ETV Bharat / business

एकेकाळी बुडणारी बँक व्यवस्था नफ्यात आली- पंतप्रधान नरेंद्र मोदी - PM Modi Mumbai visit

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 8:51 AM IST

Updated : Apr 1, 2024, 4:00 PM IST

ceremony  90 years of RBI
ceremony 90 years of RBI

RBI foundation day 2024 : आरबीआयच्या स्थापनेला आज (1 एप्रिल) 90 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली.

मुंबई RBI foundation day 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 90 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आज (1 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हजेरी लावली होती. यावेळी राज्यपाल रमेश बैस, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी? : यावेळी बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आरबीआयचे लक्ष्य आणि संकल्पासाठी शुभेच्छा आहे. आरबीआयची तत्वामुळे जगभरात ओळख आहे. एकेकाळी बुडणारी बँक व्यवस्था नफ्यात आली आहे. गेल्या १० वर्षांत बँकिंग व्यवस्था नफ्यात आली आहे. गेल्या १० वर्षात मोठे बदल झाले आहेत. देशाची आर्थिक प्रगती वेगाने सुरू आहे. आमची नीतीमत्ता चांगली असल्यानं परिणामही चांगले येतात. गेल्या १० वर्षांमध्ये आम्ही बँकिंग क्षेत्रात मोठे बदल केले आहेत.

देशात महागाई मध्यम स्तरावर : पंतप्रधान मोदी म्हणाले, "मागच्या दहा वर्षात जे झालं तो फक्त ट्रेलर होता. अजून आपल्याला या क्षेत्रात बरच काही करायचं आहे. भारताची प्रगती सर्वात जास्त गतीने व्हावी, यासाठी आरबीआयला महत्त्वाची पाऊल उचलावी लागणार आहेत. आरबीआयनं सुद्धा विविध क्षेत्रातील आढावा घेऊन त्या पद्धतीने बँकिंग क्षेत्राला प्रोत्साहन दिल पाहिजे. मी सांगू इच्छितो की सरकार आपल्यासोबत आहे. आम्ही कोरोनामध्येही आर्थिक व्यवस्थेवर सुद्धा लक्ष दिले. सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा लक्ष दिलं. मोठे देश अजून त्यातून सावरले नाहीत. मात्र भारतीय अर्थव्यवस्था नवा विक्रम बनवत आहे. देशात महागाई मध्यम स्तरावर आहे. किसान क्रेडिट कार्डचा शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे."

आरबीआयने नवीन योजनांचा विचार करावा : कोरोनामध्ये आम्ही एमएसईबी सेक्टरसाठी काम केले. त्यासाठी एमएसई क्षेत्राला मोठी तागद मिळावी. सौर उर्जा क्षेत्राला सरकार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले. सरकारच्या धोरणांमुळे देशात अनेक नवीन क्षेत्र उदयाला आली आहेत. आता निवडणुका आहेत. शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामं येणार आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी तयारीत राहा, आता तुमच्याकडे वेळ आहे. आता १०० दिवस मी निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. १०० दिवसांमध्ये आरबीआयने नवीन योजनांचा विचार करावा, असा सल्ला देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी दिला.

मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात : लोकसभा निवडणुकीमुळं राजकीय पक्षांकडून देशात जोरात प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्रात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं मुंबईत कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) १ एप्रिल २०२४ रोजी ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), नरिमन पॉईट, मुंबई या ठिकाणी एका कार्यक्रम आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार असल्यामुळं मुंबईत मागील दोन दिवसांपासून सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. नरिमन पॉईट भागात रस्ते स्वच्छ व सुंदर करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींचा ताफा जाणाऱ्या मार्गावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.



मोदी 2 महिन्यात चौथ्यांदा महाराष्ट्रात येणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागील 2 महिन्यात चौथ्यांदा महाराष्ट्रात येत आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त आले होते. त्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावरही येऊन गेले होते. यानंतर अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी ३० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले होते. २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ दौरा केला होता. भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला मोदी हजर राहिले होते. यावेळी मोदींच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते वितरीत करण्यात आले होते.

डॉ. आंबेडकर यांचे आरबीआयच्या स्थापनेत काय आहे योगदान? : भारतीय रिझर्व्ह बँकची (आरबीआय) १९३५ साली स्थापना झाली. या बँकेच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आहे. आरबीयची स्थापना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजन आणि इट्स सोल्यूशन'वरून करण्यात आली. डॉ. बाबासाहेब यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनिमिक्समध्ये पीएचडी मिळविली होती. रुपयाचं अवमूल्यनं, आर्थिक इतिहास या विषयावर बाबासाहेबांना पीएचडी मिळाली होती. त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून भारतीय रुपयाबाबत काही शिफारसी पुस्तकातून केल्या होत्या.

आरबीआयची स्थापना कशी झाली? पहिल्या महायुद्धानंतर भारतीय रुपयांचं अवमूल्यनं सातत्यानं सुरू होतं. अशा स्थितीत १९२६ मध्ये ब्रिटिश सरकारनं रॉयल आयोग अर्थात हिल्टन आयोग भारतात पाठविला. या आयोगासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर राहिले. त्यांनी हिल्टन आयोगापुढे मध्यवर्ती बँक स्थापनेची शिफारस केली. या शिफारशीनुसार हिल्टन आयोगानं काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली. त्यानंतर १ एप्रिलला १९३५ ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. भारतीय चलनी नोटांची छपाई आवश्यकतेनुसार आणि सरकारच्या निर्देशानुसार छपाई करणे, भारताकडं पुरेस विदेशी चलन ठेवणं, देशाची आर्थिक स्थिती निरोगी ठेवणे आणि देशाच्या चलनासह पत यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आरबीआयवर आहे. उदात्तीकरणानंतर आरबीआयनं पतधोरण, बँकांचे नियमन आणि पर्यवेक्षण यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित केलं. अलीकडच्या काळात आरबीआयनं नियमातील त्रुटीवर बोट ठेवत पेटीएम या कंपनीवर कारवाई केली.

काय आहे रिझर्व्ह बँकेचा इतिहास?

  • भारतीय रिझर्व्ह बँक देशातील बँकांची बँक अर्थात मध्यवर्ती बँक म्हणून काम करते.
  • देशाची फाळणी झाल्यानंतरही आरबीआय ही जून १९४८ पर्यंत पाकिस्तानसाठी मध्यवर्ती बँक म्हणून कार्यरत होती.
  • आरबीआय ही सुरुवातीला समभागधारकांची बँक होती. मात्र, १९४९ मध्ये बँकेचे संपूर्ण राष्ट्रीयीकरण झाले.

हेही वाचा-

  1. लालकृष्ण अडवाणींनी आधुनिक भारताला आकार देण्यात बजावली महत्त्वाची भूमिका : पंतप्रधान - BHARAT RATNA
  2. डिजीटल पेमेंट ते कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता... पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांच्यात काय झाली चर्चा? - PM Modi Bill Gates
Last Updated :Apr 1, 2024, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.