ्यासोबत राहील. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके हे देखील आमच्यासोबत राहणार आहेत, असे देखील अभिजीत अडसूळ म्हणाले.

थेट लोकसभेतच जाणार : आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांनी या निवडणुकीत थेट उडी घेतलीय. तशी तयारी अडसूळ पिता-पुत्रांनी सुरू केलीय. अभिजीत अडसूळ यांनी निवडणुकीसाठी लागणारा उमेदवारी अर्ज खरेदी केलाय. हा अर्ज त्यांनी स्वत: च्या नावानं खरेदी केलाय. त्यामुळं निवडणूक लढण्यावर अभिजीत अडसूळ हे ठाम असल्याचं त्यांनी 'ईटीव्ही भारत'बरोबर बोलताना सांगितलं. तसंच मी लोकसभेत जाणारच असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. राणांविरोधात असणारे सर्वच राजकीय पक्ष माझ्यासोबत राहणार असून, प्रहारचे बच्चू कडू हे देखील मलाच पाठिंबा देतील, असा विश्वास अभिजीत अडसूळ यांनी व्यक्त केलाय.

राणांची डोकेदुखी वाढणार? : 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आनंदराव अडसूळ यांना नवनीत राणा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून अडसूळ आणि राणा हे राजकीय विरोधक आहेत. 2019 मध्ये राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर मात्र नवनीत राणा यांनी नेहमी भाजपाला पुरक असणारी भूमिका घेतलीय. आता तर त्या थेट भाजपाच्या 'कमळ' चिन्हावरच निवडणूक लढणार आहेत. दरम्यान, राणा यांच्या उमेदवारीनंतर आमदार बच्चू कडू यांनीही विरोधी भूमिका घेत राणा यांचा प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलंय .त्यामुळं महायुतीची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसून येतंय.

Last Updated :Mar 28, 2024, 10:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.