ETV Bharat / entertainment

Madhubala biopic : मधुबालावरील बायोपिकची घोषणा, दिग्दर्शिका जसमीत के रीन करणार या चरित्रपटाचे दिग्दर्शन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 12:56 PM IST

Madhubala biopic : सौंदर्याचं मूर्तीमंत उदाहरण असलेली अभिनेत्री मधुबालाच्या जीवनावर बायोपिक होणार असल्याच्या चर्चा काही वर्षापासून रंगल्या होत्या. अखेर सोनी पिक्चर्सने या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जसमीत के रीन करणार आहे.

Madhubala biopic
मधुबालावरील बायोपिकची घोषणा

मुंबई - Madhubala biopic : आपल्या आरसपानी सौंदर्यानं प्रेक्षकांवर मोहिनी घालणारी अभिनेत्री मधुबाला यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट बनणार आहे. चित्रपट निर्माते जसमीत के रीन भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज मधुबाला यांच्या जीवनावर आणि काळावर आधारित एक चरित्रात्मक नाट्यमय चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन्सने शुक्रवारी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या प्रकल्पाची घोषणा केली.

"सौंदर्य आणि प्रतिभेचे प्रतिक असलेल्या दिग्गज मधुबालावर चित्रपट निर्मितीची घोषणा करताना अत्यानंद वाटत आहे. बॉलीवूडच्या सर्वात प्रतिष्ठित स्टार्सपैकी एकाच्या कालातीत आकर्षण आणि मनमोहून टाकणाऱ्या कथेचा शोध घेण्यासाठी सज्ज व्हा. अपडेट्ससाठी बरोबर राहा!", असे स्टुडिओच्या इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.

या बायोपिकचा उद्देश या सुंदर अभिनेत्रीच्या कारकिर्दीचा, जीवनाचा आणि भारतीय चित्रपटसृष्टीवर झालेला खोल प्रभावाचा सन्मान करणे हा आहे. 1950 आणि 60 च्या दशकात मधुबाला ही सर्वात प्रसिद्ध महिला बॉलिवूड स्टार होती. मधुबालाचे हास्य नेहमीच अक्षरशः फुलांची उधळण करणार, सुगंधाचा शिडकावा करणारं होतं. अवघ्या 36 वर्षांचं आयुष्य लाभलेली ही देखणी नटी 1969 मध्ये काळाच्या पडद्याआड गेली. मधुबालाला ज्येष्ठ चित्रपट निर्माता किदार शर्मा यांनी निर्मित आणि दिग्दर्शित नील कमल (1947) मध्ये मुख्य भूमिकेत पहिला ब्रेक मिळाला. वयाच्या 14 व्या वर्षी, तिने आणखी एक नवीन स्टार, राज कपूर बरोबर रोमँटिक भूमिका केली होती.

आलिया भट्ट अभिनीत 'डार्लिंग्स' चित्रपटाचं दिग्दर्शन केलेल्या जसमीत के रीन यांनी मधुबालावरील चरित्रपट दिग्दर्शन करण्याची जबाबदारी घेतली असून त्यांच्यावरच स्क्रिप्टच्या लेखनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन आणि ब्रूइंग थॉट्स प्रायव्हेट लिमिटेड करणार आहेत.

मधुबाला यांच्यावरील बायोपिकमधून भारतीय क्लासिक चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा पुन्हा एकदा अनुभव प्रेक्षकांना मिळू शकेल. मधुबालांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये 'मुगल-ए-आझम', 'चलती का नाम गाडी', 'महल' आणि 'बरसात की रात' यांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. 'मधुबाला' बायोपिकसाठी बहीण मधुर ब्रिजभूषणने कसली कंबर
  2. Madhubala Biopic : बेकायदेशीर चरित्रपट बनवणाऱ्या निर्मात्याला मधुबालाच्या बहिणीचा कारवाईचा इशारा
  3. B'day Spl: आरसपाणी सौंदर्याचं मूर्तीमंत उदाहरण 'मधुबाला'
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.