ETV Bharat / bharat

बिहारमध्ये भाजपाला यश मिळवून देणाऱ्या सुशील मोदी यांचं कर्करोगानं निधन, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली - Sushil Modi Passed Away

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 10:57 PM IST

Updated : May 14, 2024, 8:11 AM IST

Sushil Modi Passed Away : बिहारमधील भाजपाचा चेहरा असलेल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांचे दिल्ली एम्समध्ये निधन झाले. कर्करोगाशी त्यांची सुरू असलेली झुंज अयशस्वी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

सुशील मोदी
सुशील मोदी (Desk)

नवी दिल्ली Sushil Modi Passed Away : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्ली एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला.

सुशील मोदींचे नाव पुन्हा राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्यात आले नसल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी गेल्या ६ महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत असल्याची प्रथमच जनतेला माहिती दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "आता मला वाटते की लोकांना सांगायची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. पंतप्रधानांना सर्व काही सांगितलं आहे. मी सदैव कृतज्ञ आहे. देश, बिहार आणि पक्षासाठी समर्पित आहे."

सुशील मोदी यांचा जन्म ५ जानेवारी १९५२ रोजी पाटणा येथे झाला. त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पद भूषविले आहे. कॉलेज जीवनात जयप्रकाश नारायण यांच्यासोबत चळवळीत त्यांनी भाग घेतला. येथून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. 1990 मध्ये त्यांनी सक्रियपणे राजकारणात प्रवेश केला. पाटनाच्या कुम्हार विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. ते बिहारमधून राज्यसभेचे खासदारही होते. सुशील मोदी हे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या चारही सभागृहांचे सदस्य राहिले आहेत.

विविध नेत्यांनी व्यक्त केलं दु:खमाजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या निधनानं बिहारचं मोठे नुकसान झाल्याचं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव म्हणाले, "सुशील मोदी हे एक लढाऊ, समर्पित सामाजिक राजकीय व्यक्ती होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो. कुटुंबाला दुःख सहन करण्याची शक्ती देवो. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी दु:खही व्यक्त करत आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांना त्यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. यामुळं बिहार भाजपाचं कधीही भरुन न येणारं नुकसान झालंय."

जीएसटी मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडियात पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " पक्षातील माझे अत्यंत महत्त्वाचे सहकारी आणि माझे अनेक दशकांचे मित्र सुशील मोदी यांच्या अकाली निधनानं खूप दुःख झाले. बिहारमध्ये भाजपाचा उदय होण्यात आणि भाजपाला मिळालेल्या यशात त्यांचे अमूल्य योगदान आहे. आणीबाणीला कडाडून विरोध करत त्यांनी विद्यार्थी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केलं होतं. सुशील मोदी हे अत्यंत कष्टाळू आणि मनमिळाऊ आमदार होते. राजकारणाशी संबंधित विषयांची त्यांना खूप समज होती. प्रशासक म्हणूनही त्यांनी खूप कौतुकास्पद काम केले. जीएसटी मंजूर करण्यात त्यांची बजाविलेली सक्रिय भूमिका कायम स्मरणात राहील. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह माझ्या संवेदना आहेत. ओम शांती!"

Last Updated :May 14, 2024, 8:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.