ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट: 'देव साकारणारे गाव'च सापडले संकटात!

author img

By

Published : Aug 14, 2020, 3:50 PM IST

Sculptor
मूर्तीकार

गेल्या चाळीस वर्षांपासून कोरीव आणि रेखीव गणेशमूर्तींमुळे वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बरडे हे गाव 'देव साकारणारे गाव' म्हणून प्रसिध्दीच्या झोतात आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश उत्सवावर बंधने घालण्यात आल्याने येथील मूर्तीकार संकटात सापडले आहेत.

वाशिम - महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गणेश भक्तांची आणि मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून कोरीव आणि रेखीव गणेशमूर्तींमुळे वाशीम जिल्ह्यातील सावरगाव बरडे हे गाव 'देव साकारणारे गाव' म्हणून प्रसिध्दीच्या झोतात आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश उत्सवावर बंधने घालण्यात आल्याने येथील मूर्तीकार संकटात सापडले आहेत.

वाशीम जिल्ह्यातील सावरगाव बरडे हे गाव 'देव साकारणारे गाव' म्हणून प्रसिद्ध आहे

मूर्तीतील सुबकता, आकर्षक रंगसंगती आणि वाजवी किंमत या बाबींमुळे गणेशमुर्तींसाठी सावरगावचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. दरवर्षी अकोला, बुलडाणा, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून सावरगावातील गणेश मूर्तींना मागणी असते. मात्र, यावर्षी कोरोना संकट असल्याने या जिल्ह्यांतून एकाही मूर्तीची अद्याप मागणी झालेली नाही, असे मूर्तीकार पेंढारकर यांनी सांगितले.

या गावात वर्षभर गणेश मूर्ती बनवण्याचे काम सुरू असते. मात्र, जून महिन्यापासून या कामाला खर्‍या अर्थाने वेग येतो. सार्वजनिक गणेश मंडळासोबतच घरगुती मूर्तींची देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. अनेक नागरिक आगाऊ नोंदणी करुन ठेवतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवावर बंधने घालण्यात आल्याने समाधानकारक उत्पन्न देणाऱ्या मोठ्या मूर्तींची मागणी झाली नाही. त्यामुळे सावरगाव येथील मूर्तीकारांनी घरगुती मूर्ती साकारण्यावर जास्त भर दिला.

गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपल्यामुळे मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे. सावरगाव दरवर्षी गणेशमूर्ती व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. गावातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या गणेशमूर्ती विक्रीवर अवलंबून आहे. मात्र, यावर्षी कोरोनामुळे हा व्यवसाय संकटात सापडला असून येथील मूर्तीकार अडचणीत आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.