ETV Bharat / politics

"काका राजकारणात नाही म्हणून..?" अमोल कोल्हेंचा अजित पवारांना खोचक सवाल - amol kolhe

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 8:52 AM IST

Amol Kolhe : शिरुर इथं झालेल्या पक्षप्रवेशात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. त्याला अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलंय. "आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील पोरांनी ज्यांचा काका राजकारणात नसेल, त्यांनी स्वप्न बघायची नाहीत का? असा खोचक सवाल त्यांनी विचारलाय. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

"काका राजकारणात नाही म्हणून सामान्य कुटुंबातील तरुणांनी राजकारण करु नये का?"; अमोल कोल्हेंचा अजित पवारांना खोचक सवाल
"काका राजकारणात नाही म्हणून सामान्य कुटुंबातील तरुणांनी राजकारण करु नये का?"; अमोल कोल्हेंचा अजित पवारांना खोचक सवाल

अमोल कोल्हे


पुणे Amol Kolhe : पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांना प्रवेश देण्यात आला. त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आला. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी तात्कळ पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर जोरदार टीका केलीय.

मी काकामुळं नाही स्वकर्तुत्वावर मोठा : यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, "आम्ही शेतकऱ्यांची पोरं असतो. आमचe काका राजकारणात नसतो. आम्हाला कोणी सोन्याचा चमचा देऊन राजकारणात आणलं नाही. मी अभिनय करतो, असं सांगितलं जातं. मी स्वकर्तृत्वावर अभिनय करतो. माझा काका कुणीतरी फार मोठा अभिनेता आहे, म्हणून मला बोटाला धरुन आणून अभिनेता केल नाही. मी स्वतःच्या कष्टानं एमबीबीएस केलं. माझा काका कोणीतरी एमबीबीएस होता म्हणून मला एमबीबीएसची सीट नाही मिळाली आहे. मी स्वतःच्या कष्टानं डॉक्टर झालो. या सगळ्या शैक्षणिक पात्रतेनंतर तुम्ही सहज सॉफ्ट टार्गेट ठरु शकता," अशी खोचक टीका शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर केलीय.


काका राजकारणात नाही तर आम्ही यायचं नाही का : अमोल कोल्हे पुढं म्हणाले की, "अजित पवार असं म्हणाले की माझा राजकारणाचा पिंड नाही. म्हणजे माझं भ्रष्टाचारामध्ये नाव नाही आलं. राजकारणाचा आमचा पिंड आहे की नाही, असा शिक्का मारणारे तुम्ही कोण? साधा आणि सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात येण्यासारखा प्रश्न आहे, "अशी जोरदार टीका अमोल कोल्हे यांनी अजित पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केली. "मी इतरांप्रमाणे बेडूक उड्या मारल्या नाहीत. जर मी इतरांप्रमाणे कार्य करून त्यांच्यासोबत गेलो असतो तर अजित पवारांची भूमिका आजची भूमिका तीच असती का? फक्त तुमच्या सोयीनुसार तो तुमच्याकडे आला नाही, म्हणून तुम्ही अशी टीका करत आहात."

अशोक सराफ यांना तेच म्हणणार का- सेलिब्रिटीला त्याच्या कामामुळे संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं उदाहरण दाखवा. मला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यामध्ये आमच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचं मार्गदर्शन खूप लाभलं. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्ही तेच म्हणणार का? सॉफ्ट टार्गेट करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे? संसदेमधील कामगिरी कशी आहे? सातत्याने हे प्रश्न मांडताना आपल्या भागातले प्रश्न सुद्धा मांडणं गरजेचं आहे, अशी टीका खासदार कोल्हे यांनी केली.

शिरुरमध्ये चित्र स्पष्ट : शिरुर लोकसभेचं चित्र बहुतेक स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार असणार आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार होते. तर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यात अमोल कोल्हे हे निवडणुकीत विजयी झाले होते.

हेही वाचा :

  1. युतीधर्म न पाळल्यास पक्षाकडून कारवाईचा बडगा; कारवाईवर नेमकं काय म्हणाले शिवतारे? वाचा सविस्तर - Vijay Shivtare News
  2. आढळराव पाटील राष्ट्रवादीत दाखल होताच शरद पवार गट आक्रमक, पक्ष सक्षम नसल्याची जगतापांची टीका - Shivaji Adhalrao Patil Join NCP
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.