ETV Bharat / state

Hinganghat lecturer burning case : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, 72 पानांचे आदेश

author img

By

Published : Feb 10, 2022, 3:45 PM IST

Updated : Feb 10, 2022, 5:16 PM IST

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील (Wardha Hinganghat) आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिंगणघाट न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 9 फेब्रुवारी 2022 रोजी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली होती.

Hinganghat lecturer burning case
हिंगणघाट जळीतकांड

वर्धा - हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील (Wardha Hinganghat) आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिंगणघाट न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 9 फेब्रुवारी 2022 रोजी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली होती. कालच आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा सिद्ध झाला होता.

पीडितेच्या दुसऱ्या स्मृतिदिनी लागला निकाल -

महाराष्ट्र हदरवणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड (Wardha Hinganghat) प्रकरणाचा निकाल आज (10 फेब्रुवारी) लागला आहे. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात माहिती दिली. पीडितेला जिवंत जाळणारा विक्की उर्फ विकेश नगराळे या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्याची माहिती निकम यांनी दिली. आपल्याशी लग्न न केल्यास ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विक्कीने पी़डितेला एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते. या घटनेला दोन वर्षे झाली असून, पीडितेच्या मृत्यूला आज (10 फेब्रुवारी) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कार्यालयीन कामकाजाच्या केवळ 19 दिवसांतच 426 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात 64 सुनावण्या घेत 29 साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

पीडिता हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती. पीडिता आणि आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी होते. पीडिता 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी आपल्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. पीडिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतून काढलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले.

19 दिवसात महिला अधिकाऱ्यांनी दाखल केले दोषारोपपत्र -

या प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाज पूर्ण करत १९ दिवसांत दोषारोपपत्र तयार केले. त्यात २८ फेब्रुवारीला प्रकरणात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले. त्यानंतर 14 डिसेंबर 2020 पासून सुनावणीला सुरूवात झाली.

29 जणांची साक्ष -

आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी प्रश्न उत्तर विचारत साक्ष नोंदवत उलटतपासणी केली. अंतिम सुनावणी 21 जानेवारीला झाली. दोन्ही बाजू ऐकुण घेत अंतिम टप्पा म्हणून 5 फेब्रुवारीला निकाल देणार अशी माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली. तसेच आरोपी विकेश नगराळेंचे वकील यांनी दोन्ही पक्षाचे लेखी आणि मौखिक युक्तिवाद संपला असून न्यायालय पाच तारखेला निर्णय देणार असल्याचेही सांगितले.

काय आहे घटना -

घटनेतील मृत प्राध्यापिका ही हिंगणघाटच्या स्व.आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी नियमितपणे 3 फेब्रुवारी 2020 ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहोचली. त्यानंतर नंदोरी चौकापासून काही अंतरावर कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे वाट पाहत होता. मनात राग ठेवून दुचाकीतील पेट्रोल अंगावर टाकून पीडितेला पेटवण्याचा बेत त्याच्या मनात होता. दिसताक्षणीच आरोपीने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि तिला पेटवून दिले. घटनेनंतर लगेच प्राथमिक उपचार करत गंभीररित्या जळालेल्या अवस्थेत तिला नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर मृत्यूशी झुंज देत तिने 10 फेब्रुवारीला अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर मूळ गाव दरोडा येथे मृतदेह पोहोचताच आरोपी विकेश नगराळेला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. रस्ता रोको करत मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकेवर आणि पोलिसांवर सुद्धा दगडफेक झाली.

Last Updated :Feb 10, 2022, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.