ETV Bharat / state

MNS Toll Protest : 'टोल'वरुन मनसे आक्रमक; कार्यकर्ते असेपर्यंत गाड्या सोडल्या फुकट अन् नंतर आकारले पैसे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 5:15 PM IST

Updated : Oct 9, 2023, 6:54 PM IST

MNS Toll Protest : टोल नाक्यांवरुन मनसे आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेऊन उपोषण सोडण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा टोल नाक्यांवर मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनी धडक दिली.

Etv Bharat
Etv Bharat

टोलवरुन मनसे आक्रमक

ठाणे : MNS Toll Protest : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छोट्या चारचाकी गाड्यांना टोल माफी (Devendra Fadnavis on Toll Plaza) असल्याचा व्हिडिओ दाखवत वाहन चालकांना विना टोल जाऊ देत मनसैनिकांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, याला टोल प्रशासन आणि पोलिसांनी मज्जाव करत आक्रमक झालेल्या अविनाश जाधव (Avinash Jadhav Aggressive) यांच्यासह अकरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळं ठाण्यात मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अविनाश जाधव यांच्या आंदोलनानंतर टोल व्यवस्थापनानं चार चाकी वाहनांना मोफत सोडण्यास सुरुवात केली.

मनसे आक्रमक : टोल नाके बंद व्हावे यासाठी आता मनसेनं साम-दाम-दंड-भेद वापरण्याचा निर्धार केलाय. कधी गांधीगिरी करत, तर कधी आमरण उपोषणाचं हत्यार उपसत मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सरकारनं टोल प्रशासनावर दबाव आणण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु, तो उद्देश सफल झाला नाही. तब्बल चार दिवस उपोषण करत असलेल्या ठाणे, पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेऊन उपोषण मागं घेण्यास सांगितलं. तसेच टोलविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश दिले. आपल्या नेत्याचा आदेश शिरसावंद्य मानत सोमवारी मनसे नेते अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सकाळी पुन्हा एकदा आनंदनगर येथील टोल नाक्यावर धडक दिली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोल संदर्भातील एक व्हिडिओ दाखवत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

फडणवीसांचा टोल माफीचा व्हिडिओ व्हायरल : तथाकथित व्हिडिओमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लहान गाड्यांना टोल माफी असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं मनसैनिकांनी लहान चार चाकी वाहनांना टोल न भरता जाण्याचं आवाहन केलं. परंतु, बहुतांश गाड्यांवर फास्ट टॅग लावले असल्यामुळं त्यांचा टोल परस्पर भरला जात असल्याचं आढळून आलं. जर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे टोल माफीची घोषणा केली होती तर आतापर्यंत टोल का घेतला जात होता? ही लोकांची फसवणूक असून, यापुढे टोल भरणार नाही, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली. यावेळी नवघर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. पोलीस आणि मनसे नेते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात : टोलसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टोलमुक्त वक्तव्याची लोकांना जाणीव करून देत असताना, नवघर पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव आणि त्यांच्या अकरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मागील वेळेप्रमाणेच नवघर पोलीस यावेळीसुद्धा मनसे पदाधिकारी आणि नेत्यांना नोटीस बजावणार का? हे पाहावे लागेल.

आंदोलनावेळी सोडल्या गाड्या : अविनाश जाधव यांनी केलेल्या आंदोलनानंतर गाड्या मोफत सोडणं सुरू होतं. मात्र, त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळं त्या जागेवरून कार्यकर्ते हटल्यानंतर पुन्हा एकदा टोल वसुली सुरू झाली आहे. यामुळं टोल मोफत करण्यामागं टोल प्रशासन दिखाऊपणा करतं का? असा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे.

  • म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
    ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
    मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
    राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
    महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
    How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”… pic.twitter.com/qsJmPSYrI6

    — TEJASWWINI (@tejaswwini) October 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेत्रीने पोस्ट केला व्हिडिओ : अभिनेत्री तेजस्विनीने देखील देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ 'एक्स'वर पोस्ट केलाय. ती म्हणते, म्हणजेऽऽ ?? यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा या टोल धाडीतून!

हेही वाचा -

  1. Raj Thackeray on Toll Plaza : राज ठाकरेंचे पुन्हा लाव रे तो व्हिडिओ, टोल नाक्यांवरून राज्य सरकारला दिला 'हा' इशारा
  2. Raj Thackeray : टोल मुद्द्यावरुन मनसे आक्रमक; पाहा, राज ठाकरे काय म्हणाले...
  3. Raj Thackeray on Toll Rate : 'लोकांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांना परवडणारा नाहीये', टोल दरवाढीवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल
Last Updated : Oct 9, 2023, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.