ETV Bharat / state

शिक्षक दिन विशेष: वैदर्भीय बोली भाषेद्वारे प्रसिद्ध झालेल्या 'नितेश कराळेंची' कहाणी

author img

By

Published : Sep 5, 2020, 8:42 PM IST

नितेश कराळे यांनी फोनिक्स अकॅडमीच्या नावाने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचा पुणेरी पॅटर्न थेट वऱ्हाडी भाषेत शिकवायला सुरुवात केली. लॉकडाऊनमध्ये युट्युबच्या माध्यमातून शिकवणी सुरु केल्यामुळे कराळे गुरुजी पुण्या-मुंबईतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत.

nitesh karale
नितेश कराळे

वर्धा- आयुष्याच्या वाटेवर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका मोलाची ठरते. शिक्षकांच्या शिकवण्याच्या खास कलेमुळे बहुदा शिक्षक विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत होतात. ग्रामीण भागातील वैदर्भीय भाषेत शिकवणाऱ्या शिक्षकाची गोष्टच वेगळी असते. लॉकडाऊनमध्ये शिकवणी बंद असताना युट्युबच्या माध्यमातून भल्या भल्यांना नितेश कराळे यांनी वेड लावले आहे.अस्सल गाव खेड्याच्या बोली भाषेतून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करत अधिकारी घडवणाऱ्या गुरुजींबद्दल शिक्षकदिनी हा खास वृत्तांत जाणून घेऊया.

बोली भाषेद्वारे प्रसिद्ध झालेल्या 'नितेश कराळेंची' कहाणी

नितेश कराळे हे वर्ध्या लगतच्या मांडगाव येथील आहेत. त्यांनी बॅचलर ऑफ सायन्स आणि बी.एड. शिक्षण पूर्ण केले. बी.एस्सीमध्ये ४ वेळा नापास झाल्याने कराळे यांनी काही काळ शेती केली. त्यातही यश हाती लागले नाही. यामुळे नितेश कराळे यांनी पुण्यात जाऊन स्वतः स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सुरुवात केली. त्यात यशही मिळू लागले पण विद्यार्थी होण्यापेक्षा त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्याचे ठरवत पुन्हा विदर्भातल्या गावाची वाट धरली. पुण्यातून आल्यानंतर कराळे यांनी फोनिक्स अकॅडमीच्या नावाने पुणेरी पॅटर्न थेट वऱ्हाडी भाषेत शिकवायला सुरुवात केली.

विदर्भातील गुरुजींना पुण्यातही पसंती

कराळे यांना सुरुवातीला विद्यार्थी भेटणे दुरापास्त होते. पण हळुहळु वैदर्भीय भाषेतील अबे पोटेहो, डुकरे हो हे शब्दच विद्यार्थ्यांना आकर्षित करू लागले. अभ्यास करताना मनोरंजन आणि खास भाषा शैली खास पद्धत त्यांची आज ताकद बनली आहे. लॉकडाऊन पूर्वी कराळे गुरुजींची शैली फक्त स्पर्धा परीक्षेच्या शिकवणीला असणाऱ्यांना माहीत होती. कोरोनामुळे वर्ग बंद झाले. मात्र, कराळे यांनी युट्युबवर शिकवायला सुरुवात केली. या माध्यमाचा वापर करताच कराळे यांचा आवाका वाढला. विदर्भातील जे विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतायत तिथे कराळे जाऊन पोहचले. अनेकजण भाषा मस्त आहे म्हणून कराळे यांना सांगतात.

कुटुंबियांनीही बोली भाषेला केला होता विरोध

कुटुंबात आई, वडील असो नातलग असो की त्याची पत्नी हे सर्वजण कराळे यांना सुरुवातीला बोली भाषेत शिकवू नका असे सांगायचे. वैदर्भीय बोली भाषेमुळे नितेश कराळे यांना ओळख मिळाली. विद्यार्थीही आवर्जून त्यांना याच भाषेत शिकवण्यासाठी आग्रह धरतात. केवळ अभ्यासच नाही तर सामाजिक बांधीलकी जपण्याचे धडे इथे दिले जातात. गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी असो, पर्यावरणासाठी झाडे लावणे असो, जमिनीत पाणी मुरवण्यासाठी हातात टिकाव घेणे असो. एवढेच काय कोरोनाच्या काळात आर्थिक फटका बसला असतानाही गरजूंना मदत करण्यासाठी गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी अग्रेसर होते.

एकीकडे इंग्रजी भाषेच महत्व वाढत आहे.दुसरीकडे कराळे गुरुजी मात्र बोली भाषा जोपासण्यासाठी झटत आहेत. लोक काय म्हणतील यापेक्षा विद्यार्थ्यांना समजणाऱ्या भाषेत शिकवण्यात त्यांना अधिक रस आहे.प्रमाण भाषेपासून दूर जात विश्व निर्माण करत शिक्षणाचा ज्योत तेवत ठेवणाऱ्या शिक्षकाला आजच्या शिक्षकदिनी ईटीव्ही भारतचा सलाम.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.