Thane Crime : कारागृहातील क्वारन्टाईन सेंटरमधून पळालेल्या कुख्यात गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

author img

By

Published : Jan 25, 2023, 11:06 PM IST

Police Arrested Wanted Accused In Thane

कुख्यात गुन्हेगाराला कोठडीत असताना कोरोना झाल्यामुळे त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र क्वारंटाईन सेंटरमधून 32 व्या मजल्यावरुन तो कुख्यात गुन्हेगार धूम ठोकण्यात यशस्वी झाला होता. गाझी दारा इराणी उर्फ जाफरी उर्फ सैय्यद त्या क्वारंटाईन सेंटरमधून पळालेल्या आरोपीचे नाव आहे. मात्र खडकपाडा पोलिसांनी त्याला दोन वर्षानंतर पकडले आहे.

ठाणे - कारागृहातील क्वारन्टाईन सेंटरमधून दोन वर्षापूर्वी पळालेल्या कुख्यात गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या आवळल्या आहेत. गाझी दारा इराणी उर्फ जाफरी उर्फ सैय्यद (वय २७, रा. इराणी वस्ती, कल्याण) असे बेड्या ठोकलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. न्यायालयीन कोठडीत असतानाच या गाझी दाराला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोना बाधित असतानाच क्वारंटाईन सेंटरच्या ३२ व्या मजल्यावरून तो दोन वर्षांपूर्वी पळून गेला होता. मात्र खडकपाडा पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला दोन वर्षीनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहे.

बातमीच्या आधारे पथकाने रचला सापळा : कल्याण पश्चिम भागातील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीच्या आवारातून २१ जानेवारीला एक दुचाकी चोरीस गेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून खडकपाडा पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने तपास सुरु केला. सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड हे वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाला तपास करीत होते. यावेळी कुख्यात गाझी हा आंबिवली येथील इराणीवस्तीतील घरात दबा धरून बसल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे अनिल गायकवाड यांनी तपास पथकासह आंबिवलीतील लहुजीनगर येथे सापळा लावला होता.

पोलीस पथकावर मिरची स्प्रे हल्ला : मात्र पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण लागल्याने तो पोलीस पथकावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याच्यावर झडप घालताच त्याने मिरची स्प्रे पथकांच्या डोळ्यावर मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्याला पाठलाग करून ताब्यात घेऊन त्याच्याकडील मिरची स्प्रे, दोन धारदार चाकू, सुरे आणि एक एयर गन पोलिसांनी जप्त केली.

३२ व्या मजल्यावरून इमारतीच्या पाईपने गेला होता पळून : सराईत गुन्हेगार गाझी हा २०२० साली मोक्का कायद्याअंतर्गत गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. यावेळी त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी भिवंडीतील टाटा आमंत्रण संकूलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये ३२ व्या मजल्यावर उपचारासाठी दाखल केले होते. मात्र कोरोना बाधित असतानाच ३२ व्या मजल्यावरून इमारतीच्या पाईपच्या आधारे खाली उतरून तो पळून गेला होता. त्यावेळी कोनगाव पोलीस ठाण्यात तो फरार झाल्याचा गुन्हा नोंद आहे. त्यानंतर तो दोन वर्षापासून पोलिसांना चकमा देत होता.

सराईत गाझीवर डझनभर गुन्हे : सराईत गुन्हेगाराकडे पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला. यावेळी त्यांना ठाणे जिल्ह्यात कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ , आंबिवली तसेच मुंबई, नवी मुंबई अशा विविध शहरांमध्ये दुचाक्या व जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आतापर्यंत ३ चोरीच्या दुचाक्या हस्तगत करण्यात खडकपाडा पोलीस ठाण्यास यश मिळाले आहे. शिवाय तो मोक्का कायद्याअंतर्गत चार गुन्ह्यासह , जबरी चोरी (चैन स्नॅचींग), दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारी गँगमध्ये सामील असल्याचे समोर आले. गाझी या सराईत गुन्हेगारावर डझनभर गुन्हे दाखल आहेत.

२७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी : कुख्यात गुन्हेगाराला बेड्या ठोकल्याची कौतुकास्पद कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, तपास पथकाचे अमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार अशोक पवार, राजू लोखंडे, मनोहर भोईर, योगेश बुधकर, नाईक सुधीर पाटील यांनी केली आहे. गाझीला न्यायालयात हजर केले असता २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.

हेही वाचा - Youths of Solapur Died in Accident : सोलापूरच्या चार तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू; तिरुपती दर्शनानंतर परतताना काळाचा घाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.