ETV Bharat / bharat

अतिक्रमणाविरोधात कारवाईनंतर हल्द्वानीमध्ये उसळली दंगल; संचारबंदी लागू, पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 6:51 AM IST

Haldwani Violence : उत्तराखंडमधील हल्द्वानी इथं प्रशासनानं अतिक्रमणाविरोधात केलेल्या कारवाईनंतर दंगल उसळली आहे. दंगलखोरांनी पोलीस ठाण्यासह अनेक ठिकाणी जाळपोळ केली. परिस्थती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं शहरात संचारबंदी लागू केली आहे. तसेच शहरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

Haldwani Violence
Haldwani Violence

Haldwani violence

हल्द्वानी (उत्तराखंड) Haldwani Violence : उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील हल्द्वानीमध्ये गुरुवारी (8 फेब्रुवारी) मोठी दंगल उसळली. त्यामुळे सध्या शहरातील वातावरण तणावपूर्ण आहे. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हल्द्वानी शहरातील वर्ग 1 ते 12 पर्यंतच्या सर्व शाळा आज 9 फेब्रुवारीला बंद राहतील. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जणांना गोळ्या लागल्याचं वृत्त आहे. त्यापैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाहा व्हिडिओ

काय आहे प्रकरण : गुरुवारी प्रशासन आणि हल्द्वानी महानगरपालिकेच्या संयुक्त पथकानं सरकारी जमिनीवर बांधलेलं प्रार्थनास्थळ बुलडोझरच्या सहाय्यानं जमीनदोस्त केलं. प्रशासनाच्या या कारवाईला स्थानिकांनी विरोध करत पोलिसांवर दगडफेक सुरू केली. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र प्रकरण शांत होण्याऐवजी आणखी भडकलं. त्यानंतर काही दंगलखोरांनी पोलिसांच्या वाहनांनाही आग लावल्यानं वातावरण अधिकच तंग झालं. दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीत अनेक पोलीस आणि पत्रकार जखमी झाले आहेत. दंगलखोरांनी बनभूलपुरा पोलीस स्टेशनलाही आग लावल्याचं वृत्त आहे. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश : प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देहराडूनमध्ये तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली. बैठकीनंतर धामी म्हणाले की, "न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाचं पथक हल्द्वानी येथे अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी गेलं होतं. त्यावेळी काही समाजकंटकांचा पोलिसांशी वाद झाला. यावेळी काही लोकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. केंद्रीय दलाच्या अतिरिक्त फौजा हल्द्वानीला पाठवण्यात आल्या आहेत." मुख्यमंत्र्यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. तसेच जाळपोळ करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही दिला आहे.

प्रार्थनास्थळाची जागा बेकायदेशीर : याबाबत महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय यांनी सांगितलं की, "प्रार्थनास्थळाची जागा पूर्णपणे बेकायदेशीर असून, त्याजवळील तीन एकर जागा यापूर्वी महापालिकेनं ताब्यात घेतली होती. बेकायदा प्रार्थनास्थळाची जागा सील करण्यात आली होती आणि आता ती जमीनदोस्त करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ काही लोकांनी दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येत आहे."

कर्फ्यूचे आदेश : शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी वंदना सिंह यांनी भारतीय दंड संहिता 1973 च्या कलम 144 नुसार संपूर्ण परिसरात कर्फ्यूचे आदेश दिले आहेत. यासोबतच खालील प्रतिबंधात्मक आदेशही जारी करण्यात आले आहेत.

  • तातडीच्या कामाशिवाय (वैद्यकीय इ.) कोणतीही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही.
  • सर्व व्यापारी संस्था/दुकानं/उद्योग इत्यादी पूर्णपणे बंद राहतील. फक्त रुग्णालयं आणि वैद्यकीय दुकानं सुरू राहतील.
  • हा आदेश सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सशस्त्र दलांना लागू होणार नाही.
  • हल्द्वानी येथील नगर दंडाधिकारी यांच्या परवानगीनं वाहतुकीस अत्यावश्यक कामांसाठीच परवानगी असेल.

हे वाचलंत का :

  1. उत्तराखंड विधानसभेत समान नागरी विधेयक मंजूर; ठरलं पहिलं राज्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.