ETV Bharat / bharat

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटक; 'आप'ची सर्वोच्च न्यायालयात धाव - ED Arrest Arvind Kejriwal

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 7:35 PM IST

Updated : Mar 21, 2024, 10:04 PM IST

ED Arrest Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं गुरुवारी रात्री अटक केलीय. न्यायालयानं अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर ईडीचं पथक थेट केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. काही वेळ चौकशी केल्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

नवी दिल्ली ED Arrest Arvind Kejriwal : अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) टीम चौकशीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. दिल्ली उच्च न्यायालयानं कथित दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर ईडीची टीम त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती. चौकशी केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केलीय. याबाबतची माहिती आप नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिली.

'आप'चे कार्यकर्ते आक्रमक : ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर 'आप'चे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दिल्लीत विविध ठिकाणी 'आप'च्या कार्यकर्त्यांना आंदोलन सुरू केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेरही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत. तसंच दिल्लीत विविध ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

सर्वोच्च न्यायालयात याचिका : केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली होती. न्यायमूर्ती सुरेश कैत यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सुनावणीदरम्यान, ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर त्यांना सामान्य माणूस म्हणून समन्स पाठवलं होतं. दरम्यान, ईडीनं केलेल्या अटकेविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणीही आम्ही न्यायालयाकडं केली असल्याची प्रतिक्रिया आप नेत्या अतिशी यांनी दिली.

केजरीवाल यांच्याविरोधात पुरेसे पुरावे : सुनावणीदरम्यान केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, "ईडीनं उत्तर दाखल करण्यासाठी कितीही वेळ घेतल्यास केजरीवाल यांच्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाऊ नये." न्यायालयानं ईडीकडून केजरीवाल यांच्याविरोधात पुरावे मागवले आहेत. यावर ईडीच्या वतीनं एएसजी एसव्ही राजू म्हणाले की, "अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात पुरेसे पुरावे आहेत. त्यामुळं त्यांना अटक होऊ शकते."

केजरीवाल समन्सकडं दुर्लक्ष करतात : ईडीनं पुढं म्हटलं की, "जे लोक कायद्याचं उल्लंघन करतात, त्यांना याचिका करण्याचा अधिकार नाही. केजरीवाल तसंच के. कवितांविरोंधात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यांची चौकशी करणे आवश्यक आहे, मात्र, केजरीवाल समन्सकडं दुर्लक्ष करत आहेत. केजरीवाल स्वत:ला सामान्य माणूस म्हणवून घेतात, पण जेव्हा समन्स पाठवलं जातं, तेव्हा विपश्यनेला जातात, तर कधी दुसरं काहीतरी कारण पुढं करतात."

केजरीवालांना अटक करण्याची भीती : 20 मार्च रोजी उच्च न्यायालयानं ईडीच्या समन्सला आव्हान देणाऱ्या याचिकेवर अरविंद केजरीवाल यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला होता. ईडी त्यांना चौकशीसाठी बोलावून अटक करेल, अशी भीती केजरीवाल यांनी व्यक्त केली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना सांगितलं की, तुम्ही प्रथम देशाचे नागरिक आहात. तुमच्या नावानं समन्स जारी झाल्यास तुम्ही न्यायालयात हजर व्हा. त्यानंतर केजरीवाल यांच्यावतीनं वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, संजय सिंह तसंच मनीष सिसोदिया यांनाही याच पद्धतीनं अटक करण्यात आली होती.

न्यायालयात हजर राहण्याचे आदेश : 16 मार्च रोजी राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या अतिरिक्त महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा ​​यांनी या प्रकरणात केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. यापूर्वी केजरीवाल यांनी अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या समन्सला सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. सत्र न्यायालयानं केजरीवाल यांची याचिका फेटाळून लावत त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर केजरीवाल 16 मार्च रोजी न्यायालयात हजर झाले होते.

हे वाचलंत का :

  1. SBI कडून निवडणूक रोख्यांवरील सर्व तपशील निवडणूक आयोगाला सादर; सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र - electoral bond details
  2. सरकारी 'फॅक्टचेक'ला सुप्रीम कोर्टाचा लगाम; अधिसूचनेवर आणली स्थगिती - SC On Fact Check Unit
  3. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा निर्णय कधी? नाना पटोलेंनी तारीखच सांगितली - Seat Sharing Of MVA
Last Updated : Mar 21, 2024, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.