मुंबई - 'अॅनिमल' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अफाट यश मिळूनही दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगावर सातत्यानं टीका होत आली आहे. पुरुषी अहंकाराचा दर्प त्याच्या चित्रपटात सर्वत्र पाहायला मिळतो असा एक दावा त्याच्याबाबतीत केला जातो. चित्रपट निर्माते वंगा त्यांच्या कबीर सिंग या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अलीकडेच, वंगाने अभिनेता आदिल हुसैन यांच्यावर एक्स या सोशल मीडियावर 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'कबीर सिंग' चित्रपटाबद्दल केलेल्या कमेंटबद्दल टीका केली आहे. या चित्रपटात आदिल हुसैननं एक छोटी भूमिका केली होती, असं असतानाही त्यानं चित्रपटावर टीका केली होती.
अलीकडील एका मुलाखतीत अभिनेता आदिल हुसैन यांनी सांगितलं की, शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या भूमिका असलेल्या 'कबीर सिंग' चित्रपटात काम केल्याबद्दल मला स्वतःची लाज वाटली. यांतर संदीप रेड्डी वंगानं हुसैन यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर आदिलनंही संदीपच्या टीकेला उत्तर दिलं.
त्याने संदीपची एक्स पोस्ट पाहिली नसल्याचं तो म्हणाला. तो सध्या युनायटेड स्टेट्समध्ये असल्यामुळे त्यानं आपली कमेंट सोशल मीडियावर न करता एका मुलाखतीमध्ये संदीपला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. या बाबात बोलताना आदिल पुढे म्हणाला, "चित्रपट पाहिल्यावर मला खेद वाटतो कारण मी तो चित्रपट पाहिल्यावर पूर्णपणे स्तब्ध झालो होतो. त्यामुळे टीका करताना मी आता मागे हटणार नाही."
आदिल हुसेननं 'कबीर सिंग' हा चित्रपट स्क्रिप्ट आधी न विचारता केला होता. इतकंच नाही तर त्यानं आधी बनलेला मूळ तेलुगू चित्रपटही पाहिला नव्हता. त्यामुळे कथानकाबद्दल त्याला फारशी कल्पना नव्हती. त्यानं आपल्या वाट्याचं काम केल्यानंतर दुसऱ्या कामात तो गुंतला होता. त्यामुळे तो जेव्हा 'कबीर सिंग' चित्रपट पाहायला थिएटरमध्ये गेला तेव्हा त्यानं 20 मिनीटानंतर थिएटर सोडलं होतं. या चित्रपटाबद्दल बोलताना आदिल हुसैन म्हणाला की, "हा चित्रपट केल्याबद्दल मला आताही पश्चाताप होतोय."
आपल्या ट्विटमध्ये संदीपने आदिलच्या "आर्ट फिल्म्स"च्या यादीची खिल्ली उडवली होती. एकत्रितपणे तीस आर्ट फिल्म्समधील तुमच्या 'आत्मविश्वासा'पेक्षा एका ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या तुमच्या 'खेदा'मुळे जास्त लक्ष वेधले गेलं. तुमची हाव तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे हे लक्षात घेता, मला तुम्हाला माझ्या चित्रपटासाठी कास्ट केल्याबद्दल खेद वाटतो. तुमचा चेहरा एआयच्या मदतीनं बदलून मी आता तुमच्याबद्दलचा पेच सोडवेन. आता नीट हसा."
'कबीर सिंग' हा संदीप रेड्डी यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्यांपैकी एक ठरला असला तरी, अनेकांनी चित्रपटाच्या चुकीच्या दृष्टिकोनाबद्दल टीका केली होती.
हेही वाचा -
मसाबानं गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर आजी नीना गुप्ताचा आनंद गगनात मावेना - Masaba announces pregnancy
ईडीने ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्यानंतर राज कुंद्राची गूढ पोस्ट - Raj Kundra