ETV Bharat / state

Terrible Accident on Darwa Road : भरधाव बोलोरोची एसटीला जोरदार धडक; दोन मुलींचा जागीच मृत्यू, तर 14 प्रवासी जखमी

author img

By

Published : Mar 22, 2023, 9:22 PM IST

Terrible Accident on Darwa Road
भरधाव बोलोरोची एसटीला जोरदार धडक; दोन मुलींचा जागीच मृत्यू, तर 14 प्रवासी जखमी

भरधाव बोलेरो कारने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. तसेच, बसमध्ये प्रवास करीत असलेल्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. शिवाय, एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली, तर 14 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

दारव्हा/यवतमाळ : यवतमाळमधील दारव्हा मार्गावरील या भीषण अपघाताची ही गंभीर घटना आज बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास येथील कामठवाडा शिवारात घडली. या घटनेने काहीकाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातामुळे काही काळ मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.

भीषण अपघातामधील जखमी नागरिक : पायल गणेश किरपान (8) रा. दहेली तांडा आणि पल्लवी विनोद बर्डीकर (11) रा. लाडखेड अशी या अपघातात ठार झालेल्या दोन बालिकांची तर सुनंदा सुभाष मांजरे (40) रा. मुकुंदपूर असे गंभीर जखमी झालेल्या महिला प्रवाशाचे नाव आहे. या शिवाय अपघातात कुंदन काशिनाथ मांगुळकर (28) रा. लाडखेड, लिला महादेव किरपान (60), कोमल मारोती किरपान (3) दोघीही रा. दहेली तांडा, सचिन अशोक कोरडे (31), कुसुम अशोक कोरडे (55) दोघेही रा. बोरीअरब, नतमाबी शेख रशीद (40), रिजवाना परवीन शेख इमरान (42), नूरजहाबी रहीम खान (60) सर्व रा. दारव्हा असे सुमारे 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

असा झाला अपघात : दारव्हा आगाराची एसटी बस (क्र. एमएच 40 वाय 5052) ही नियमित बसफेरी आज बुधवारी दुपारी नागपूरसाठी निघाली होती. दरम्यान, कामठवाडा शिवारात विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या बोलेरो (क्र. एमएच 19 सीवाय 9168) या वाहनाने बसला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात बस आणि बोलेरोची प्रचंड मोडतोड झाली. शिवाय, दोन बालिका गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. एक महिला गंभीर जखमी होऊन सुमारे 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले.

जखमींना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात : अपघाताची ही घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तेथे धाव घेऊन जखमींना तत्काळ उपचारासाठी मिळेल त्या वाहनाने यवतमाळकडे पाठविले. काहींनी येथील शासकीय रुग्णालयात तर काहींनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. या घटनेची माहिती मिळताच लाडखेडचे ठाणेदार रामकृष्ण भाकडे पथकासमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करून दोन्ही वाहने ताब्यात घेतली.

हेही वाचा : Osho Sambodhi Day Pune : पुण्यातील ओशो आश्रमामध्ये पुन्हा भक्त आक्रमक; पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.